

दिवाळीचा सण म्हटलं की घरात पाहुण्यांची लगबग, फराळाची मेजवानी आणि मित्रमंडळींसोबत पार्टीचा उत्साह असतो. अशा वेळी पाहुण्यांना नेहमीचे सरबत किंवा कोल्ड ड्रिंक्स देण्याऐवजी काहीतरी हटके पेय सर्व्ह करायचं असेल, तर 'स्पायसी मसाला कोक' हा उत्तम पर्याय आहे. कोकच्या नेहमीच्या गोडसर चवीला लाल तिखट, चाट मसाला, लिंबाचा आंबटपणा आणि जलपेनोचा तिखटपणा अशी भन्नाट फोडणी दिली जाते. विशेष म्हणजे, हे ड्रिंक तयार करण्यासाठी फार साहित्य किंवा वेळ लागत नाही. अवघ्या पाच मिनिटांत तयार होणारे हे चटपटीत पेय दिवाळी पार्टीची रंगत नक्कीच वाढवेल.
स्पायसी मसाला कोक बनवण्यासाठी साहित्य -
थंड कोक किंवा डाएट कोक
१ चमचा लाल तिखट
१ चमचा चाट मसाला
चवीनुसार मीठ
१ लिंबू
जलपेनोचे काप
बर्फाचे तुकडे
कृती -
१. सर्वप्रथम एका छोट्या बाऊलमध्ये लाल तिखट, चाट मसाला आणि मीठ एकत्र करून मसाल्याचे मिश्रण तयार करा.
२. आता ग्लासच्या कडांना लिंबाचा रस लावा. त्यानंतर ग्लासची कड तयार केलेल्या मसाल्यात बुडवा. त्यामुळे ग्लासच्या कडांना मसाल्याचा छान थर लागेल.
३. उरलेले मसाल्याचे मिश्रण एका बाजूला ठेवा. दुसऱ्या बाऊलमध्ये बर्फाचे तुकडे घेऊन त्यावर हा मसाला शिंपडा आणि व्यवस्थित मिक्स करा.
४. मसाला लावलेले बर्फाचे तुकडे ग्लासमध्ये टाका. त्यात लिंबाचे काही थेंब आणि जलपेनोचे काप घाला.
५. शेवटी ग्लासमध्ये थंड कोक किंवा डाएट कोक ओता. तुमचे चटपटीत 'स्पायसी मसाला कोक' तयार आहे. हे ड्रिंक लगेच सर्व्ह करा.
यंदाच्या दिवाळी पार्टीमध्ये नेहमीच्या कोल्ड ड्रिंक्सऐवजी काहीतरी वेगळं सर्व्ह करायचं असेल, तर ही झटपट रेसिपी नक्की ट्राय करू शकता.