

थंडीच्या दिवसांत सकाळी गरमागरम नाश्त्याची मजाच काही और असते! पण रोजचेच कांदापोहे, उपमा, शिरा, इडली, डोसा खाऊन कंटाळा आल्यानंतर काहीतरी नवीन, चविष्ट आणि पौष्टिक खाण्याची इच्छा होतेच. पौष्टिक म्हंटलं की पालेभाज्या ह्या आल्याच. पण, मुलं पालेभाज्यांचं नाव जरी घेतलं तरी ते लगेच नाक मुरडतात, मात्र त्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर असतात. मग या पालेभाज्यांना थोड्या नव्या स्वरूपात सादर केलं, तर त्यांना नकार देणं कठीणच! म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत हिरव्यागार पालकापासून बनवलेले कुरकुरीत पालक कटलेट जे चवीला जबरदस्त, दिसायला आकर्षक आणि आरोग्यासाठीही उत्तम आहेत.
साहित्य :
पालक
बटाटे
लसूण
आलं
हिरवी मिरची
मीठ
जिऱ्याची पावडर
धणे पावडर
चिली फ्लेक्स
काळीमिरी
ब्रेड क्रम्स
कॉर्नफ्लॉवर
मैदा
तेल
कृती :
सर्वप्रथम पालक स्वच्छ धुऊन घ्या. तर दुसरीकडे कुकरमध्ये बटाटे उकडून घ्या. त्यानंतर कढईत तेल गरम करून त्यात आले, लसूण, हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला पालक घालून थोडं परतून शिजवा. थंड झालेली भाजी मिक्सरमध्ये टाकून पेस्ट तयार करा.
त्यानंतर मोठ्या वाटीत उकडलेले बटाटे, पालक पेस्ट, मीठ, गरम मसाला, धने-जिरे पावडर, चिली फ्लेक्स, काळी मिरी आणि ब्रेड क्रम्स एकत्र करून मिश्रण बनवा. या मिश्रणाचे छोटे कटलेट तयार करून मैदा आणि कॉर्न फ्लोअरच्या पेस्टमध्ये डीप करा.
गरम तेलात कटलेट सोनेरी रंग येईपर्यंत तळा. हिरव्या चटणी किंवा सॉससोबत गरमागरम पालक कटलेट सर्व्ह करा.