

मकर संक्रांतीचा सण तिळगुळाशिवाय अपूर्णच मानला जातो. ‘तिळगुळ घ्या, गोड गोड बोला’ ही परंपरा जपताना अनेक घरांमध्ये खास तिळाचे लाडू बनवले जातात. हे लाडू केवळ चविष्टच नाहीत, तर हिवाळ्यात शरीराला उष्णता देणारे आणि पौष्टिकही असतात. कमी साहित्यात आणि अगदी सोप्या पद्धतीने हे लाडू घरी कसे बनवायचे, ते जाणून घेऊया.
साहित्य :
पांढरे तीळ - १ कप
गूळ (किसलेला किंवा चिरलेला) - पाऊण कप
शेंगदाणे (भाजलेले, सोललेले व कुटलेले) - अर्धा कप
तूप - २ टेबलस्पून
वेलची पूड - अर्धा टीस्पून
सुके खोबरे (किसलेले -ऐच्छिक) - २ टेबलस्पून
कृती :
कढईमध्ये तीळ मंद आचेवर हलके गुलाबी होईपर्यंत भाजून घ्या. भाजलेले तीळ थंड करून थोडेसे कुटून घ्या.
त्याच कढईत थोडे तूप घालून किसलेला गूळ घाला आणि मंद आचेवर वितळू द्या. गूळ जास्त उकळू देऊ नका.
गूळ पूर्ण वितळल्यानंतर त्यात कुटलेले तीळ, शेंगदाण्याची पूड आणि किसलेले खोबरे घाला.
सर्व मिश्रण नीट एकजीव करून त्यात वेलची पूड मिसळा.
मिश्रण किंचित थंड झाल्यावर हाताला थोडे तूप लावून लहान-लहान लाडू वळा.
तयार झालेले तिळाचे लाडू हवाबंद डब्यात ठेवल्यास अनेक दिवस टिकतात.
आरोग्यदायी फायदे
तिळामध्ये कॅल्शियम, लोह आणि प्रथिने भरपूर प्रमाणात असतात. हिवाळ्यात सांधेदुखी, थंडी आणि अशक्तपणा दूर ठेवण्यासाठी तिळाचे लाडू उपयुक्त ठरतात. संक्रांतीच्या सणानिमित्त घरच्या घरी बनवलेले तिळाचे लाडू नातेवाईक व मित्रांना देत गोड नातेसंबंध जपण्याची परंपरा आजही अनेक घरांमध्ये कायम आहे.