सध्या सगळीकडे पावसाचे वातावरण तयार झाले आहे. अशा वातावरणात काहीतरी कुरकुरीत आणि चटपटीत खाण्याची इच्छा होणं तर स्वाभाविक आहे. पण दरवेळी तेच-तेच कांदा भजी किंवा वडापाव खाऊन तुम्हीही कंटाळलात का? मग यावेळी ट्राय करा हेल्दी आणि चविष्ट असा पर्याय, घरच्या घरी बनणारे व्हेजिटेबल कटलेट्स. झटपट तयार होणारे हे स्नॅक जितके पौष्टिक, तितकेच अप्रतिम स्वादिष्टही आहे.
साहित्य :
२ उकडलेले बटाटे
गाजर, बीन्स, कॉलीफ्लॉवर (बारीक चिरलेले/उकडलेले)
१ चमचा आले-लसूण पेस्ट
२ हिरव्या मिरच्या (बारीक चिरलेल्या)
बारीक चिरलेली कोथिंबीर
मीठ चवीनुसार
½ चमचा गरम मसाला
२ ब्रेडचे चुरे / ब्रेडक्रम्स
रवा किंवा मैदा
तेल
कृती :
सर्वप्रथम उकडलेले बटाटे मॅश करून घ्यावेत. त्यात चिरलेल्या भाज्या, आले-लसूण पेस्ट, हिरवी मिरची, कोथिंबीर, मीठ आणि गरम मसाला टाकून नीट एकत्र करा. या मिश्रणाचे छोटे कटलेट्स करून त्यांना मैद्याच्या पातळ घोळात बुडवा नंतर ब्रेडक्रम्समध्ये घोळवून बाजूला ठेवा. तव्यावर थोडंसं तेल गरम करून हे कटलेट्स दोन्ही बाजूंनी सोनेरी रंगावर भाजून घ्या. हवे असल्यास डीप फ्राय करून अजून कुरकुरीत कटलेट्स बनवता येतात. तयार कटलेट्स चटणी किंवा टोमॅटो सॉसबरोबर सर्व्ह करा आणि पावसाळी संध्याकाळी या स्नॅकचा आस्वाद घ्या.
टिप
पावसाळ्यात तळलेले पदार्थ पचनाला जड वाटतात, त्यामुळे हे कटलेट्स तव्यावर भाजून घेतले की ते हेल्दी आणि पचायलाही सोपे होतात.