

आजकाल वाढलेलं वजन आणि पोटावर साचलेली चरबी ही अनेकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. व्यायामासोबत योग्य आहार नसेल, तर वजन कमी करणं कठीण होतं. विशेषतः सकाळचा नाश्ता स्किप केल्यामुळे मेटाबॉलिझम मंदावतो आणि उलट वजन वाढण्याची शक्यता वाढते. त्यामुळे दिवसाची सुरुवात हेल्दी नाश्त्याने करणं खूप महत्त्वाचं आहे.
अशा वेळी ओट्सपासून बनवलेले पॅनकेक हा एक उत्तम पर्याय ठरू शकतो. फायबरने भरपूर असलेले ओट्स पोट भरल्याची भावना देतात, त्यामुळे अनावश्यक खाणं कमी होतं आणि वजन नियंत्रणात राहायला मदत होते.
साहित्य:
ओट्स
पिकलेलं केळ
दूध
अंड
चिमूटभर मीठ
बेकिंग सोडा
दालचिनी पावडर
व्हॅनिला अर्क
मध
कृती:
सर्वप्रथम ओट्स मिक्सरमध्ये बारीक वाटून त्याची पावडर तयार करून घ्या. एका भांड्यात केळ मॅश करून त्यात ओट्स पावडर आणि दूध घालून स्मूद मिश्रण तयार करा. आता त्यात अंड, मीठ, बेकिंग सोडा, दालचिनी पावडर आणि व्हॅनिला अर्क घालून व्यवस्थित एकजीव करा. हे मिश्रण ५-१० मिनिटं तसेच ठेवून द्या.
त्यानंतर नॉन-स्टिक पॅन गरम करून त्यावर थोडंसं तेल लावा आणि छोटे छोटे पॅनकेक घाला. दोन्ही बाजूंनी हलक्या आचेवर शिजवून घ्या. वरून मध घालून गरमागरम सर्व्ह करा.
खास टिप्स:
वजन कमी करायचं असेल तर साखरेऐवजी मध किंवा खजूर पेस्ट वापरा.
अंड टाळायचं असेल तर त्याऐवजी दही वापरू शकता.
जास्त फायबरसाठी चिया सीड्स किंवा फ्लॅक्स सीड्स घाला.
प्रोटीन वाढवण्यासाठी थोडं पीनट बटर किंवा प्रोटीन पावडर मिसळू शकता.
तेल कमी वापरा - नॉन-स्टिक पॅन वापरल्यास पॅनकेक अधिक हेल्दी होतात.
नियमित व्यायामासोबत असा पौष्टिक नाश्ता घेतल्यास पोटावरील चरबी कमी करण्यास मदत होऊ शकते. हेल्दी खा, फिट रहा!