

दररोज त्याच त्या भाज्या खाऊन कंटाळा आला असेल आणि जेवणात तोंडी लावण्यासाठी काहीतरी वेगळं आणि चविष्ट करायचं असेल, तर वांग्यापासून तयार होणारा हा झटपट आणि चविष्ट पदार्थ नक्की करून पाहा. कमी साहित्य, कमी वेळ आणि मसालेदार चव यामुळे वांगी तवा फ्राय डाळ-भात, पोळी किंवा भाकरीसोबत अगदी मस्त लागतो.
साहित्य
१ मोठे जांभळे वांगे
१ टीस्पून लाल तिखट
½ टीस्पून हळद
१ टीस्पून धणे-जिरे पूड
½ टीस्पून गरम मसाला
½ टीस्पून आमचूर पावडर
१ लिंबाचा रस
चवीनुसार मीठ
२ ते ३ टेबलस्पून तांदळाचे पीठ
२ टेबलस्पून रवा
आवश्यकतेनुसार तेल
कृती
सर्वप्रथम वांगे स्वच्छ धुवून त्याच्या मध्यम जाडीच्या गोल चकत्या कापून घ्या. एका भांड्यात लाल तिखट, हळद, धणे-जिरे पूड, गरम मसाला, आमचूर पावडर, लिंबाचा रस आणि मीठ एकत्र करून मसाला तयार करा. हा मसाला प्रत्येक वांग्याच्या चकतीला दोन्ही बाजूंनी नीट लावा आणि १० मिनिटे तसेच मुरू द्या.
यानंतर दुसऱ्या ताटात तांदळाचे पीठ आणि रवा एकत्र करून त्यात चिमूटभर मीठ व थोडे लाल तिखट मिसळा. मुरवलेले वांग्याचे काप या मिश्रणात हलकेच घोळवून घ्या.
तवा गरम करून त्यावर थोडे तेल सोडा. त्यानंतर वांग्याचे काप मंद ते मध्यम आचेवर दोन्ही बाजूंनी सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत भाजा.
सर्व्ह करताना अशी द्या चवदार साथ
गरमागरम वांगी तवा फ्राय डाळ-भात, वरण-भात, पोळी, भाकरी किंवा चपातीसोबत खूपच छान लागतो. सोबत कांदा, लिंबाची फोड आणि हिरवी चटणी दिल्यास या पदार्थाची चव आणखी खुलते.