

दररोज नाश्त्यात काय बनवायचं हा अनेक गृहिणींसमोरचा मोठा प्रश्न असतो. अशावेळी चविष्ट, पौष्टिक आणि पटकन तयार होणारा पदार्थ मिळाला तर दिवसाची सुरुवात आणखी खास होते. जर तुम्हालाही हेल्दी आणि वजन नियंत्रणात ठेवणारा नाश्ता हवा असेल, तर पालक पनीर उत्तपम हा उत्तम पर्याय ठरू शकतो. पालकातील पोषक घटक, पनीरमधील प्रोटीन आणि रव्याची हलकी चव यामुळे हा पदार्थ लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल.
साहित्य :
१ कप पालक प्युरी
१ कप रवा
अर्धा कप दही
१ पाकीट फ्रूट सॉल्ट
चवीनुसार मीठ
अर्धा कप किसलेलं पनीर
अर्धा कांदा (बारीक चिरलेला)
अर्धा टोमॅटो (बारीक चिरलेला)
१ टीस्पून हिरवी मिरची (बारीक चिरलेली)
१ टेबलस्पून कोथिंबीर
कृती :
सर्वप्रथम एका भांड्यात रवा घ्या. त्यामध्ये दही, मीठ आणि पालक प्युरी घालून मिश्रण एकजीव करून घ्या. आवश्यकतेनुसार थोडं पाणी घालून बॅटर तयार करा आणि काही मिनिटं बाजूला ठेवा.
यानंतर एका वेगळ्या भांड्यात कांदा, टोमॅटो, हिरवी मिरची, कोथिंबीर, किसलेलं पनीर आणि चिमूटभर मीठ घालून टॉपिंग तयार करा. आता बॅटरमध्ये फ्रूट सॉल्ट आणि थोडंसं पाणी घालून हलक्या हाताने मिक्स करा. त्यामुळे उत्तपम अधिक मऊ आणि फुललेले होतील.
तवा गरम करून त्यावर थोडं तेल लावा. त्यानंतर एक मोठा चमचा बॅटर टाकून हलक्या हाताने पसरवा. वरून तयार केलेलं टॉपिंग घालून हलकं दाबा. उत्तपम एका बाजूने भाजल्यानंतर दुसऱ्या बाजूनेही सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. गरमागरम पालक पनीर उत्तपम हिरवी चटणी किंवा सॉसबरोबर सर्व्ह करा.
टिप्स :
अधिक पौष्टिक बनवण्यासाठी बॅटरमध्ये किसलेलं गाजर किंवा बीटही घालू शकता.
वजन कमी करण्याचा विचार करत असाल, तर कमी तेलात उत्तपम भाजा.
मुलांना आवडण्यासाठी वरून थोडंसं चीजही घालू शकता.
बॅटर खूप पातळ होणार नाही याची काळजी घ्या.