OTT मुळे तुम्हालाही झालीये Binge-watch ची सवय? सावधान! आरोग्याला होऊ शकतो मोठा धोका

डिजिटल क्रांती, स्वस्त झालेले इंटरनेट, OTT मुळे २४ तास कुठेही आवडत्या मालिका, शो, व्हिडिओ पाहण्याची सोय यामुळे अनेकांना Binge-watch ची सवय लागत आहे. मात्र, ही सवय किती घातक ठरू शकते याची तुम्हाला कल्पना आहे का? तज्ज्ञांच्या मते Binge-watch (बिंज-वॉच) मुळे डोळ्यांना गंभीर आजार होऊ शकतात.
OTT मुळे तुम्हालाही झालीये Binge-watch ची सवय? सावधान! आरोग्याला होऊ शकतो मोठा धोका
प्रातिनिधिक छायाचित्र - FreePik
Published on

डिजिटल क्रांती, स्वस्त झालेले इंटरनेट, OTT मुळे २४ तास कुठेही आवडत्या मालिका, शो, व्हिडिओ पाहण्याची सोय यामुळे अनेकांना Binge-watch ची सवय लागत आहे. मात्र, ही सवय किती घातक ठरू शकते याची तुम्हाला कल्पना आहे का? तज्ज्ञांच्या मते Binge-watch (बिंज-वॉच) मुळे डोळ्यांना गंभीर आजार होऊ शकतात. दृष्टी जाण्याचा किंवा अंधुक होण्याचा धोका संभवतो. याशिवाय आरोग्याच्या अन्य अनेक समस्या देखील उद्भवू शकतात. त्यामुळे वेळीच यावर नियंत्रण मिळवणे आवश्यक आहे. जाणून घ्या याविषयी सविस्तर माहिती

Binge-watch (बिंज-वॉच) म्हणजे नेमके काय?

बिंज-वॉच (Binge-watch) म्हणजे एखादी वेबसीरिज, शो, किंवा चित्रपटाचे एकापाठोपाठ अनेक भाग सलगपणे बघणे. ओटीटीवर आवडत्या वेबसिरीज, मालिका, शो, चित्रपट, गाणी, ट्रेंडिंग व्हिडिओ हे कधीही उपलब्ध असतात. तसेच उत्कंठा वाढवणारे भाग नंतर बघण्याऐवजी एकाच वेळी सगळे भाग पाहणे याला Binge-watch म्हणतात. थोडक्यात एखाद्या वेबसिरीजचा संपूर्ण सिझनमधील सगळे भाग एकदाच बघणे. याला कारण आपली उत्कंठा ताणून ठेवण्याऐवजी सगळं ताबडतोब आत्ताच हवे असणे.

Binge-watch (बिंज-वॉच) चे आरोग्यावरील दुष्परिणाम

डोळ्यांच्या आरोग्यावर परिणाम

Binge-watch ही सवय तुमच्या डोळ्यांचे आरोग्य बिघडवते. डोळे कोरडे पडणे, डोळ्यांवर अतिरिक्त ताण येणे, डोळे दुखायला लागणे, दृष्टी अंधुक होणे, मायोपिया, डिजिटल आय स्ट्रेनसारखे आजार होणे इत्यादी गंभीर समस्या निर्माण होतात.

डोके दुखी वाढणे

डोळे आणि डोके यांच्या आजारांचा जवळचा संबंध असतो. Binge-watch मुळे जसा डोळ्यांवर ताण येतो. तसाच डोक्यावरही ताण येतो. डोके दुखण्यासारख्या समस्या वाढतात.

निद्रानाश

रात्री झोपण्यापूर्वी खूप वेळ मोबाईलवर अशा वेबसिरीज बघत राहिल्याने झोपेच्या वेळेत बिघाड होतात. झोप व्यवस्थित होत नाही. निद्रानाश होण्याची दाट शक्यता असते.

वजन वाढणे, मानदुखी, पाठदुखी

तासन्‌तास एकाच ठिकाणी बसून राहिल्यामुळे शारीरिक हालचालींचा अभाव होतो. परिणामी वजन वाढणे, पाठदुखी, मानेचा त्रास, आणि स्थूलतेसारखे प्रश्न निर्माण होतात.

मानसिक आरोग्यावर परिणाम

काही सीरिजमध्ये हिंसा, गडद विषय किंवा नकारात्मक भावना अधिक असल्याने मानसिक तणाव, चिंता, किंवा नैराश्य वाढू शकते. तुम्ही जर खूप भावनिक असाल तर याचे मोठे दुष्परिणाम संभवतात.

खाण्याच्या सवयी बिघडणे

बिंज-वॉच करताना बरेच जण चिप्स, फास्ट फूड आणि साखरयुक्त पदार्थ सतत खातात, त्यामुळे पोषणमूल्य कमी आणि वजन वाढण्याची शक्यता निर्माण होते.

काय उपाय करावे?

स्वतःच्या बिंज-वॉच सवयीवर नियंत्रण मिळवणे हाच यातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे. एका वेळी केवळ ठाराविक भाग पाहणार, अशी मर्यादा स्वतःवर घालून घेणे.

वेबसिरीजच्या विषयापासून लांब जाण्यासाठी एखादे पुस्तक वाचणे, गणित सोडवणे, चालणे, खेळणे, वेगवेगळे छंद जोपासणे हे उपाय करता येतील.

सोबतच स्क्रीन टाईम कसा कमी करावा याचे नियोजन करणे

(Disclaimer: या लेखातील मुद्दे आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. याद्वारे आम्ही कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही. त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेणं आवश्यक आहे.)

logo
marathi.freepressjournal.in