
दिवाळीचा सण म्हणजे सकारत्मकतेचा उत्सव! पण, या दिवाळीच्या उत्सवाची सुरुवात ज्या दिवसाने होते नरक चतुर्दशीने, त्या दिवसाला एक खास पारंपरिक आणि आध्यात्मिक अर्थ आहे. पहाटे उठून अंगाला उटणे लावणे, स्नान करणे आणि मग कारिट नावाचं एक कडू फळ फोडण्याची प्रथा..ही परंपरा आजही महाराष्ट्रात अनेक घरांमध्ये जपली जाते. पण, तुम्हाला माहिती आहे का, हे कारिट फळ का फोडतात?
नरकासुराच्या अंताची आठवण
हिंदू पुराणांनुसार प्राग्ज्योतिषपुरात एकदा नरकासुर नावाचा असुर राजा राज्य करत होता. भूमातेचा पुत्र असलेला हा राक्षस अत्यंत क्रूर आणि गर्विष्ठ होता. त्याने देव, ऋषी, स्त्रिया यांच्यावर अत्याचार सुरू केले. अगदी १६ हजार राजकन्यांना बंदिवासात ठेवले! या अत्याचाराने संपूर्ण सृष्टी त्रस्त झाली.
देवांनी श्रीकृष्णाकडे मदतीसाठी प्रार्थना केली. त्यानंतर कृष्णाने गरुडावर स्वार होऊन नरकासुराचा वध केला आणि सर्वांना मुक्त केले. नरकासुराने मृत्यूपूर्वी कृष्णाकडे शेवटची एक विनंती केली "आजच्या तिथीला जो मंगल स्नान करेल त्याला नरकाची पीडा भोगावी लागू नये." कृष्णाने त्याला हा वर दिला. त्यानंतर आश्विन वद्य चतुर्दशी 'नरक चतुर्दशी' म्हणून साजरी केली जाऊ लागली.
कारिट फोडण्याचं कारण
या दिवशी कारिट फोडणे म्हणजे नरकासुराच्या वधाचं प्रतीकात्मक रूप. कारिट हे कडू आणि कठीण साल असलेलं फळ, म्हणजे जणू दुष्टतेचा नाश करणारा 'कटू' अनुभव.
पहाटे लवकर उठून तुळशी वृंदावनाजवळ डाव्या पायाच्या अंगठ्याने कारिट चिरडले जाते.
हे म्हणजे नरकासुरावर पाय ठेवून त्याचा नाश, अहंकार, कटुता आणि नकारात्मकतेचा अंत करण्याचे प्रतीक.
यानंतर अभ्यंगस्नानाने शरीर, मन आणि आत्मा शुद्ध होतो. स्त्रिया घरातील सर्वांना उटणे लावतात, आणि नंतर कुंकवाचा टिळा लावून मंगलमय दिवाळीची सुरुवात होते.
कारिटाच्या कडूपणातून आपण आपल्या आयुष्यातील कटुता, मत्सर, नकारात्मकता फोडून टाकतो आणि अभ्यंगस्नानानंतर गोड फराळ, दिवे, आनंद यांचं स्वागत करतो.