९ वर्षांचा संसार, पण मूल नाही; पत्नीचा गळा चिरून पतीनेही संपवले जीवन
उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्यातील माझोला पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने पत्नीचा गळा चिरून तिची हत्या केली आणि त्यानंतर स्वतःच्या पोटात चाकू खुपसून आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. सोनकपूर ओव्हरब्रिज परिसरातील जंगलात दोघांचे मृतदेह आढळल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
होळीच्या निमित्ताने बाहेर पडले, पण...
मृत व्यक्तींची ओळख विनोद उर्फ विकी आणि ममता अशी झाली असून ते मुरादाबादमधील सिव्हिल लाईन्स परिसरातील नवीन नगर येथे राहत होते. बुधवारी (दि. ४) दुपारी सुमारे दोनच्या सुमारास विनोदने होळीच्या निमित्ताने सासरी जात असल्याचे सांगून ममताला सोबत घेतले. मात्र सासरी नेण्याऐवजी तो तिला सोनकपूर ओव्हरब्रिजजवळील निर्जन जंगलात घेऊन गेला. तेथे दोघांमध्ये वाद झाल्यानंतर ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
लग्नाला नऊ वर्षे; मूलबाळ नसल्याने तणाव
मिळालेल्या माहितीनुसार, या दाम्पत्याच्या लग्नाला सुमारे नऊ वर्षे झाली होती, मात्र त्यांना मूलबाळ नव्हते. या कारणावरून पती-पत्नीमध्ये वारंवार वाद होत असल्याचे सांगितले जात आहे. कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, विनोद दुसरे लग्न करण्याच्या विचारात होता आणि त्यासाठी तो बिहारलाही जाऊन आल्याचे बोलले जात आहे. ममता या निर्णयाला विरोध करत असल्याने घरात तणाव वाढल्याची माहिती समोर आली आहे.
पोलीस तपास सुरू
घटनेची माहिती मिळताच मुरादाबादचे एसपी सिटी कुमार रणविजय सिंह आणि माझोला पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळावरून एक दुचाकी जप्त केली आहे. दोन्ही मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.

