

थंडीचे दिवस सुरू झालेत आणि मध्येच पडणाऱ्या पावसामुळे हवेत गारवा आणखीनच वाढलाय. या बदलत्या हवामानात सर्दी-खोकल्याचा त्रास होणं अगदी सामान्य आहे. अशा वेळी गरमागरम काहीतरी प्यायलं, की शरीरालाही ऊब मिळते आणि घश्यालाही आराम मिळतो. सूप हा अशा हवामानातला उत्तम उपाय आहे. त्यातही क्रिम गार्लिक मशरूम सूप केवळ स्वादिष्ट नाही, तर सर्दी-खोकल्यावर आराम देणारं आणि आरोग्यदायीही आहे. चला तर मग जाणून घेऊया हे सूप काही मिनिटांत घरच्या घरी कसं बनवायचं.
४ ते ५ मशरूम
१/२ कप चिरलेला कांदा
२ ते ३ लसूण पाकळ्या
१/२ इंच आले
३ ते ४ कोथिंबीर काड्या
थोडी कोथिंबीर सजावटीसाठी
१ चमचा बटर
१ चमचा मिरपूड
चवीनुसार मीठ
१/२ कप दूध
१ चमचा लिंबू रस
आवश्यकतेनुसार पाणी
मशरूम, कांदा, कोथिंबीर काड्या, आलं, लसूण आणि लिंबू हे सर्व चिरून घ्या. पॅनमध्ये बटर गरम करून त्यात आलं, लसूण, कांदा आणि कोथिंबीर काड्या टाका. हे मिश्रण १-२ मिनिटे परता. यानंतर त्यात मशरूम, मीठ आणि मिरपूड घालून एकत्र करा. २-३ मिनिटे शिजू द्या. नंतर हे मिश्रण थंड झाल्यावर दूध घालून मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. मशरूमचे दोन-दोन तुकडे करून घ्या. कढईत थोडं ऑलिव्ह ऑईल टाकून त्यात मशरूम, बारीक चिरलेला लसूण, मीठ आणि काळी मिरी टाकून परता. मशरूम चांगले शिजवा. दुसऱ्या पॅनमध्ये बटर वितळवा. त्यात थोडा मैदा टाका आणि हलक्या आचेवर परता. मैद्याचा रंग बदलला की त्यात मशरूम आणि व्हेजिटेबल स्टॉक (किंवा पाणी) टाका. थोडं थाईम घाला आणि हे मिश्रण वारंवार हलवत राहा. सूप घट्ट होऊ लागल्यावर त्यात थोडासा सोया सॉस आणि फ्रेश क्रिम टाका. सर्व घटक एकत्र मिसळा आणि काही मिनिटं उकळा.
गरमागरम सूप बाऊलमध्ये ओतून त्यावर बारीक चिरलेली कोथिंबीर आणि थोडी मिरपूड शिंपडून हे सूप सर्व्ह करा आणि आनंद घ्या!