ठाणे

घोडबंदर मार्गावर दुसऱ्या दिवशीही वाहतूककोंडी

रसायनांनी भरलेला कंटेनर पलटी झाल्याने तब्बल सहा ते सात तास कोंडीत अडकलेल्या ठाणेकरांना सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारीही वाहतूककोंडीचा सामना करावा लागला.

Swapnil S

ठाणे : रसायनांनी भरलेला कंटेनर पलटी झाल्याने तब्बल सहा ते सात तास कोंडीत अडकलेल्या ठाणेकरांना सलग दुसऱ्या दिवशी गुरुवारीही वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. मेट्रोचे गर्डर बसवण्याचे काम सकाळी उशिरापर्यंत चालल्याने ही वाहतूककोंडी झाली होती. त्यामुळे दुसऱ्या दिवशीही सर्वसामान्य प्रवासी आणि विशेष करून महिला आणि विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल झाले. कासारवडवली ते घोडबंदर हे अंतर कापण्यासाठी तब्बल अडीच तास लागत होते. रिक्षाचालकांनीही भाडे दुप्पट आकारल्याने प्रवाशांकडे अन्य पर्याय नसल्याने त्यांच्या खिशालाही भार बसला.

घोडबंदर येथील पातलीपाडा भागात रायायनिक पदार्थ वाहून नेणारा कंटेनर उलटल्याने तब्बल १३ तास वाहतूककोंडीमुळे ठाणेकर हैराण झाले होते. घोडबंदरमधील रहिवाशांना कोंडीच्या मनस्तापातून बाहेर पडण्यास २४ तास उलटले नसतानाच दुसऱ्या दिवशीदेखील कोंडीचा सामना करावा लागला. बुधवारी कंटेनरचा अपघात झाला म्हणून वाहतूककोंडी झाली. मात्र गुरुवारी मेट्रो मार्गिकेच्या कामांमुळे घोडबंदर मार्ग ठप्प झाला. घोडबंदर मार्गावर मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचे काम सुरू आहे. या कामासाठी एमएमआरडीएला मध्यरात्री गर्डर उभारणीची कामे करावी लागतात. पहाटे पाचपर्यंत या कामाला परवानगी होती. परंतु सकाळी ६.३० वाजल्यानंतरही कामे पूर्ण झाली नाहीत. त्याचा थेट परिणाम वाहतूक व्यवस्थेवर झाला. बुधवारपेक्षा गुरुवारी कोंडीचे प्रमाण अधिक होते. पहाटेपासूनच कोंडीला सुरुवात झाली होती. घोडबंदर मार्गावरील मुख्य मार्गावर मानपाडा ते गायमुखपर्यंत रस्त्यावर वाहनेच वाहने दिसत होती, तर अंतर्गत मार्गावर मानपाडा, कोलशेत, ब्रह्मांड रोड, ढोकाळी, कापूरबावडी, साकेत रोड परिसरात वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. वाहनचालकांना अवघ्या १० ते १५ मिनिटांचे अंतर पार करण्यासाठी दोन ते तीन तास लागत होते. त्यामुळे ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर नागरिकांमधून रोष व्यक्त होत होता. दुपारच्या सत्रातील काही शाळांनी सुट्टी जाहीर केली होती. रिक्षा, बसगाड्यांच्या थांब्यावर प्रवाशांची गर्दी झाली होती. परंतु बसगाड्या उपलब्ध नव्हत्या. सर्व अंतर्गत मार्गांवर कोंडी झाली होती. त्यामुळे परिसरात राहणाऱ्या नागरिकांना देखील घराबाहेर पडणे कठीण झाले होते. अंतर्गत मार्गावरील कोंडी सोडविण्यासाठी स्थानिक परिसरातील नागरिकांना रस्त्यावर उतरण्याची वेळ आली.

घोडबंदर मार्गावर वाहतुकीची रखडपट्टीच

घोडबंदर मार्गावर सतत होणारे अपघात, मेट्रो आणि रस्त्यांची सुरू असलेली कामे यामुळे घोडबंदर मार्ग आता वाहतूककोंडीचे केंद्र बनले आहे. या ठिकाणी सतत होणाऱ्या वाहतूककोंडीमुळे प्रवाशांकडून अक्षरश: संताप व्यक्त करण्यात येत आहे. घोडबंदर मार्गावर सतत होणाऱ्या वाहतूककोंडीवर उपाययोजना न केल्यास प्रवाशांकडून आंदोलन होण्याची शक्यता आहे.

दिल्लीकडे डोळे; तीन दिवसांनंतरही महायुतीचा मुख्यमंत्री ठरेना, शिंदे गटाचे जोरदार दबावतंत्र

राज्यात हुडहुडी वाढणार! पारा २ ते ३ अंशांनी आणखी खाली येणार

एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा; नवे सरकार स्थापन करण्याच्या हालचालींना वेग

लिलाव संपला, आता उत्सुकता १४ मार्चची

महाविकास आघाडीचे आता ‘मिशन ईव्हीएम’