उल्हासनगर : उल्हासनगरमध्ये पूर्वी अनेक इमारतींचे स्लॅब कोसळून जीवितहानी झाली आहे. आता पुन्हा एकदा महापालिकेने नागरिकांना जाणीवपूर्वक सावध करत जुन्या इमारतींच्या संरचनात्मक तपासणीसाठी (Structural Audit) सज्ज राहण्याचे आवाहन केले आहे. संभाव्य दुर्घटनांपासून बचावासाठी नागरिकांनी महापालिकेच्या सूचनांचे तातडीने पालन करण्याची गरज निर्माण झाली आहे.
पावसाळ्याची चाहूल लागताच उल्हासनगर महानगरपालिका नागरिकांच्या सुरक्षेसाठी सज्ज झाली आहे. शहरात मागील काही वर्षांमध्ये २० ते २५ वर्षे जुन्या इमारतींच्या स्लॅब कोसळून अनेकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे आता महापालिकेने वेळेत पावले उचलत उल्हासनगर महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांच्या मार्गदर्शनाखाली अतिरिक्त आयुक्त किशोर गवस यांनी एक महत्त्वपूर्ण जाहीर आवाहन जारी केले आहे. उल्हासनगर शहरातील १० वर्षांपेक्षा जुन्या इमारतींमध्ये राहणाऱ्या नागरिकांनी तातडीने आपल्या इमारतीची ‘संरचनात्मक तपासणी’ करून घ्यावी आणि तपासणी अहवाल प्रभाग समिती कार्यालयात सादर करावा, असे स्पष्ट निर्देश महापालिकेने दिले आहेत.
धोकादायक इमारतींची यादी उल्हासनगर महापालिकेच्या www.umc.gov.in या संकेतस्थळावर "List of Dangerous Buildings" या विभागात प्रसिद्ध करण्यात आली आहे. आपल्या इमारतीचे नाव या यादीत आहे की नाही हे नागरिकांनी त्वरित तपासावे. उल्हासनगर महानगरपालिका पॅनेलवरील अधिकृत संरचनात्मक अभियंत्यांची यादी देखील संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली असून, फक्त या अधिकृत अभियंत्यांकडूनच तपासणी करून घेण्याचे आवाहन केले आहे.
उल्हासनगर महानगरपालिकेने स्पष्ट केले आहे की, ही काळजी घेतल्यास भविष्यातील जीवित व वित्तहानी टाळता येईल. महापालिका आपली जबाबदारी पार पाडत असली, तरी नागरिकांनीही जबाबदार नागरिक म्हणून पुढाकार घेणे अत्यंत गरजेचे आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी संरचनात्मक ऑडिट करून इमारतींची सुरक्षितता तपासून घेणे हाच सर्वोत्तम उपाय आहे. प्रत्येक नागरिकाने या सूचना गांभीर्याने घेऊन महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांनी केले आहे.
धोकादायक इमारतीची प्राथमिक लक्षणे
- इमारतीचे कॉलम, बीम, स्लॅब झुकलेले किंवा वाकलेले वाटणे
- स्लॅबवरील सळया गंजून बाहेर आलेल्या दिसणे
- तळमजला खचल्यासारखा भासणे
- कॉलममधील भेगा वाढणे
- काँक्रीट पडणे, फुगलेला कॉलम दिसणे
- बीम व भिंतीमधील साधा किंवा तडे वाढत जाणे
- प्लास्टरमध्ये मोठ्या प्रमाणात भेगा
- इमारतीच्या भागातून विशिष्ट आवाज येणे
"उल्हासनगरमध्ये मागील काही वर्षांत जुन्या इमारतींचे स्लॅब कोसळून दुर्दैवी जीवितहानी आणि वित्तहानी झालेली आहे. या पार्श्वभूमीवर १० वर्षांपेक्षा जुन्या इमारतींनी तत्काळ संरचनात्मक तपासणी करून घ्यावी, ही विनंती आहे. धोक्याची कोणतीही लक्षणं दिसताच तत्काळ कृती करणे आवश्यक आहे. संकट टाळायचे असेल तर इशाऱ्याची वाट पाहू नका. - आजच सुरक्षिततेचा निर्णय घ्या!"
- मनीषा आव्हाळे आयुक्त, उल्हासनगर महापालिका