

पुणे : पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने (भाजप) निर्विवाद वर्चस्व राखत मोठी मुसंडी मारली आहे. पुणे महापालिकेच्या निवडणुकीत १६५ पैकी ११८ जागांवर, तर पिंपरी-चिंचवडमध्ये १२८ पैकी ८४ जागांवर भाजपने आघाडी घेत स्पष्ट बहुमताकडे वाटचाल केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित-पवार आणि शरद पवार गट) एकजुटीचा प्रयोग पुण्यात फोल ठरला असून, या निकालाने पवार कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
मतमोजणी सकाळी १० वाजता सुरू झाली आणि सुरुवातीच्या फेऱ्यांपासून भाजपने आपली पकड मजबूत ठेवली. ही निवडणूक भाजप, शिंदे सेना, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी, काँग्रेस-शिवसेना-मनसे यांच्यातील चौरंगी लढतीमुळे अत्यंत चुरशीची होती. पुणे महापालिकेत संध्याकाळी ७ वाजेपर्यंत १५५ पैकी भाजप ११८, राष्ट्रवादी काँग्रेस १७, राष्ट्रवादी शरद पवार गट २, शिंदे सेना २, ठाकरे सेना १, आणि काँग्रेस १६ जागांवर आघाडीवर होती. अजित पवार गटाचे शहराध्यक्ष सुभाष जगताप आणि शरद पवार गटाच्या अश्विनी कदम यांनाही पराभवाचा मोठा धक्का बसला. प्रभाग २२ (काशेवाडी-डायस प्लॉट) मध्ये काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक अविनाश बागवे यांचा भाजपच्या विवेक यादव यांनी अवघ्या ६२ मतांनी पराभव केला.
आंदेकर कुटुंबाचा ‘डबल धमाका’
पुण्यातील प्रभाग क्रमांक २३ (रविवार पेठ-नाना पेठ) मधील चर्चेची लढत आंदेकर कुटुंबाने न्यायालयाच्या सशर्त परवानगीने लढवली आणि पुन्हा एकदा बालेकिल्ल्यात वर्चस्व सिद्ध केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोनाली आंदेकर यांनी काँग्रेसच्या माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा धंगेकर यांचा ३,२२८ मतांनी पराभव केला. याच प्रभागातून सोनाली आंदेकर यांच्या सासू लक्ष्मी आंदेकर यांनीही १४० मतांच्या फरकाने विजय मिळवत ‘डबल धमाका’ नोंदवला.
माजी उपमहापौरांचा पराभव
पुणे महापालिकेतील प्रभाग ३६ मध्ये सलग सहा वेळा नगरसेवक राहिलेले आणि सातव्यांदा निवडणूक रिंगणात उतरलेले माजी उपमहापौर आबा बागुल (शिंदे सेना) भाजपने पराभूत केले. भाजपचे महेश वाबळे यांनी आबा बागुलांचा ४,००० मतांच्या फरकाने पराभव केला, तर तरुणी सई थोपटे यांनीही भाजपच्या तिकिटावर विजय मिळवला.
पिंपरी-चिंचवडमध्ये भाजपचे वर्चस्व
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेत भाजपने १२८ पैकी ८४ जागांवर आघाडी घेत निर्विवाद वर्चस्व सिद्ध केले. राष्ट्रवादी काँग्रेसने फक्त ३७ जागांवर आघाडी घेतली, शिंदे शिवसेना ६ आणि अपक्ष १ जागांवर विजयी झाले. या निवडणुकीत माजी महापौर, दोन शहराध्यक्ष, चार स्थायी समिती अध्यक्ष तसेच २२ माजी नगरसेवकांना पराभवाचा सामना करावा लागला.
पुणेकरांनी पुन्हा एकदा भाजपवर विश्वास दाखवला आहे. आम्ही विकासावर लक्ष केंद्रित करून ही निवडणूक लढवली, आणि पुणेकरांनी त्यास प्राधान्य दिले.आरोप-प्रत्यारोप होत राहिले, पण विकासाच्या दिशेने एकत्र येऊन पुढे जाण्याचा मानस आहे.
मुरलीधर मोहोळ, ज्येष्ठ नेते भाजप