उल्हासनगर : शहरात जुन्या वैमनस्यातून एका तरुणाची भररस्त्यात धारदार चाकूने सपासप वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची घटना घडली आहे. कॅम्प क्रमांक चारमधील कुर्ला कॅम्प चौक परिसरात सोमवारी रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास हा थरार घडला. सतनामसिंग उर्फ काला लबाना असे मृत तरुणाचे नाव असून या घटनेमुळे परिसरात प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
विठ्ठलवाडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सतनामसिंग आणि आरोपी गुरप्रीतसिंग उर्फ अनिस करतारसिंग लबाना यांच्या कुटुंबात जुना वाद होता. पूर्वी दाखल झालेल्या एका गुन्ह्याच्या रागातून आरोपीने सतनामसिंगच्या मानेवर, छातीवर आणि पोटावर चाकूने गंभीर वार केले, ज्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. कुलदीपसिंग लबाना यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रहार गोडसे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे. दरम्यान, पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवत मध्यरात्री उशिरा आरोपी गुरप्रीतसिंगला अटक केली असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली.