

सकाळची घाई, मुलांचा डबा, नाश्ता आणि त्यातच रोज तेच तेच पदार्थ देण्याचा कंटाळा… अशावेळी झटपट, चविष्ट आणि वेगळा असा पर्याय हवा असेल, तर कांदा-कोथिंबीर पराठा हा परफेक्ट उपाय ठरतो. कमी साहित्य, कमी वेळ आणि मुलांना आवडेल असा स्वाद, यामुळे हा पराठा शाळेच्या डब्यासाठी आणि नाश्त्यासाठी अगदी योग्य आहे.
साहित्य
गव्हाची कणिक - १ वाटी
मध्यम आकाराचा कांदा - १ (अगदी बारीक चिरलेला)
कोथिंबीर - ३ ते ४ टेबलस्पून (बारीक चिरलेली)
हळद - १ टीस्पून
जिरेपूड - १ टीस्पून
धनेपूड - १ टीस्पून
चाट मसाला - १ टीस्पून
पावभाजी मसाला - १ टीस्पून
लाल तिखट - चवीनुसार
मीठ - चवीनुसार
लिंबाचा रस - अर्ध्या लिंबाचा
तूप किंवा तेल - पराठा भाजण्यासाठी
कृती
सर्वप्रथम नेहमीप्रमाणे गव्हाची कणिक मळून घ्या आणि ती ५ ते ७ मिनिटे झाकून ठेवा. यामुळे कणिक मऊ होते आणि पराठा लाटताना त्रास होत नाही. कणिक भिजत असताना एका मोठ्या भांड्यात बारीक चिरलेला कांदा घ्या. त्यात कोथिंबीर, हळद, लाल तिखट, जिरेपूड, धनेपूड, चाट मसाला आणि पावभाजी मसाला घालून हलक्या हाताने मिसळा. शेवटी मीठ आणि लिंबाचा रस घालून पुन्हा एकदा मिश्रण एकत्र करा.
आता कणकेचा लहान गोळा घ्या, तो थोडासा लाटून त्यात तयार केलेले कांदा-कोथिंबीरचे मिश्रण ठेवा. कडा व्यवस्थित बंद करून हलक्या हाताने पराठा लाटून घ्या. गरम तव्यावर तूप किंवा तेल लावून पराठा दोन्ही बाजूंनी खमंग भाजून घ्या. गरमागरम कांदा-कोथिंबीर पराठा तयार! 🫓
टिप्स
कांद्याच्या मिश्रणात मीठ आणि लिंबाचा रस शेवटीच घाला, नाहीतर कांद्याला जास्त पाणी सुटते.
मुलांसाठी पराठा करत असाल तर तिखट कमी ठेवू शकता.
डब्यासाठी पराठा करताना वरून थोडंसं तूप लावल्यास तो मऊ राहतो.
जास्त पराठे करायचे असतील तर कांदा आणि मसाले आधी मिसळून ठेवा; मात्र मीठ-लिंबू प्रत्येक वेळी थोड्या प्रमाणातच घाला.
हा कांदा-कोथिंबीर पराठा चटणी, दही किंवा साध्या लोणच्यासोबत दिला तरी छान लागतो.