NEET घोटाळ्याचे नवे महाराष्ट्र कनेक्शन; कुलकर्णीपाठोपाठ पुण्याच्या प्रा. मनीषा मांढरेला अटक

नीट-युजी वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा पेपर फुटल्याच्या प्रकरणाचे महत्त्वाचे धागेदोरे महाराष्ट्राशी व त्यातही पुणे व लातूरशी भिडल्याचे स्पष्ट झाले आहे.
NEET घोटाळ्याचे नवे महाराष्ट्र कनेक्शन; कुलकर्णीपाठोपाठ पुण्याच्या प्रा. मनीषा मांढरेला अटक
NEET घोटाळ्याचे नवे महाराष्ट्र कनेक्शन; कुलकर्णीपाठोपाठ पुण्याच्या प्रा. मनीषा मांढरेला अटक
Published on

पुणे : नीट-युजी वैद्यकीय प्रवेश परीक्षेचा पेपर फुटल्याच्या प्रकरणाचे महत्त्वाचे धागेदोरे महाराष्ट्राशी व त्यातही पुणे व लातूरशी भिडल्याचे स्पष्ट झाले आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाने अर्थात सीबीआयने शनिवारी या संदर्भात आणखी एक कारवाई केली. राष्ट्रीय परीक्षा एजन्सीच्या (एनटीए) प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या समितीची सदस्य असलेल्या मनीषा मांढरे या जीवशास्त्र विषयाच्या व्याख्यातीला सीबीआयने अटक केली. ३ मे रोजी झालेल्या या परीक्षेचा पेपर फुटल्याच्या आरोपावरून यापूर्वी अटक करण्यात आलेला मुख्य सूत्रधार पी. व्ही. कुलकर्णी आणि इतर आरोपींच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. मनीषा मांढरे हिची सीबीआय मुख्यालयात कसून चौकशी केल्यानंतर तिला अटक झाली.

मनीषा मांढरे ही पुण्यात वरिष्ठ वनस्पतीशास्त्र शिक्षिका म्हणून मॉडर्न महाविद्यालयात कार्यरत होत्या. नॅशनल टेस्टिंग एजन्सीने त्यांची या परीक्षेसाठी विषय तज्ज्ञ म्हणून नियुक्ती केली होती. परिणामी त्यांना वनस्पतीशास्त्र आणि प्राणिशास्त्र या विषयांच्या प्रश्नपत्रिकांची पूर्ण माहिती आणि अॅक्सेस मिळाला होता. मात्र, त्यांनी या गोपनीयतेचा भंग करून परीक्षेची विश्वासार्हता धोक्यात आणली.

यापूर्वी सीबीआयने लातूर येथील रसायनशास्त्र तज्ज्ञ प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी याला अटक केली होती, जे अनेक वर्षांपासून नीटच्या प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या पॅनेलवर कार्यरत होते. आपल्या गोपनीय अधिकाराचा गैरवापर करून कुलकर्णी याने एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात घरातच विशेष वर्ग घेतले होते आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष परीक्षेत येणारे प्रश्न व उत्तरे लिहून दिली होती.

गेल्या २४ तासांत सीबीआयने देशभरात ६ महत्त्वाच्या ठिकाणी छापे टाकले आहेत. या कारवाईत लॅपटॉप, बँक खात्यांची विवरणे, मोबाईल फोन्स आणि अनेक गुन्हेगारी स्वरूपाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. या प्रकरणातील एकूण अटक आरोपींची संख्या आता नऊ झाली आहे. यामध्ये दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर येथील व्यक्तींचा समावेश आहे. अटक करण्यात आलेल्या ९ आरोपींपैकी ५ जणांना न्यायालयाने ७ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर पुण्यातून अटक केलेल्या दोन आरोपींना ट्रान्झिट रिमांडवर दिल्लीत नेऊन दिल्ली न्यायालयात शनिवारी हजर करण्यात आले.

NEET घोटाळ्याचे नवे महाराष्ट्र कनेक्शन; कुलकर्णीपाठोपाठ पुण्याच्या प्रा. मनीषा मांढरेला अटक
नीट पेपरफुटीः पुण्यातून महिलेसह पाच ताब्यात; कोचिंग क्लासेस, डॉक्टर्स यांचाही सहभाग?

या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून, या रॅकेटचे धागेदोरे आणखी किती खोलवर पसरले आहेत, याचा शोध सीबीआय घेत आहे. लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या या रॅकेटमुळे शैक्षणिक क्षेत्रात संतापाची लाट उसळली आहे.

प्रश्न आधीच लिहून दिले

सीबीआयच्या तपासात समोर आले की, एप्रिल २०२६ दरम्यान मनीषा मांढरे हिने पुणे येथील मनीषा वाघमारे (जिच्यावर १४ मे रोजी आधीच कारवाई झाली आहे) हिच्या मदतीने - काही निवडक परीक्षार्थीना एकत्र केले - आणि आपल्या राहत्या घरी या विद्यार्थ्यांसाठी विशेष कोचिंग क्लासेस घेतले. या वर्गामध्ये त्यांनी प्रत्यक्ष परीक्षेत येणारे प्रश्न विद्यार्थ्यांना लिहून दिले आणि त्यांच्या पाठ्यपुस्तकात खुणा करून दिल्या. ३ मे २०२६ रोजी झालेल्या प्रत्यक्ष परीक्षेतील बहुतांश प्रश्न मांढरे हिने आधीच दिलेल्या प्रश्नांशी तंतोतंत जुळले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

कॉलेजचा खुलासा

या प्रकरणी मॉडर्न कॉलेज ऑफ आर्ट्स, सायन्स अँड कॉमर्सने एका पत्रकाद्वारे खुलासा केला आहे. मांढरे ही सन २००२ पासून कनिष्ठ महाविद्यालयीन विभागात कार्यरत असून गेल्या २४ वर्षांपासून अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना बायोलॉजी शिकवत आहे. तिचा प्रदीर्घ अनुभव विचारात घेऊन राष्ट्रीय परीक्षा संस्थेने नीट परीक्षा प्रक्रियेशी संबंधित अत्यंत गोपनीय कामासाठी तिची नियुक्ती केली होती. हे काम पूर्णपणे गोपनीय स्वरूपाचे असल्याने राष्ट्रीय परीक्षा संस्था आणि संबंधित व्यक्ती यांच्यातच थेट व्यवहार होत होता, त्यामुळे कॉलेज प्रशासनाचा या प्रक्रियेशी कोणताही थेट संबंध नव्हता, असे कॉलेजच्या प्राचार्या डॉ. निवेदिता एकबोटे यांनी नमूद केले. कॉलेज प्रशासन आणि व्यवस्थापनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून प्राध्यापिकेविरुद्ध चौकशी सुरू केली जाईल, अशी माहिती प्रशासनाने दिली.

logo
marathi.freepressjournal.in