

कामाचे वाढते तास, एकापाठोपाठ होणाऱ्या मिटींग्स, कमी वेळेत काम पूर्ण करण्याची घाई आणि कामाचा दबाव यामुळे अनेकांच्या दैनंदिन आयुष्यात ताण वाढत आहे. कामाच्या व्यस्त दिवसानंतर थकवा जाणवणे सामान्य असले, तरी दररोज थकून जाणे, आवडीच्या कामातील रस कमी होणे किंवा ऑफिसमधून घरी आल्यानंतरही कामाचे विचार मनातून न जाणे ही लक्षणे दुर्लक्षित करणे योग्य नाही. कामाच्या ठिकाणी सतत जाणवणाऱ्या ताणामुळे मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. या स्थितीला 'वर्कप्लेस बर्नआउट' अर्थात कामाच्या ताणामुळे निर्माण होणारा मानसिक आणि भावनिक थकवा असे म्हटले जाते. जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त या समस्येविषयी जागरूकता निर्माण करणे आणि त्याची लक्षणे वेळीच ओळखणे महत्त्वाचे आहे.
दरवर्षी १० ऑक्टोबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा केला जातो. मानसिक आरोग्याविषयी जनजागृती करणे, या विषयावर मोकळेपणाने संवाद साधण्यास प्रोत्साहन देणे आणि गरजेनुसार मदत घेण्याचे महत्त्व अधोरेखित करणे हा या दिवसाचा उद्देश आहे. आकाश हेल्थकेअरच्या मानसोपचार विभागातील सहयोगी सल्लागार डॉ. पवित्रा शंकर यांच्या मते, दीर्घकाळ कामाचा दबाव कायम राहिल्यास आणि त्याचे योग्य व्यवस्थापन न झाल्यास बर्नआउटची समस्या उद्भवू शकते.
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते, बर्नआउट ही कामाशी संबंधित घटना असून, त्यामध्ये प्रचंड थकवा जाणवणे, कामापासून मानसिकदृष्ट्या दुरावणे किंवा कामाबद्दल नकारात्मक भावना निर्माण होणे आणि व्यावसायिक कार्यक्षमतेत घट होणे या तीन प्रमुख बाबींचा समावेश होतो.
कामाच्या ठिकाणी बर्नआउटची 'ही' ५ लक्षणे ओळखा
१. सतत थकवा जाणवणे - दिवसभर काम केल्यानंतर थकवा जाणवणे स्वाभाविक आहे. मात्र, पुरेशी विश्रांती घेतल्यानंतरही सकाळी थकल्यासारखे वाटत असेल, रोजची साधी कामे पूर्ण करणेही कठीण जात असेल किंवा कामाचा दिवस सुरू होण्यापूर्वीच ऊर्जा संपल्यासारखे वाटत असेल, तर या लक्षणांकडे लक्ष देणे आवश्यक आहे. सततचा थकवा हा कामाच्या ताणाशी संबंधित असू शकतो. मात्र, त्यामागे इतर शारीरिक किंवा मानसिक कारणेही असू शकतात.
२. कामातील रस कमी होणे - पूर्वी आवडीने केलेल्या कामाबद्दल हळूहळू उत्साह कमी होणे हे भावनिक थकव्याचे लक्षण असू शकते. बर्नआउटमुळे अर्थपूर्ण वाटणारे कामही त्रासदायक किंवा निरर्थक वाटू लागते. कामाबद्दल नकारात्मक भावना वाढणे, सहकाऱ्यांपासून भावनिकदृष्ट्या दूर जाणे किंवा कामाचे तास कधी संपतील, याची सतत वाट पाहणे अशा गोष्टी जाणवू शकतात. अशा बदलांचा परिणाम कामाच्या गुणवत्तेवर आणि एकूण कार्यक्षमतेवरही होऊ शकतो.
३. एकाग्रता कमी होणे आणि दैनंदिन कामे पूर्ण करण्यात अडचण येणे - डेडलाइन, कामाची उद्दिष्टे आणि अपूर्ण कामांचा सतत विचार सुरू असल्यास एकाग्रता राखणे कठीण होऊ शकते. एकच ई-मेल पुन्हा पुन्हा वाचावा लागणे, छोट्या गोष्टी विसरणे किंवा पूर्वी सहज पूर्ण होणारे काम करण्यासाठी अधिक वेळ लागणे अशी लक्षणे दिसू शकतात.
