उल्हासनगर : उल्हासनगरमधील वाहतूककोंडीच्या समस्येतून नागरिकांची सुटका होण्याची आशा निर्माण झाली आहे. कल्याण-अंबरनाथ महामार्गावरील शांतीनगर ते साईबाबा मंदिरादरम्यान प्रस्तावित सुमारे साडेतीन किलोमीटर लांबीच्या उड्डाणपुलाचा सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार झाला आहे. मेट्रो मार्गिका ५-अ सोबत दुमजली उड्डाणपूल उभारण्याची शिफारस करण्यात आली आहे.
या प्रकल्पासाठी आमदार कुमार आयलानी यांनी २३ सप्टेंबर रोजी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडे (एमएमआरडीए) पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला होता. त्यानंतर एमएमआरडीएने अर्बन मास ट्रान्झिट कंपनी लिमिटेडची सल्लागार म्हणून नियुक्ती केली. संबंधित संस्थेने प्रकल्प अहवाल तयार केल्याची माहिती एमएमआरडीएने १५ ऑक्टोबर रोजी पत्राद्वारे आयलानी यांना दिली.
प्रस्तावित उड्डाणपुलामुळे शांतीनगर, साईबाबा मंदिर परिसरासह कल्याण-अंबरनाथ महामार्गावरील वाहतूककोंडी कमी होण्याची अपेक्षा आहे. मात्र, प्रकल्पाच्या प्रत्यक्ष बांधकामासाठी आवश्यक मंजुऱ्या अद्याप मिळालेल्या नाहीत.