उल्हासनगर : ‘शून्य कचरा शहर’ ही घोषणा करणाऱ्या उल्हासनगर महानगरपालिकेचे प्रत्यक्ष चित्र अत्यंत विरोधाभासी आणि धक्कादायक आहे. खडीमशीन डम्पिंग ग्राऊंड क्षमतेपलीकडे भरल्यामुळे आता तिथून कचरा ओसंडून वाहत आहे, तर दुसरीकडे शहरभर दुर्गंधी, घाण आणि ढीग साचल्याने नागरिक त्रस्त आहेत. लाखो रुपयांची जाहिरात, कोट्यवधींचा कचरा व्यवस्थापन ठेका आणि तरीही गल्लीगल्लीत साचलेला कचरा… हा विरोधाभास आता लोकांच्या नजरेत येऊ लागला आहे.
उल्हासनगरच्या खडीमशीन परिसरातील डम्पिंग ग्राऊंडवर सध्या इतका मोठा कचऱ्याचा साठा झाला आहे की, वाहनांना प्रवेश देखील अवघड होऊ लागला आहे. ठेकेदार कोणार्क एन्व्हायर्नमेंट कंपनीकडून डम्पिंग साइटवर अत्यंत धीम्या गतीने प्रक्रिया केली जात असून, दररोज निर्माण होणाऱ्या सुमारे ४०० मॅट्रिक टन कचऱ्याची विल्हेवाट लावली जात नाही. त्यामुळे शहरात इतरत्र कचऱ्याचे ढीग उभे राहत आहेत.
उल्हासनगर शहरातील कॅम्प ४ आणि ५ हे भाग कचऱ्याचे ‘हॉटस्पॉट’ ठरत असून, रस्त्यांच्या कडेला ढीग पडले आहेत. उग्र वास, डासांचा त्रास आणि अस्वच्छतेमुळे नागरिक हैराण झाले आहेत. काही ठिकाणी तर रस्त्यावरून चालणेही कठीण झाले आहे. घंटागाड्यांचे वेळेवर न येणे, नियमित उचल न होणे आणि विल्हेवाट न लावणे या त्रिसूत्रीने परिस्थिती बिघडली आहे.
जमिनीवर ढीगच ढीग!
शहरभर जाहिरात फलकांवर ‘स्वच्छ उल्हासनगर, सुंदर उल्हासनगर’च्या घोषणा झळकत असल्या तरी प्रत्यक्षात रस्त्यावर आणि गल्लीगल्लीत फक्त कचऱ्याचे साम्राज्य आहे. हे दृश्य पाहून नागरिक विचारू लागले आहेत. शहराला स्वच्छतेचा मुखवटा चढवून खरे चित्र लपवले जातेय का?
कोट्यवधींचा ठेका…आणि शून्य परिणाम?
महानगरपालिकेने ‘शून्य कचरा’ संकल्पना प्रत्यक्षात उतरवण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा ठेका कोणार्क कंपनीला दिला आहे. मात्र या ठेक्यातील कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कचरा व्यवस्थापनात अपयश असूनही महापालिका प्रशासन गप्प का? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
चौकशी करण्याची कार्यकर्त्यांची मागणी
या परिस्थितीवर अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक रहिवाशांनी संतप्त प्रतिक्रिया देत, ठेकेदार कंपनी आणि प्रशासन यांच्यावर चौकशीची मागणी केली आहे. ‘करोडो रुपये खर्चूनही जर शहर घाणीत रुतले असेल, तर जबाबदारी निश्चित व्हायलाच हवी’ अशी संतप्त भावना व्यक्त केली जात आहे.