कल्याण-डोंबिवली महापालिका परिवहन केडीएमटी कर्मचाऱ्यांच्या विविध प्रश्नांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने निर्णय घेतल्याने कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
परिवहन कामगार कर्मचारी संघटनेच्या माध्यमातून या विविध प्रश्नांसाठी पाठपुरावा सुरू होता. ज्यामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करण्यासह ५९ वाहक पदांना मंजुरी मिळण्याच्या निर्णयावरही मुख्यमंत्र्यांनी शिक्कमोर्तब केले आहे.
कल्याण डोंबिवली महापालिका परिवहन उपक्रमातील कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर संघटनेचे अध्यक्ष रवी पाटील यांच्या माध्यमातून ३१ मे रोजी बैठक झाली होती. विद्यमान मुख्यमंत्री आणि तत्कालीन नगर विकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार नगरविकास विभगाचे अवर सचिवांनी ही बैठक आयोजित केली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १७ ऑगस्ट रोजी सही करत शिक्कामोर्तब केल्याने हे प्रलंबित प्रश्न सुटण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.परिवहन कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू होण्यासह ५९ वाहक कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याचा प्रश्नही मार्गी लागल्याचे पाटील यांनी सांगितले.