

घरगुती जाम म्हटलं की तासन्तास गॅसजवळ उभं राहणं, रस आटवणं आणि टिकवण्यासाठी प्रिझर्व्हेटिव्ह घालणं असं चित्र डोळ्यासमोर येतं. पण आता या प्रोसेसला पूर्णविराम देणारी एक अतिशय सोपी आणि झटपट रेसिपी आपण जाणून घेणार आहोत. अवघ्या १० मिनिटांत, कोणतेही प्रिझर्व्हेटिव्ह न वापरता तयार होणारा संत्र्याचा जाम चवीला अप्रतिम तर आहेच, शिवाय आरोग्यासाठीही उत्तम आहे. नाश्त्यामध्ये ब्रेड, पोळी किंवा पराठ्यासोबत हा जाम खायला सर्वांना आवडू शकतो.
साहित्य :
संत्र्याच्या साली काढलेले गर (२ मोठी संत्री)
साखर - १ कप (चवीनुसार कमी-जास्त करू शकता)
कॉर्नफ्लोअर - १ टेबलस्पून
लिंबाचा रस - १ टेबलस्पून
पाणी - अर्धा कप
कृती :
सर्वप्रथम संत्र्याचे गर मिक्सरमध्ये घालून थोडं पाणी टाकून बारीक प्युरी तयार करा. आता कढईत ही प्युरी ओता आणि मध्यम आचेवर गरम करा. त्यात साखर घालून सतत ढवळत राहा, जेणेकरून मिश्रण तळाला लागणार नाही. एका वाटीत कॉर्नफ्लोअर थोड्या पाण्यात विरघळवून घ्या आणि हे मिश्रण जाममध्ये घाला. जाम घट्ट होत येताच त्यात लिंबाचा रस घाला आणि २-३ मिनिटं उकळी येऊ द्या. गॅस बंद करा. थंड झाल्यावर जाम अधिक घट्ट होईल. तयार जाम स्वच्छ, कोरड्या काचेच्या बरणीत भरून ठेवा.
टीप :
हा जाम फ्रिजमध्ये ठेवल्यास ८ ते १० दिवस सहज टिकतो.
साखरेऐवजी गूळ पावडर वापरूनही ही रेसिपी करता येते.
मुलांसाठी हा जाम केमिकल-फ्री असल्याने सुरक्षित आणि पौष्टिक आहे.