उल्हासनगर : उल्हासनगर कॅम्प-४ येथील १७ वर्षीय युग धामणे याच्या डेंग्यू संशयित मृत्यूनंतर महापालिकेचा आरोग्य विभाग ॲक्शन मोडवर आला आहे. डेंग्यू संशयित रुग्णाची माहिती वेळेत महापालिकेला न दिल्याप्रकरणी संबंधित खासगी रुग्णालय आणि पॅथॉलॉजी लॅबला नोटीस बजावण्यात आली असून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
युगच्या मृत्यूची माहिती मिळताच आरोग्य समिती सभापती सविता तोरणे-रगडे यांच्या नेतृत्वाखाली आरोग्य विभागाच्या पथकाने धामणे कुटुंबीयांची भेट घेतली. त्यानंतर युगवर उपचार झालेल्या खासगी रुग्णालयाची पाहणी करून वैद्यकीय कागदपत्रे आणि तपासणी अहवालांची तपासणी करण्यात आली.प्राथमिक चौकशीत डेंग्यू संशयित रुग्णाची माहिती महापालिका आरोग्य विभागाला वेळेत देण्यात आली नसल्याचे निदर्शनास आल्याचे सांगण्यात आले. संबंधित पॅथॉलॉजी लॅबनेही आवश्यक माहिती कळविली नसल्याची बाब समोर आली आहे. युगच्या प्रकृतीबाबत रुग्णालयाने वेळेवर योग्य माहिती दिली नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. सत्यम गुप्ता आणि नोडल अधिकारी मोनिका जाधव यांना सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. दोषी आढळल्यास संबंधित रुग्णालय अथवा लॅबवर नियमानुसार कारवाई केली जाईल, असे सविता तोरणे-रगडे यांनी सांगितले. दरम्यान, शहरात औषध व धूरफवारणी तसेच डास नियंत्रणाच्या उपाययोजना तीव्र करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.