

जीवन, सन्मान आणि वैद्यकीय नैतिकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित करणाऱ्या प्रकरणाचा बुधवारी (दि.२५) शेवट झाला. गेली १३ वर्षांहून अधिक काळ कोमात असलेल्या हरीश राणाच्या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने ११ मार्च रोजी निष्क्रिय इच्छामरणाला (Passive Euthanasia) परवानगी देत कृत्रिम लाइफ सपोर्ट काढण्याची मंजुरी दिली होती. त्यानंतर मंगळवारी (दि.२४) त्याचे निधन झाले.
दिल्लीतील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत (AIIMS) उपचारादरम्यान ३१ वर्षीय हरीशचा मृत्यू झाला. त्याचे अंतिम संस्कार दक्षिण दिल्लीतील ग्रीन पार्क येथील स्मशानभूमीत कुटुंबीय आणि निकटवर्तीयांच्या उपस्थितीत पार पडले.
२०१३ मधील अपघातानंतर कोमात
उत्तर प्रदेशातील गाझियाबादचा रहिवासी हरिश राणा हा पंजाब विद्यापीठात बीटेकचे शिक्षण घेत असताना ऑगस्ट २०१३ मध्ये पेइंग गेस्टच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून खाली पडला. या अपघातात त्याच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली आणि तो पूर्णपणे पक्षाघातग्रस्त (Quadriplegic) झाला.
या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने AIIMS-दिल्लीच्या डॉक्टरांच्या द्वितीय वैद्यकीय मंडळाचा अहवाल पाहिला होता. त्यानंतर प्राथमिक वैद्यकीय मंडळानेही राणाच्या प्रकृतीचे परीक्षण करून त्याच्या बरे होण्याची शक्यता अत्यंत कमी असल्याचे नमूद केले होते.
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय
भारतात 'पॅसिव्ह यूथनेशिया'च्या क्वचित वापरलेल्या तरतुदीचा हा एक महत्त्वाचा निर्णय ठरला. न्यायालयाने स्पष्ट केले होते की, फीडिंग ट्यूबसारखे उपचार थांबवता येतील, मात्र रुग्णाला सन्मानाने नैसर्गिक मृत्यू मिळावा यासाठी पॅलियेटिव्ह केअर सुरू ठेवणे आवश्यक आहे.
कुटुंबाचा १३ वर्षांचा संघर्ष
मृत्यूपूर्वी काही दिवस हरीशला गाझियाबाद येथील घरातून AIIMS दिल्लीतील पॅलियेटिव्ह केअर युनिटमध्ये हलवण्यात आले होते.
गेल्या १३ वर्षांपासून त्याच्या पालकांनी अशोक राणा आणि निर्मला देवी त्याची सेवा केली. या काळात कुटुंबाला आर्थिक आणि मानसिक अडचणींना सामोरे जावे लागले. उपचारासाठी त्यांनी स्वतःचे घरही विकल्याची माहिती स्थानिकांकडून मिळाली.
आध्यात्मिक प्रार्थना आणि अंतिम क्षण
गाझियाबाद जिल्ह्यातील साहिबाबादमधील प्रभू मिलन भवन (ब्रह्मकुमारी केंद्र) येथील आध्यात्मिक मार्गदर्शक सिस्टर कुमारी लव्हली दीदी यांनी १३ मार्च रोजी राणाच्या घरी भेट दिली. "सर्वांना माफ करून आणि सर्वांची माफी मागून जा आता...ठीक आहे" असे म्हणत साध्वीने हरिश राणाला भावनिक निरोप दिला.
अवयवदानातून दिली नवी प्रेरणा
हरीशच्या कुटुंबीयांनी त्याच्या नेत्रपटल (Cornea) आणि हृदयाचे झडप (Heart Valves) दान करण्याचा निर्णय घेतला. वैयक्तिक दुःखातून समाजासाठी योगदान देण्याचा हा प्रेरणादायी निर्णय ठरला.
उत्तर प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अजय राय यांनी श्रद्धांजली अर्पण करताना सांगितले की, "कुटुंबाने आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आयुष्य झोकून दिले. तरीही त्यांनी अवयवदान करून देशाला प्रेरणा दिली."