

दिवसभर कामाचा ताण, सतत मोबाईलचा वापर, अनियमित खाण्यापिण्याच्या सवयी आणि धावपळीची जीवनशैली यामुळे अनेकांना रात्री झोपेची समस्या जाणवते. अंथरुणावर पडूनही तासनतास डोळ्याला डोळा लागत नाही. परिणामी दुसऱ्या दिवशी थकवा, चिडचिड आणि कामात एकाग्रता न राहण्याचा त्रास होतो. चांगली झोप ही केवळ आरामासाठी नाही, तर शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठीही तितकीच महत्त्वाची आहे. काही सोप्या सवयी अंगीकारल्यास रात्रीची झोप सुधारण्यास मदत होऊ शकते.
१. झोपण्यापूर्वी कोमट दूध प्या
रात्री झोपण्यापूर्वी कोमट दूध पिण्याची सवय फायदेशीर ठरू शकते. यामुळे शरीर रिलॅक्स होण्यास मदत होते आणि झोपेचे चक्र सुरळीत राहण्यास हातभार लागतो.
२. शरीर आणि मनाला द्या विश्रांती
झोपण्यापूर्वी काही मिनिटे शांत बसणे, खोल श्वास घेणे किंवा योगनिद्रेसारख्या रिलॅक्सेशन तंत्रांचा वापर करणे फायदेशीर ठरू शकते. यामुळे मनातील ताण कमी होतो.
३. पचनाकडे दुर्लक्ष करू नका
रात्री जेवण झाल्यानंतर काही वेळ हलके चालल्यास अन्न पचण्यास मदत होते. अपचन किंवा पोटातील अस्वस्थता कमी झाल्यास झोपही अधिक चांगली लागते.
४. स्नायूंना आराम देण्याचा प्रयत्न करा
शरीरातील तणाव झोपेचा मोठा शत्रू ठरतो. त्यामुळे झोपण्यापूर्वी स्नायूंना हळूहळू रिलॅक्स करण्याचे तंत्र वापरल्यास शरीर शांत होऊन झोप येण्यास मदत होऊ शकते.
५. स्क्रीन टाइम आणि कॅफिन कमी करा
रात्री उशिरापर्यंत मोबाईल, टीव्ही किंवा लॅपटॉपचा वापर केल्याने झोपेवर परिणाम होतो. तसेच संध्याकाळनंतर चहा, कॉफी किंवा कॅफिनयुक्त पेये टाळल्यास झोपेची गुणवत्ता सुधारू शकते.
चांगल्या झोपेसाठी आणखी काय कराल?
दररोज नियमित वेळेवर झोपणे, हलका व्यायाम करणे आणि तणाव नियंत्रणात ठेवणे या गोष्टीही तितक्याच महत्त्वाच्या आहेत. झोपेच्या समस्या दीर्घकाळ कायम राहत असतील तर तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे. कारण चांगली झोप म्हणजे निरोगी आयुष्याचा मजबूत पाया.