ठाणे : मेट्रो-४ या प्रकल्पाचे काम जवळपास पूर्ण झाले असून याच महिन्यात म्हणजे डिसेंबरमध्येच या मेट्रो मार्गाचे लोकार्पण करण्याचा आमचा मानस आहे, अशी घोषणा राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केली आहे. त्यामुळे याच महिन्यात मेट्रो-४ ही ठाणेकरांच्या सेवेत दाखल होण्याची शक्यता आहे.
शुक्रवारी एमएमआरडीए, महापालिका आणि इतर अधिकाऱ्यांची ओवळा-माजिवडा मतदारसंघातील विविध विकासकामांचा आढावा घेण्यासाठी ठाणे महापालिका मुख्यालयात एक विशेष बैठक बोलावली होती. या बैठकीत सरनाईक यांनी ही माहिती दिली.
वडाळा-घाटकोपर ते गायमुख असा मेट्रो-४ प्रकल्प कधी सुरू होणार, याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे. मेट्रो-४ हा मार्ग मुंबईहून तीनहात नाका मार्गे घोडबंदरला जोडण्यात आला आहे. मेट्रोच्या कामामुळे दररोज घोडबंदर महामार्गावर वाहतूककोंडी होत असून या कोंडीमुळे नागरिक अतिशय त्रस्त झाले आहेत. काही दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मेट्रोचे ट्रायल रन घेण्यात आले होते.