मुख्य जलवाहिनी फुटल्याने घोटभर पाण्यासाठी संघर्ष! उल्हासनगरमधील नागरिकांच्या संतापाचा उद्रेक 
ठाणे

मुख्य जलवाहिनी फुटल्याने घोटभर पाण्यासाठी संघर्ष! उल्हासनगरमधील नागरिकांच्या संतापाचा उद्रेक

आधीच ३६ तासांच्या शटडाऊनमुळे पाण्यासाठी व्याकूळ झालेल्या उल्हासनगरकरांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे.

Swapnil S

उल्हासनगर : आधीच ३६ तासांच्या शटडाऊनमुळे पाण्यासाठी व्याकूळ झालेल्या उल्हासनगरकरांच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. अंबरनाथमध्ये बारवी धरणाची मुख्य जलवाहिनी फुटल्याने उल्हासनगर शहरातील काही भागाचा पाणीपुरवठा पुन्हा ठप्प झाला आहे. ऐन दिवाळीच्या तोंडावर वारंवार खंडित होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांच्या संतापाचा उद्रेक होत असून, पाण्याचे संकट आणखी गडद होण्याची भीती व्यक्त होत आहे.

उल्हासनगर शहरावर ऐन दिवाळीच्या तोंडावर पुन्हा पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. अंबरनाथ येथील फॉरेस्ट नाका परिसरातील रेल्वे पुलाजवळ बारवी धरणातून पाणीपुरवठा करणारी एमआयडीसीची मुख्य जलवाहिनी फुटल्याने पाणी पंपिंग बंद ठेवावे लागले.

परिणामी उल्हासनगरातील अनेक भागांचा पाणीपुरवठा ठप्प झाला असून नागरिकांचे हाल सुरू झाले आहेत. शहरात आधीच ३६ तासांच्या शटडाऊनमुळे पाणीपुरवठा विस्कळीत झाला होता. त्यातून नागरिक सावरत असतानाच मुख्य जलवाहिनी फुटल्याने पुन्हा पाण्याची प्रतीक्षा करण्याची वेळ आली आहे.

वारंवार उद्भवणाऱ्या तांत्रिक बिघाडांमुळे शहरातील पाणीपुरवठ्याच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेषतः गृहिणी, ज्येष्ठ नागरिक आणि कामगारवर्गाला पाणीटंचाईचा मोठा फटका बसत आहे. दिवाळीच्या तयारीत नागरिक व्यस्त असताना पाण्यासाठी धावपळ करावी लागत असल्याने संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, पाणीपुरवठा पूर्ववत होईपर्यंत उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

(संबधित इंग्रजी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

तिकीट दरांमध्ये हस्तक्षेप करण्याचे सरकारला अधिकार; प्रवासी भाड्याबाबत नवे नियम जाहीर

Mumbai : शिक्षक मारहाण प्रकरण; अखेर १० वर्षांनी महापौर रितू तावडे न्यायालयात हजर

Gold Rate Hike : दिवाळीपूर्वी सोन्याच्या किमतीत वाढ; चांदी स्थिर

Mumbai : ११०० कोटींच्या थकबाकीमुळे महालॅब, डायलिसिस केंद्रांना टाळे

दिवाळीत पाणी कपात स्थगित; ठाणेकरांना किंचित दिलासा; स्टेमपाठोपाठ MIDC चा निर्णय