उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेच्या आरोग्य विभागात मोठी प्रशासकीय उलथापालथ झाली असून, आरोग्य केंद्रांतील अनागोंदी कारभार, स्वच्छतेचा अभाव, औषधसाठा व्यवस्थापनातील त्रुटी, भटक्या श्वानांच्या प्रश्नावरील निष्क्रियता तसेच डॉक्टरांकडून आर्थिक लाभ मागितल्याच्या तक्रारींच्या पार्श्वभूमीवर प्रभारी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. मोहिनी धर्मा यांच्याकडील पदाचा कार्यभार महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी तात्काळ काढून घेतला आहे. या कारवाईमुळे महापालिकेच्या आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे.
महापालिका प्रशासनाने जारी केलेल्या आदेशानुसार, शहरातील आरोग्य सेवा व्यवस्थेतील गंभीर त्रुटींची दखल घेत ही कारवाई करण्यात आली. काही दिवसांपूर्वी आयुक्तांनी शहरातील विविध नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांना भेट दिली असता अनेक गंभीर बाबी निदर्शनास आल्या होत्या. आरोग्य केंद्रांतील पायाभूत सुविधांची दुरवस्था, अस्वच्छ परिसर, कार्यालयीन नोंदींची अपुरी व विस्कळीत व्यवस्था, तसेच औषधसाठा आणि साहित्य व्यवस्थापनातील निष्काळजीपणा यामुळे नागरिकांच्या आरोग्य सेवांवर विपरीत परिणाम होत असल्याचे आढळून आले.
राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत नागरिकांना दर्जेदार आणि परवडणाऱ्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी असतानाही प्राथमिक आरोग्य सेवांचे प्रभावी बळकटीकरण करण्यात अपयश आल्याचा ठपका प्रशासनाने ठेवला आहे. याशिवाय शहरातील भटक्या श्वानांची वाढती संख्या, निर्बिजीकरण मोहिमेतील संथगती आणि श्वान निवारागृह व्यवस्थापनातील त्रुटींबाबतही प्रशासनाने नाराजी व्यक्त केली आहे.
दरम्यान, आमदार कुमार आयलानी यांच्या पत्राद्वारे काही डॉक्टरांकडून आर्थिक लाभाची मागणी केल्याच्या गंभीर तक्रारी प्रशासनाकडे प्राप्त झाल्याचाही आदेशात उल्लेख करण्यात आला आहे. या सर्व बाबींचा विचार करून डॉ. मोहिनी धर्मा यांना वैद्यकीय आरोग्य अधिकारी पदाचा कार्यभार कायम ठेवणे योग्य नसल्याचे प्रशासनाने नमूद केले आहे.