

लग्नाचा दिवस प्रत्येक नवरीसाठी खास असतो. त्या दिवशी आपण सुंदर, आत्मविश्वासपूर्ण आणि उठून दिसावं, अशी इच्छा प्रत्येकाच्या मनात असते. मात्र फक्त महागडी किंवा ट्रेंडिंग साडी नेसल्याने ब्राइडल लूक परफेक्ट होतोच, असं नाही. साडी निवडताना आपल्या बॉडी शेपनुसार विचार केल्यास लूक अधिक ग्रेसफुल दिसतो.
आज बाजारात पैठणी, कांजीवरम, बनारसी, सिल्क, शिफॉन अशा अनेक प्रकारच्या साड्या उपलब्ध आहेत. पण “ही साडी मला शोभेल का?” किंवा “मी यात जाड दिसेन का?” असे प्रश्न अनेक नवऱ्यांच्या मनात असतात. प्रत्येक स्त्रीची शरीरयष्टी वेगळी असल्याने, साडीची निवडही तशीच समजूतदारपणे करायला हवी.
लग्नाच्या विविध विधींसाठी साडी निवडताना तुमच्या बॉडी शेपनुसार कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात, ते पाहूया...
पिअर शेप बॉडी असल्यास
ज्यांच्या शरीराचा खालचा भाग (Hips) जाड असतो, त्यांनी शक्यतो शिफॉन किंवा जॉर्जेटसारख्या हलक्या फॅब्रिकच्या साड्या निवडाव्यात. यामुळे शरीर अधिक सुडौल दिसते. घट्ट ड्रेपिंग किंवा मरमेड स्टाईल साडी टाळावी. वरचा भाग हायलाईट करण्यासाठी हेवी एम्ब्रॉयडरी, पफ स्लीव्हज किंवा बोट नेक ब्लाऊज वापरल्यास लूक अधिक आकर्षक दिसतो.
ॲपल शेप बॉडी असल्यास
पोट किंवा छातीचा भाग जाड असलेल्या नवऱ्यांनी जाड बॉर्डरच्या सिल्क साड्या टाळाव्यात. त्याऐवजी हलक्या, फ्लोइंग फॅब्रिकच्या साड्या निवडाव्यात. बारीक बॉर्डर, साधा डिझाइन आणि थोडे लांब ब्लाऊज यामुळे शरीराचा वरचा भाग संतुलित दिसतो आणि लूक सुटसुटीत वाटतो.
अवरग्लास शेप बॉडी असल्यास
खांदे आणि हिप्स समान प्रमाणात असतील आणि कंबर बारीक असेल, तर जवळपास सर्वच प्रकारच्या साड्या छान दिसतात. कांजीवरम, पैठणी किंवा बनारसीसारख्या हेवी साड्या या बॉडी शेपवर विशेष उठून दिसतात. कंबर अधिक हायलाईट करण्यासाठी कमरपट्टा किंवा वेस्ट बेल्ट वापरता येतो.
रेक्टँगल शेप बॉडी असल्यास
ज्या नवऱ्या मुलीचा बांधा सरळ असतो, त्यांच्यासाठी रफल साड्या किंवा लेयर्ड डिझाइन उत्तम पर्याय ठरतात. ऑर्गनझा, बनारसी किंवा कॉटन सिल्क साड्या शरीराला भरलेला लूक देतात. साडीवर डिझाइनर बेल्ट लावल्यास कंबर असल्याचा भास निर्माण होतो.
उंच नवरींसाठी
उंच फ्रेम असलेल्या नवरींवर मोठ्या आणि हेवी बॉर्डरच्या साड्या खूप सुंदर दिसतात. यामुळे उंची आणि साडीचा लूक दोन्ही संतुलित राहतो.
कमी उंचीसाठी
उंची कमी असल्यास बारीक बॉर्डरच्या साड्या निवडाव्यात. साडी आणि ब्लाऊज एकाच रंगात ठेवल्यास उंची जास्त असल्याचा भास होतो.
साडी निवडताना ट्रेंडपेक्षा स्वतःच्या शरीरयष्टीला काय शोभतं, याकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे. योग्य साडी, योग्य ड्रेपिंग आणि आत्मविश्वास यामुळेच नवरीचा ब्राइडल लूक खऱ्या अर्थाने खुलून येतो.