

घरच्या जेवणात रोज तीच भाजी-चपाती खाऊन कंटाळा आला असेल, तर काहीतरी झटपट आणि चविष्ट साईड डिश बनवण्याचा विचार नक्कीच मनात येतो. अशावेळी 'कांदा पापड चटणी' हा परफेक्ट पर्याय ठरतो. कमी वेळात, घरच्या उपलब्ध साहित्यांपासून तयार होणारी ही चटणी जेवणाची चव अनेक पटींनी वाढवते. कांदा, शेंगदाणे आणि कुरकुरीत पापड यांचा एकत्रित स्वाद म्हणजे अगदी लज्जतदार अनुभव!
साहित्य :
मध्यम आकाराचे कांदे (जाडसर कापलेले) - २
भाजलेले उडीद डाळ पापड - ६
लसूण पाकळ्या - १० ते १२
हिरव्या मिरच्या - ४
भाजलेले शेंगदाणे - अर्धा कप
तेल - ३ टेबलस्पून
जिरे - १ टीस्पून
टोमॅटो (चिरलेला) - १ छोटा
मीठ - चवीनुसार
कोथिंबीर (चिरलेली) - २ ते ३ टेबलस्पून
कृती :
सर्वप्रथम खलबत्त्यात लसूण, हिरव्या मिरच्या आणि भाजलेले शेंगदाणे टाकून जाडसर कुटून घ्या. कढईत तेल गरम करून त्यात जिरे टाका. जिरे तडतडले की त्यात कांदा घालून हलका सोनेरी होईपर्यंत परता. आता तयार केलेले कुटलेले मिश्रण घालून २ ते ३ मिनिटे परता. त्यानंतर टोमॅटो आणि मीठ घालून १ ते २ मिनिटे शिजवा. शेवटी पापड हाताने कुस्करून घाला, कोथिंबीर टाका आणि २ ते ३ मिनिटे परतून गॅस बंद करा. गरमागरम चटणी सर्व्ह करा.
टिप्स :
पापड शेवटी घातल्यास त्याचा कुरकुरीत टेक्स्चर टिकून राहतो.
जास्त तिखट हवे असल्यास मिरच्यांचे प्रमाण वाढवा.
लसूण आवडीप्रमाणे कमी-जास्त करू शकता.
ही चटणी भाकरी, पोळी किंवा वरण-भातासोबत अप्रतिम लागते.
थोडंसं लिंबू किंवा कैरी घातल्यास चटणीला छान चव येते.