आजच्या धकाधकीच्या जीवनात आरोग्याकडे दुर्लक्ष होताना दिसते. मात्र, काही सोप्या सवयी आपल्या आरोग्यासाठी मोठा फायदा ठरू शकतात. त्यापैकीच एक सवय म्हणजे गरम पाणी पिणे. आयुर्वेदातही गरम पाण्याला विशेष महत्त्व दिले आहे. जाणून घेऊया गरम पाणी पिण्याचे नेमके फायदे कोणते आहेत.
उपाशीपोटी गरम पाणी
गरम पाणी नियमितपणे प्यायल्याने पचनक्रिया सुधारते. बद्धकोष्ठता, गॅस, अपचन यांसारख्या समस्या कमी होण्यास मदत होते. सकाळी उपाशीपोटी गरम पाणी प्यायल्यास आतड्यांची हालचाल सुरळीत होते.
तसेच, वजन कमी करण्यासाठी गरम पाणी उपयुक्त ठरते. गरम पाणी शरीरातील चयापचय क्रिया वाढवते, त्यामुळे चरबी लवकर जळण्यास मदत होते. अनेक तज्ज्ञ वजन कमी करताना गरम पाणी पिण्याचा सल्ला देतात.
गरम पाणी पिण्यामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर टाकण्यास मदत होते. घाम आणि लघवीद्वारे टॉक्सिन्स बाहेर पडतात, ज्यामुळे त्वचा स्वच्छ आणि तेजस्वी राहते.
थंडी, सर्दी, खोकला किंवा घसा खवखवणे अशा त्रासांवरही गरम पाणी गुणकारी ठरते. गरम पाणी घसा स्वच्छ ठेवते आणि श्वसनमार्गातील कफ कमी करण्यास मदत करते.
याशिवाय, गरम पाणी पिण्याने रक्ताभिसरण सुधारते, स्नायूंना आराम मिळतो आणि सांधेदुखीचा त्रासही काही प्रमाणात कमी होतो.
आरोग्य तज्ज्ञांच्या मते, अतिशय गरम पाणी न पिता कोमट किंवा गरम पाणी योग्य प्रमाणात पिणे फायदेशीर ठरते. मात्र कोणताही आजार असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे