

मुंबई : गेल्या काही दिवसांत मुंबईत बेस्ट बस अपघातांच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. याच महिन्यात भांडुप आणि अंधेरी येथे झालेल्या अपघातांच्या घटना ताज्या असतानाच, मानखुर्द परिसरात सोमवारी (दि. २०) सकाळी बेस्ट बसचा भीषण अपघात झाला. भरधाव बसने रस्त्याच्या दुभाजकाला जोरदार धडक दिल्याने ६५ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला, तर बसचालक आणि वाहक जखमी झाले. या अपघातामुळे सायन-पनवेल महामार्गावरील वाहतुकीवरही काही काळ परिणाम झाला.
दुभाजकाजवळ उभ्या असलेल्या व्यक्तीचा मृत्यू
सोमवारी सकाळी सुमारे ९.१४ वाजण्याच्या सुमारास विश्वकर्मा रुग्णालयासमोर बेस्टच्या ५०१ क्रमांकाच्या बसने रस्त्यावरील दुभाजकाला जोरदार धडक दिली. धडकेनंतर उत्तर दिशेकडील मार्गावर वाहतूक खोळंबली.
या अपघातात दुभाजकाजवळ उभे असलेले भास्कर रावसाहेब पांडे (६५) गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
बसचालक आणि वाहकावर उपचार सुरू
या अपघातात बसचालक बनवारी श्रीराम प्रसाद शर्मा (५१) आणि वाहक वैभव वाघमारे (४१) हेही जखमी झाले आहेत. दोघांवर राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
सायन-पनवेल महामार्गावरील वाहतूक विस्कळीत
अपघातानंतर मानखुर्द मेट्रो स्थानकाखालील सायन-पनवेल महामार्गावर वाहतूक काही काळ संथ गतीने सुरू होती. घटनेची माहिती मिळताच वाहतूक पोलीस आणि इतर आपत्कालीन यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. अपघातग्रस्त बस बाजूला करून वाहतूक पूर्ववत करण्यात आली. दरम्यान, या अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
या महिन्यातील बेस्ट बस अपघात
८ जुलै : भांडुपमध्ये पादचाऱ्याला धडक
भांडुपच्या कोकणनगर परिसरात रिव्हर्स घेताना बेस्ट बसने ४३ वर्षीय पादचाऱ्याला धडक दिली होती. जखमीला बाहेर काढण्याच्या प्रयत्नादरम्यान चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बसने दोन पार्क केलेल्या दुचाकी आणि एका रिक्षेलाही धडक दिली होती. या घटनेत पादचारी गंभीर जखमी झाला होता.
१० जुलै : अंधेरीत १४ वाहनांना धडक
अंधेरी पश्चिम येथे बेस्ट बसवरील नियंत्रण सुटल्याने बसने तब्बल १४ वाहनांना धडक दिली होती. या अपघातात १२ ते १३ रिक्षांचे मोठे नुकसान झाले होते, तर दोन ते तीन जण जखमी झाले होते. बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे अपघात झाल्याचा दावा चालकाने केला होता. या घटनेचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.
या सलग घडणाऱ्या घटनांमुळे बेस्ट बसच्या देखभालीसह सुरक्षिततेच्या उपाययोजनांबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित होत आहेत.