

उन्हाळा आणि पावसाळ्यात फूड पॉयझनिंगच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढताना दिसतात. वाढते तापमान आणि हवेतली आर्द्रता यामुळे जंतू वेगाने वाढतात आणि अन्न दूषित होण्याचा धोका अधिक वाढतो. त्यामुळे फूड पॉयझनिंग ही केवळ साधी पोटदुखी नसून गंभीर आरोग्य समस्या ठरू शकते, असा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.
तज्ज्ञांच्या मते, उष्ण आणि दमट वातावरणात सॅल्मोनेला, ई-कोलाई, स्टॅफिलोकोकस आणि व्हिब्रिओ कॉलरीसारखे जीवाणू झपाट्याने वाढतात. विशेषतः व्यवस्थित साठवण न केलेले अन्न, रस्त्यावरील खाद्यपदार्थ, उघड्यावर ठेवलेली फळं, पालेभाज्या आणि दूषित पाणी यामुळे फूड पॉयझनिंगचा धोका वाढतो.
पावसाळ्यात पूरस्थितीमुळे सांडपाणी आणि पिण्याचं पाणी एकत्र मिसळण्याचा धोका वाढतो. त्यामुळे जलजन्य आजार आणि दूषित अन्नामुळे होणारे आजार अधिक गंभीर ठरू शकतात.
फूड पॉयझनिंगबाबतचे सामान्य गैरसमज
तज्ज्ञांच्या मते, अन्न चांगलं दिसत असेल किंवा वास येत नसेल तर ते सुरक्षित असतंच असं नाही. अन्न पुन्हा गरम केल्याने ते पूर्णपणे सुरक्षित होतं, हा समज चुकीचा आहे. काही जीवाणूंचे विषारी घटक गरम केल्यानंतरही नष्ट होत नाहीत. फूड पॉयझनिंग नेहमी सौम्य असतं, असं नाही. दुर्लक्ष केल्यास डिहायड्रेशन, किडनीचे विकार किंवा इतर गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.
फूड पॉयझनिंगची लक्षणं कोणती?
फूड पॉयझनिंग झाल्यानंतर काही तासांत किंवा दोन दिवसांत लक्षणं दिसू शकतात. यामध्ये -
मळमळ
उलट्या
जुलाब
पोटदुखी
ताप
काही वेळा शौचातून रक्त जाणे
ही लक्षणं गंभीर स्वरूपात दिसल्यास किंवा ४८ तासांपेक्षा जास्त काळ कायम राहिल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा, असं डॉक्टरांनी सांगितलं.
फूड पॉयझनिंग टाळण्यासाठी काय कराल?
जेवण बनवण्यापूर्वी आणि शौचानंतर हात स्वच्छ धुवा.
शिजवलेलं अन्न जास्त वेळ बाहेर ठेवू नका.
फक्त उकळलेलं किंवा शुद्ध केलेलं पाणी प्या.
कच्चं किंवा अर्धवट शिजलेलं मांस टाळा.
रस्त्यावर कापून ठेवलेली फळं खाणं टाळा.
बाहेर खाताना स्वच्छता ठेवणाऱ्या ठिकाणांची निवड करा.
डॉक्टरांच्या मते, थोडी काळजी घेतल्यास फूड पॉयझनिंगसारख्या समस्या टाळता येऊ शकतात.