उल्हासनगर : उल्हासनगरच्या राजकीय वर्तुळात रविवारी संध्याकाळी एक दृश्य चांगलेच गाजले. शिवसेनेचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे हे ओमी कलानी यांच्या वाहनातून प्रवास करताना दिसले. एकेकाळी ‘दोस्ती का गठबंधन’ या नावाने लोकसभा निवडणुकीत एकत्र आलेले हे समीकरण आता पुन्हा दृढ होत असल्याचे संकेत मिळत आहेत. ओमी कलानींच्या सारथ्यात श्रीकांत शिंदेंचा हा प्रवास केवळ साधा दौरा नव्हता, तर तो आगामी पालिका निवडणुकीतील संभाव्य आघाड्यांचे चित्र उभे करणारा ठरणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. शहरात भाजप आणि कलानी गटातील वादंग वाढत असताना शिंदे-कलानी जवळीकतेमुळे नव्या राजकीय चर्चांना उधाण आले आहे.
आठ वर्षांपूर्वी भाजपने कलानींच्या करिष्म्याचा वापर करून पालिकेवर सत्ता मिळवली होती, मात्र मतभेदांनंतर कलानींनी पुन्हा शिवसेनेशी जवळीक साधत महापौरपद शिवसेनेला मिळवून दिले. त्यानंतरची शिवसेना-कलानी जवळीक लोकसभा निवडणुकीत आणखी ठळक झाली, जेव्हा ओमी कलानी यांनी महायुतीऐवजी फक्त खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंना पाठिंबा देत प्रचारात सक्रिय सहभाग घेतला.