

तिशीनंतर स्त्रियांच्या शरीरात अनेक नैसर्गिक बदल होतात. ऊर्जा, इम्युनिटी, हार्मोन्स आणि हाडांचे आरोग्य नीट टिकवण्यासाठी योग्य पोषणाची गरज वाढते. अभिनेत्री तमन्ना भाटियाचे फिटनेस ट्रेनर सिद्धार्थ सिंग यांनी याच संदर्भात महिलांसाठी अत्यंत महत्त्वाच्या तीन सप्लिमेंट्सविषयी इंस्टाग्रामवर माहितीपूर्ण व्हिडिओ शेअर केला आहे.
१) व्हिटॅमिन डी : इम्युनिटीसाठी सर्वात मूलभूत सप्लिमेंट
सिद्धार्थ सांगतात, “पहिले सप्लिमेंट थेट रोगप्रतिकार शक्तीशी जोडलेले आहे - व्हिटॅमिन डी. आजकाल आपली दिनचर्या अशीच झाली आहे ज्यामध्ये आपल्याला सूर्यप्रकाश फारसा मिळत नाही. आपण ऑफिस, किंवा घरात जास्त वेळ घालवतो. शरीराला आवश्यक प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळत नाही. त्यामुळे हे सप्लिमेंट प्रत्येक महिलेनं घ्यावंच.”
२) ओमेगा-३ : इन्फ्लेमेशन कमी करण्यासाठी महत्त्वाचे
“दुसरे सप्लिमेंट शरीरातील जळजळ (इन्फ्लेमेशन) नियंत्रणात ठेवण्यासाठी -ओमेगा-३.
जर तुम्ही आठवड्यातून दोन वेळा मासे खात असाल, तर सप्लिमेंटची गरज नसते. पण जे मासे खात नाहीत किंवा शाकाहारी आहेत, त्यांनी नक्कीच ओमेगा-३ घ्यायला हवे,” असे सिद्धार्थ स्पष्ट करतात.
३) आयर्न (लोह) : महिलांसाठी सर्वात महत्त्वाचे सप्लिमेंट
सिद्धार्थ सिंग सांगतात, “स्त्रियांसाठी सर्वात महत्त्वाचे सप्लिमेंट म्हणजे आयर्न. दर महिन्याला पीरियड्समुळे रक्त आणि लोहमूल्यात घट होते. त्यामुळे आयर्न घेणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र सप्लिमेंट घेण्यापूर्वी ब्लड टेस्ट करून घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य मात्रा ठरवा.”
३० वर्षांनंतर शरीराची काळजी व्यवस्थित घेण्यासाठी पोषण, व्यायाम आणि योग्य सप्लिमेंट्स यांचा समतोल आवश्यक असतो. सिद्धार्थ सिंग यांच्या या टिप्स महिलांसाठी मार्गदर्शक ठरू शकतात.
(Disclaimer: या लेखात दिलेले आरोग्यविषयक सल्ले सामान्य मार्गदर्शनासाठी आहेत. याची ‘नवशक्ति’ पुष्टी करत नाही.)