उल्हासनगर महानगरपालिका संग्रहित छायाचित्र
ठाणे

महापौर खुर्चीसाठी उल्हासनगरात रणसंग्राम; शिंदे शिवसेना-टीम ओमी कलानीत रस्सीखेच; बहुमताचा आकडा गाठूनही पेच कायम

उल्हासनगर महापालिकेच्या महापौर खुर्चीसाठी आता केवळ संख्याबळ नव्हे, तर डावपेच, लॉबिंग आणि अंतर्गत राजकारण निर्णायक ठरत आहे. ओबीसी आरक्षण जाहीर होताच शिंदे शिवसेना आणि टीम ओमी कलानी यांच्यात महापौरपदासाठी उघड रस्सीखेच सुरू झाली आहे.

Swapnil S

उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेच्या महापौर खुर्चीसाठी आता केवळ संख्याबळ नव्हे, तर डावपेच, लॉबिंग आणि अंतर्गत राजकारण निर्णायक ठरत आहे. ओबीसी आरक्षण जाहीर होताच शिंदे शिवसेना आणि टीम ओमी कलानी यांच्यात महापौरपदासाठी उघड रस्सीखेच सुरू झाली आहे. दुसरीकडे बहुमतापासून अवघ्या तीन नगरसेवकांवर असलेली भाजप योग्य क्षणाची वाट पाहत असल्याने सत्तासंघर्ष अधिकच रंगत चालला आहे.

राज्यातील २९ महापालिकांच्या महापौरपदांसाठी आरक्षण जाहीर झाल्यानंतर उल्हासनगरच्या राजकारणाला नवे वळण मिळाले आहे. यंदा महापौरपद इतर मागासवर्गीय (ओबीसी) प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने शहरातील राजकीय समीकरणे ढवळून निघाली आहेत. शिंदे शिवसेनेने वंचित बहुजन आघाडी, साई पक्ष आणि अपक्ष नगरसेवकांच्या पाठिंब्याने ४० नगरसेवकांचा अधिकृत गट नोंदवत बहुमताचा ‘मॅजिक फिगर’ गाठल्याचा दावा केला आहे. त्यामुळे महापौरपद शिंदे शिवसेनेकडे जाण्याची शक्यता प्रबळ मानली जात आहे.

मात्र, याच टप्प्यावर शिंदे शिवसेना आणि धनुष्यबाण चिन्हावर निवडणूक लढवलेल्या टीम ओमी कलानी या गटांतील ओबीसी प्रवर्गातील नगरसेवक महापौरपदासाठी इच्छुक असल्याने अंतर्गत चुरस वाढली आहे. आरक्षण जाहीर होण्यापूर्वीपासूनच काही प्रभावशाली नगरसेवकांनी स्वतंत्र हालचाली सुरू केल्या होत्या. आता आरक्षण स्पष्ट होताच गटांतर्गत बैठका, चर्चासत्रे आणि शक्तिप्रदर्शनाला वेग आला आहे. यामुळे शिंदे शिवसेनेतून नेमका कोणता चेहरा महापौरपदासाठी पुढे येणार, तसेच टीम ओमी कलानी यांचा उमेदवार अंतिम क्षणी बाजी मारणार का? याबाबत अनिश्चितता कायम आहे. या पार्श्वभूमीवर शिंदे शिवसेना व टीम ओमी कलानी यांच्यातील महापौरपदाची रस्सीखेच, भाजपची संधीसाधू रणनीती आणि वरिष्ठ नेत्यांची भूमिका निर्णायक ठरणार आहे. विशेषतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे अंतिम निर्णय कोणाच्या बाजूने देतात, याकडे संपूर्ण उल्हासनगरचे लक्ष लागले आहे. महापालिकेच्या सत्तेचा अंतिम फैसला त्यांच्या भूमिकेवर अवलंबून असल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

भाजपचे गणित सध्या अडचणीत

दरम्यान, भाजपकडूनही पडद्यामागील हालचाली वाढल्या आहेत. ७८ सदस्यीय महापालिकेत भाजपचे ३७ नगरसेवक निवडून आले असून, सत्तेसाठी त्यांना केवळ तीन नगरसेवकांची गरज आहे. काँग्रेसच्या नगरसेविका अंजली साळवे यांनी तटस्थ राहण्याचे संकेत दिले असले, तरी वंचित बहुजन आघाडीचे दोन, साई पक्षाचा एक आणि एक अपक्ष नगरसेवक यांनी शिंदे शिवसेनेला पाठिंबा दिल्याने भाजपचे गणित सध्या अडचणीत दिसत आहे. तरीही भाजप पूर्णपणे शर्यतीबाहेर नसल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया यांनी 'महायुतीचाच महापौर होईल' असा विश्वास व्यक्त केल्याने चर्चांना नवे वळण मिळाले आहे. योग्य वेळी राजकीय डावपेच राबवण्याची तयारी भाजपकडून सुरू असल्याचीही चर्चा आहे.

महापौर-उपमहापौर निवडीसाठी राजकीय हालचालींना वेग

उल्हासनगर : उल्हासनगर महानगरपालिकेच्या सत्तेचा कौल ठरवणारी महापौर व उपमहापौर निवड प्रक्रिया आता निर्णायक टप्प्यात पोहोचली आहे. शहराच्या नेतृत्वाचा फैसला ठरवणाऱ्या या निवडणुकीसाठी शुक्रवार, ३० जानेवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारांची नामनिर्देशन पत्रे दाखल केली जाणार आहेत. त्यानंतर मंगळवार, ३ फेब्रुवारी रोजी दुपारी १ वाजता महापौर व उपमहापौरपदासाठी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. विशेष बाब म्हणजे, यंदा महापौरपदाचे प्रथम अडीच वर्षांसाठी आरक्षण ‘इतर मागासवर्गीय (ओबीसी)’ प्रवर्गासाठी निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे या प्रवर्गातील इच्छुक नगरसेवकांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली असून, विविध राजकीय पक्षांकडून उमेदवार निवड, संख्याबळाची जुळवाजुळव आणि पाठिंबा मिळवण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. येत्या काही दिवसांत उल्हासनगरच्या राजकारणाचे तापमान आणखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

मुंबईकरांनो लक्ष द्या! उद्या तिन्ही रेल्वे मार्गांवर मेगाब्लॉक; वाचा संपूर्ण वेळापत्रक

किचन बजेट बिघडणार! घरगुती गॅस सिलिंडर ६० रुपयांनी महागला; नवे दर आजपासून लागू

T20 Final साठी रेल्वेची खास सोय; मुंबई-पुण्याहून अहमदाबादसाठी स्पेशल ट्रेन, वाचा वेळापत्रक

समुद्रात अडकलेल्या रशियन तेलाची भारतीय कंपन्यांकडून खरेदी; अमेरिकेकडून महिन्याभराची सवलत मिळाल्याचा परिणाम

ठाणेकरांनो लक्ष द्या! कल्याण-शिळ रोडवर ३१ मार्चपर्यंत वाहतूक बंद; पर्यायी मार्ग कोणते?