एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू... पती, पत्नी आणि त्यांची लाडकी मुलगी... हे प्रकरण केवळ आत्महत्येपुरते मर्यादित नाही, तर ती एका वडिलांच्या अंतर्मनातील असहायता, विवंचना आणि निराशेची हृदयद्रावक कहाणी आहे. उल्हासनगरातील झुलेलाल रोडवरील एका फ्लॅटमध्ये घडलेली ही तिहेरी मृत्यूची घटना संपूर्ण शहराला हादरवून गेली आहे. आर्थिक अडचणींनी वैफल्यग्रस्त झालेल्या एका व्यक्तीने आपली पत्नी आणि मुलीचा जीव घेऊन स्वतःचीही जीवनलीला संपवली. विशेष म्हणजे, या घटनेपूर्वी त्याने स्वतःचा व्हिडिओ रेकॉर्ड करून आपल्या अंतःकरणातील वेदना जगासमोर मांडल्या आहेत.
उल्हासनगर कॅम्प क्रमांक १ मधील झुलेलाल मंदिर रोडलगतच्या हर्षा कॉटेज या इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या पवन पाहुजा याने पत्नी नेहा पाहुजा आणि १६ वर्षीय मुलगी रोशनी पाहुजा यांची गळा दाबून हत्या करून नंतर स्वतः गळफास लावून आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना बुधवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. पवन पाहुजा हे मूळचे सोने-चांदीच्या दागिन्यांचे मेकिंग काम करायचे. मात्र गेल्या काही महिन्यांपासून आर्थिक परिस्थिती पूर्णपणे ढासळल्याने ते प्रचंड मानसिक तणावात होते. त्यातच सहा महिन्यांपूर्वी त्यांच्या लहान मुलाचे निधन झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता. सततच्या हताशतेतून त्यांनी ही टोकाची कृती केल्याचे पोलीसांच्या प्राथमिक तपासातून पुढे आले आहे.
विशेष म्हणजे पवन पाहुजाने आत्महत्या करण्याआधी स्वतःचा एक व्हिडीओ रेकॉर्ड करून आपले मन मोकळे केले. त्या व्हिडीओमध्ये त्याने आपल्या निर्णयामागील कारणे स्पष्ट केली आहेत. अत्यंत भावनिक शब्दांत त्याने आपली वेदना व्यक्त केली आहे. "पैसे नाहीत, म्हणून जगणं नाही" असं म्हणत पवन पाहुजाने स्वतःच्या त्रासाचे जळजळीत सत्य समाजासमोर ठेवलं. सदर घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली. शेजाऱ्यांनी घटनास्थळी गर्दी केली असताना, उल्हासनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेह ताब्यात घेऊन उत्तरीय तपासणीसाठी उल्हासनगरच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले असून, अधिक तपास पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
या घटनेने केवळ पाहुजा कुटुंबच नव्हे, तर संपूर्ण शहराला हादरवून सोडले आहे. या कुटुंबाचा शांत स्वभाव आणि रोजचे हसरे चेहरे आता फक्त आठवणींमध्ये उरले असल्याचे शेजाऱ्यांनी सांगितले.