

हिवाळ्यात थंड हवामानामुळे शरीराला उष्णता आणि ऊर्जा देणाऱ्या पदार्थांची गरज भासते. अशा वेळी सकाळच्या नाश्त्यासाठी कोबी-मटार पराठे हा एक उत्तम आणि आरोग्यदायी पर्याय ठरू शकतो. कोबीतील फायबर आणि मटारमधील प्रथिने शरीरासाठी उपयुक्त असून हे पराठे चवीलादेखील रुचकर लागतात.
घरच्या-घरी अगदी सोप्या पद्धतीने हे पराठे तयार करता येतात. गरमागरम पराठे दही, लोणी किंवा लोणच्यासोबत खाल्ल्याने त्यांची चव वाढते.
साहित्य :
बारीक चिरलेली कोबी - १ कप
उकडलेले मटार - अर्धा कप
गव्हाचे पीठ - २ कप
हिरवी मिरची - १ (बारीक चिरलेली)
आले - १ चमचा (किसलेले)
जिरे - अर्धा चमचा
हळद - चिमूटभर
लाल तिखट - चवीनुसार
मीठ - चवीनुसार
बारीक चिरलेली कोथिंबीर - आवडीनुसार
तेल किंवा तूप - पराठे भाजण्यासाठी
कृती :
प्रथम एका मोठ्या भांड्यात कोबी, मटार, हिरवी मिरची, आले, जिरे, हळद, लाल तिखट, मीठ आणि कोथिंबीर घालून नीट मिसळा. त्यानंतर त्यात गव्हाचे पीठ घालून थोडे-थोडे पाणी टाकून मऊ कणीक मळून घ्या. कणीक १० मिनिटे झाकून ठेवा.
यानंतर कणकेचे मध्यम आकाराचे गोळे करून त्याचे पराठे लाटा. गरम तव्यावर थोडे तूप किंवा तेल टाकून पराठे दोन्ही बाजूंनी सोनेरी रंग येईपर्यंत भाजा.
टीप: गरमागरम कोबी-मटार पराठे दही, लोणी किंवा हिरव्या चटणीसोबत सर्व्ह करा.