

पावसाळा सुरू होताच वातावरणात गारवा वाढतो, पण त्याचबरोबर अन्न आणि पाण्यामुळे होणाऱ्या संसर्गजन्य आजारांचाही धोका वाढतो. दूषित पाणी, ओलसर हवामान आणि अन्नपदार्थांमध्ये झपाट्याने वाढणारे जंतू यामुळे अतिसार, टायफॉईड, कावीळ, फूड पॉइझनिंग आणि पोटाच्या संसर्गाचे प्रमाण वाढते. त्यामुळे या काळात योग्य आहार, स्वच्छता आणि सुरक्षित अन्न सेवन करणे अत्यंत महत्त्वाचे असल्याचे आरोग्य तज्ज्ञ सांगतात.
पावसाळ्यात आजार का वाढतात?
उष्णता, जास्त आर्द्रता आणि साचलेले पाणी यामुळे जिवाणू व बुरशी वेगाने वाढतात. अनेक ठिकाणी पावसामुळे सांडपाणी आणि पिण्याच्या पाण्याच्या पाइपलाइन एकत्र मिसळण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे कॉलरा, टायफॉईड, गॅस्ट्रोएन्टेरायटिस आणि इतर पोटाचे संसर्ग होण्याची शक्यता वाढते.
रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवणे गरजेचे
तज्ज्ञांच्या मते, मुलांसह सर्वांनी संतुलित आणि प्रथिनयुक्त आहार घ्यावा. दूध, भाज्या, फळे आणि पौष्टिक पदार्थांचा आहारात समावेश करावा. तळलेले पदार्थ अधूनमधून चालतील, मात्र रोजचे जंक फूड टाळावे. गरम आणि ताजे शिजवलेले अन्न खाण्यावर भर द्यावा.
पिण्याच्या पाण्याची घ्या विशेष काळजी
पाणी उकळून किंवा आरओ-यूव्ही फिल्टरमधून शुद्ध करूनच प्या.
बाहेरचे बर्फ घातलेले सरबत, ऊसाचा रस, लिंबूपाणी किंवा पाणीपुरीचे पाणी टाळा.
घरात पाणी स्टील किंवा तांब्याच्या भांड्यात साठवा आणि दररोज बदला.
स्ट्रीट फूड खाताना काय लक्षात ठेवाल?
काय खावे?
गरमागरम वडापाव
समोसा
कचोरी
कांदा भजी
भाजलेले मक्याचे कणीस
गरम चहा
काय टाळावे?
भेळ, शेवपुरी
दहीवडा
मेयोनीज असलेले रोल
कच्चे कांदे, कोबी आणि कोथिंबीर घातलेले पदार्थ
फळे आणि भाज्या कशा खाव्यात?
फळे आणि भाज्या स्वच्छ वाहत्या पाण्यात धुवा.
पालेभाज्या मीठ, व्हिनेगर किंवा बेकिंग सोडा घालून धुवाव्यात.
बाहेर विकली जाणारी कापलेली फळे खाऊ नयेत.
केळी, संत्री, डाळिंब, पेरू यांसारखी साल असलेली फळे निवडा.
कच्च्या सॅलडऐवजी शिजवलेल्या भाज्या आणि गरम सूप घ्या.
स्वयंपाकघर स्वच्छ ठेवणेही तितकेच महत्त्वाचे
तांदूळ, डाळी, पीठ हवाबंद डब्यात साठवा.
चॉपिंग बोर्ड, सुरी आणि स्वयंपाकघर नियमित निर्जंतुक करा.
शिजवलेले अन्न दोन तासांपेक्षा जास्त वेळ बाहेर ठेवू नका.
उरलेले अन्न फ्रिजमध्ये ठेवा आणि पुन्हा खाताना चांगले गरम करा.
दूध, दही, पनीर आणि मांसाहारी पदार्थ योग्य तापमानातच साठवा.
रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी काय खावे?
आले
लसूण
हळद
ओवा
जिरे
काळी मिरी
तुळशीचा चहा
दालचिनीचा चहा
घरचे दही आणि ताक
गरम खिचडी, डाळ-भात आणि सूप
पावसाळ्यात 'या' गोष्टी नक्की टाळा
कच्चे सॅलड
रस्त्यावरचे कापलेले फळ
दूषित पाणी
थंड पेये
वारंवार गरम केलेले अन्न
उघड्यावर ठेवलेले पदार्थ
जंक फूडचे अतिसेवन