ठाणे : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या (एमआयडीसी) पाणीपुरवठा योजनेतील जांभूळ जलशुद्धीकरण केंद्रातील जलाशय येथे बारवी गुरुत्व वाहिनी क्र. १, २ आणि ३ वर उन्नतीकरण व तातडीच्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात येणार आहेत. यासाठी गुरुवार, १८ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजल्यापासून शुक्रवार, १९ सप्टेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत (२४ तास) पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येईल.
या कामामुळे ठाणे महापालिका क्षेत्रातील कळवा, मुंब्रा, दिवा यांच्यासह वागळे व माजिवडा-मानपाडा प्रभाग समितींच्या काही भागांमध्ये शुक्रवार, १९ सप्टेंबर रोजी पाणीपुरवठा बंद राहणार आहे. मुंब्रा प्रभाग क्रमांक २६ व ३१ चा काही भाग वगळता इतर सर्व भाग, तसेच वागळे प्रभागातील रुपादेवी पाडा, किसननगर क्र. २, नेहरुनगर आणि मानपाडा प्रभागातील कोलशेत खालचा गाव येथे पुरवठा पूर्णपणे थांबविला जाईल.
पाणीपुरवठा सुरू झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणी येईल, अशी माहिती ठाणे महानगरपालिकेने दिली आहे.
उल्हासनगर : MIDCच्या जांभुळ जलशुद्धीकरण केंद्रावर गुरुत्ववाहिन्यांच्या उन्नतीकरण आणि तातडीच्या दुरुस्तीची कामे हाती घेतल्यामुळे १८ सप्टेंबर मध्यरात्रीपासून १९ सप्टेंबर मध्यरात्रीपर्यंत उल्हासनगर शहराचा पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. त्यानंतर २० सप्टेंबर रोजी पाणीपुरवठा कमी दाबाने होईल, असे उल्हासनगर महानगरपालिकेने कळविले आहे.
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (MIDC) जांभुळ जलशुद्धीकरण केंद्रातील जलाशय (HSR) येथे गुरुत्ववाहिनी क्रमांक १, २ व ३ वर उन्नतीकरण व देखभालीची कामे सुरू केल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कॅम्प क्र.४, ५ तसेच कॅम्प क्र.३ च्या काही भागांमध्ये पाणीपुरवठा प्रभावित होणार आहे. महापालिकेने स्पष्ट केले आहे की, या दुरुस्ती व उन्नतीकरण कामांमुळे भविष्यात शहराला अधिक सक्षम व सुरळीत पाणीपुरवठा मिळणार असून, ही तात्पुरती गैरसोय नागरिकांच्या हितासाठीच असल्याचा
संदेश प्रशासनाकडून देण्यात आला आहे. या काळात तसेच नागरिकांनी प्रशासनास सहकार्य करावे, अशी विनंती करण्यात आली आहे. तसेच सुविधेसाठी साथ द्यावी, असा संदेश प्रशासनाकडून देण्यात आला आहे.