अतुल जाधव/ठाणे
महागाईने आधीच हैराण झालेल्या ठाणेकर प्रवाशांच्या खिशाला आता ठाणे परिवहन सेवेच्या (टीएमटी) संभाव्य भाडेवाढीचा फटका बसण्याची शक्यता आहे. टीएमटीच्या तिकीट दरवाढीचा प्रस्ताव आगामी महासभेच्या पटलावर मंजुरीसाठी ठेवण्यात येणार असल्याची माहिती आहे. तब्बल ११ वर्षांनंतर भाडेवाढीची तयारी सुरू सुरू झाल्याने प्रवाशांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे.
टीएमटीच्या आर्थिक अडचणी, वाढता इंधन व देखभाल खर्च, कर्मचाऱ्यांचे वेतन तसेच बससेवेवरील वाढता खर्च यांचा दाखला देत प्रस्तावित भाडेवाढीचे समर्थन केले जाण्याची शक्यता आहे. मात्र, सेवा सुधारण्यापूर्वीच प्रवाशांच्या खिशावर अतिरिक्त भार टाकण्याची घाई कशासाठी, असा सवाल आता उपस्थित होत आहे.
टीएमटीच्या सामान्य बसच्या तिकीट दरात शेवटची मोठी भाडेवाढ २०१५ मध्ये झाली होती. त्यावेळी प्रवासाच्या अंतराच्या टप्प्यानुसार तिकिटात साधारण दोन ते पाच रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली होती. तसेच एसी बसच्या तिकीट दरातही सुमारे १० रुपयांची वाढ करण्यात आली होती.
त्यानंतर तब्बल ११ वर्षे सामान्य बसच्या भाड्यात मोठी वाढ झालेली नाही. आता पुन्हा एकदा भाडेवाढीचा प्रस्ताव पुढे येत असून, पहिल्या टप्प्यासाठी २ ते ५ रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता असल्याची माहिती परिवहन सूत्रांनी दिली आहे.
काही मार्गावर बसच्या फेऱ्या कमी आहेत, तर काही मार्गावरील वेळापत्रकाचा बोजवारा उडाल्याच्या तक्रारी प्रवाशांकडून करण्यात येतात. अशा परिस्थितीत 'सेवा आधी सुधारा, मग भाडेवाढ करा', अशी भूमिका प्रवाशांकडून घेतली जाण्याची शक्यता आहे.
राजकीय हस्तक्षेपामुळे टीएमटीवर आर्थिक भार?
ठाणे परिवहन सेवेवर राजकीय नेत्यांचा प्रभाव असल्याचे चित्र अनेकदा दिसून येते. त्याचबरोबर महिलांना अर्ध्या तिकिटाची सवलत, ज्येष्ठ नागरिकांना मोफत प्रवासाची सुविधा, तसेच राजकीय सभांसाठी टीएमटीच्या बसेसचा मोठ्या प्रमाणात वापर होत असल्याने परिवहन सेवेवर आर्थिक भार पडत असल्याचे बोलले जात आहे.
तिकीट दरात शेवटची मोठी भाडेवाढ २०१५ मध्ये झाली होती. त्यावेळी प्रवासाच्या अंतराच्या टप्प्यानुसार तिकिटात साधारण दोन ते पाच रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली होती. तसेच एसी बसच्या तिकीट दरातही सुमारे १० रुपयांची वाढ करण्यात आली होती.
महासभेत सत्ताधारी-विरोधक आमनेसामने?
भाडेवाढीचा प्रस्ताव महासभेत आल्यानंतर त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार वाद होण्याची शक्यता आहे. प्रस्ताव मंजूर झाल्यास त्याचा थेट परिणाम दररोज टीएमटीने प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांच्या मासिक खर्चावर होणार आहे. एकीकडे सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक स्वस्त, सक्षम आणि प्रवाशांना विश्वासार्ह करण्याची गरज असताना, दुसरीकडे तिकीट दर वाढविण्याचा निर्णय कितपत योग्य आहे, याचे उत्तर महासभेला द्यावे लागणार आहे.
भाडेवाढीपूर्वी सेवा सुधारणार का?
टीएमटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी भाडेवाढ हा एकमेव पर्याय नसल्याचे मत व्यक्त होत आहे. मार्गाचे फेरनियोजन, बसच्या फेऱ्यांमध्ये वाढ, वेळापत्रकाचे काटेकोर पालन, अनधिकृत प्रवासाला आळा तसेच प्रवासी संख्या वाढविण्यासाठी आकर्षक आणि दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यावर भर देण्याची गरज आहे. आता ठाणेकरांच्या नजरा महासभेकडे लागल्या आहेत. तिकीट दरवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी मिळणार की प्रवाशांच्या संभाव्य रोषामुळे प्रस्तावाला ब्रेक लागणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.