

गरमागरम ब्रेड ऑम्लेटची चव घरच्या नाश्त्यात अनुभवायला कोणालाही आवडेल. अगदी मोजक्या साहित्यात आणि कमी वेळेत तयार होणारा ब्रेड ऑम्लेट सँडविच हा नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळच्या हलक्या भुकेसाठी परिपूर्ण पर्याय आहे. स्ट्रीट फूडसारखी चव आणणारा ब्रेड ऑम्लेट सँडविच कसा बनवायचा, चला जाणून घेऊया.
साहित्य :
अंडी - २
मीठ - चिमूटभर
हळद - अर्धा टीस्पून
बारीक चिरलेली हिरवी मिरची - आवडीनुसार
बारीक चिरलेला कांदा - १
बारीक चिरलेली कोथिंबीर - १ टीस्पून
ब्रेड स्लाइस - २ (मिल्क ब्रेड / ब्राउन ब्रेड / होल व्हीट)
काळी मिरी पूड - चिमूटभर
मेयोनीज - आवडीनुसार
सॉस - आवडीनुसार
कृती :
दोन अंडी एका भांड्यात फोडून त्यात मीठ आणि हळद घालून नीट फेटून घ्या. यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि कोथिंबीर घाला. सर्व मिश्रण नीट फेटून बाजूला ठेवा. तव्यावर तेल गरम करा. गरम तव्यावर अंड्याचं मिश्रण ओतून सर्वत्र समान पसरवा. त्यावर दोन ब्रेडच्या स्लाइस ठेवा. यासाठी तुम्ही कोणताही ब्रेड वापरू शकता. त्यावर काळी मिरीची पावडर टाका. मध्यम आचेवर साधारण ३० सेकंद शिजवून घ्या. यानंतर ऑम्लेटसह ब्रेड पलटवून, ब्रेडवर ऑम्लेट दुमडा. अर्धा चमचा लोणी किंवा तेल घालून ब्रेड दोन्ही बाजूंनी खमंग होईपर्यंत भाजा. इच्छेनुसार एका बाजूला थोडं मेयोनीज लावलं तर एक वेगळी टेस्ट येऊ शकेल.
गरमागरम ब्रेड ऑम्लेट सँडविच चार तुकड्यांत कापून दिला आणि सोबत सॉस असेल तर तो नाश्ता, टिफिन किंवा झटपट स्नॅक म्हणूनही उत्तम लागतो. बाहेरच्या फूडपेक्षा स्वच्छ, घरगुती आणि तितकाच चविष्ट असा हा पदार्थ नक्की करून पाहा.
टीप : ब्रेड ऑम्लेट खरपूस भाजला तर अधिक रुचकर आणि चविष्ट लागतो. त्यात जर कोणता मसाला वापरायचा असेल तर आवडीनुसार तुम्ही तोही वापरू शकता.