याशिवाय, निर्णय घेणे कठीण वाटू शकते. आवश्यक कौशल्ये आणि अनुभव असूनही स्वतःच्या क्षमतेबद्दल शंका निर्माण होऊ शकते. अशा वेळी स्वतःला दोष देण्याऐवजी कामाचा ताण, विश्रांतीचा अभाव आणि मानसिक आरोग्य यांकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
४. मनःस्थिती आणि नातेसंबंधांमध्ये बदल होणे - कामाचा ताण केवळ ऑफिसपुरता मर्यादित राहत नाही. अनेकदा तो घरी आल्यानंतरही कायम राहतो. छोट्या गोष्टींवर चिडचिड होणे, कुटुंबातील सदस्यांवरील संयम कमी होणे किंवा सहकाऱ्यांशी बोलताना राग व्यक्त होणे असे बदल जाणवू शकतात.
काही व्यक्ती सामाजिक संवाद टाळू लागतात, इतरांपासून दूर राहतात किंवा पूर्वी सहज हाताळता येणाऱ्या परिस्थितींमध्येही अस्वस्थ होतात. मनःस्थितीतील हे बदल वैयक्तिक नातेसंबंधांवर परिणाम करू शकतात. त्यामुळे कामातील ताणाचा परिणाम आपल्या वागणुकीवर आणि नातेसंबंधांवर होत आहे का, याकडे लक्ष देणे महत्त्वाचे आहे.
५. वारंवार शारीरिक त्रास जाणवणे - मानसिक ताणाचा परिणाम काही वेळा शारीरिक लक्षणांच्या स्वरूपातही दिसून येतो. वारंवार डोकेदुखी होणे, स्नायूंमध्ये ताण जाणवणे, पोटाशी संबंधित त्रास होणे आणि झोपेच्या सवयी बिघडणे अशी लक्षणे दीर्घकाळच्या ताणासोबत दिसू शकतात.
मात्र, या लक्षणांमागे अनेक कारणे असू शकतात. त्यामुळे प्रत्येक वेळी असा त्रास जाणवणे म्हणजे बर्नआउटच आहे, असे समजू नये. विशेषतः कामाचा ताण वाढल्यानंतर ही लक्षणे वारंवार जाणवत असतील, तर त्याकडे दुर्लक्ष न करता आरोग्यतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
मदत कधी घ्यावी?
कामाचा ताण रोजच्या आयुष्याचा भाग बनला आहे म्हणून त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. सततचा थकवा, मनःस्थितीतील बदल, एकाग्रतेचा अभाव आणि वारंवार जाणवणारा शारीरिक त्रास ही लक्षणे दीर्घकाळ टिकत असतील, तर परिस्थितीत बदल करण्याची गरज असू शकते.
यासाठी सर्वप्रथम कामाच्या ताणाची प्रमुख कारणे ओळखण्याचा प्रयत्न करावा. शक्य असेल तिथे कामाच्या वेळा आणि वैयक्तिक आयुष्य यांच्यात योग्य मर्यादा राखाव्यात. विश्रांतीसाठी वेळ काढणे, कामाव्यतिरिक्त आवडीच्या गोष्टी करणे आणि विश्वासू व्यक्तीशी मनमोकळेपणाने बोलणे उपयुक्त ठरू शकते. गरज भासल्यास व्यवस्थापक किंवा मानसिक आरोग्यतज्ज्ञांची मदत घ्यावी.
कामाचा ताण सातत्याने वाढत असेल आणि त्याचा झोप, आरोग्य, नातेसंबंध किंवा दैनंदिन कामकाजावर परिणाम होत असेल, तर व्यावसायिक मदत घेण्यास विलंब करू नये. वेळीच लक्षणे ओळखून योग्य पावले उचलल्यास मानसिक आरोग्याची काळजी घेण्यास मदत होऊ शकते.
(Disclaimer: हा लेख केवळ माहितीच्या उद्देशाने देण्यात आला आहे. ही माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय नाही. आरोग्याशी संबंधित कोणतीही चिंता किंवा लक्षणे असल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. 'नवशक्ति' यातून कोणताही दावा करत नाही.)