

भारताच्या ७७व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त दिल्लीतील कर्तव्यपथावर झालेल्या भव्य सोहळ्यात महाराष्ट्राच्या चित्ररथाने बाजी मारली आहे. यंदाच्या संचलनामध्ये राज्यांच्या चित्ररथांच्या स्पर्धेत महाराष्ट्राने पहिला क्रमांक तर जम्मू-काश्मीर राज्याने दुसरा आणि केरळ राज्याने तिसरा क्रमांक पटकावला आहे. केंद्र सरकारने या निकालांची अधिकृत घोषणा केली आहे.
महाराष्ट्राचा ‘गणेशोत्सव’ चित्ररथ अव्वल
यंदा महाराष्ट्राने ‘गणेशोत्सव : आत्मनिर्भरतेचे प्रतीक’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ सादर केला होता. या चित्ररथातून महाराष्ट्राची समृद्ध लोकसंस्कृती, गणेशोत्सवाची परंपरा, तसेच या उत्सवातून निर्माण होणारे रोजगार आणि आत्मनिर्भरतेचा संदेश प्रभावीपणे मांडण्यात आला. चित्ररथावरील भव्य गणेशमूर्ती, पारंपरिक ढोल-ताशा पथक आणि लेझीम खेळणाऱ्या कलाकारांनी कर्तव्यपथावर उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. या उत्कृष्ट सादरीकरणामुळे परीक्षकांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांच्या गटातून महाराष्ट्राच्या चित्ररथाला सर्वोत्तम चित्ररथ म्हणून घोषित केले.
दिल्ली पोलिसांच्या संचलन पथकाला सर्वोत्कृष्ट पुरस्कार
फक्त राज्यांच्या श्रेणीतच नाही, तर इतर विभागांतही चुरस पाहायला मिळाली. सेना दलांच्या गटात भारतीय नौदलाच्या संचलन पथकाला, तर निमलष्करी दलांच्या गटात दिल्ली पोलिसांच्या संचलन पथकाला सर्वोत्कृष्ट पुरस्कार देण्यात आला. केंद्रीय मंत्रालयांच्या गटात सांस्कृतिक मंत्रालयाच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक मिळवला. तर, केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ‘वंदे मातरम्’ नृत्य समूहाला विशेष पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
‘पॉप्युलर चॉईस’ निकालही जाहीर
MyGov पोर्टलवर घेण्यात आलेल्या ऑनलाईन व्होटिंगवर आधारित ‘पॉप्युलर चॉईस’ श्रेणीचे निकालही जाहीर करण्यात आले आहेत. तीनही सैन्यदलांमध्ये आसाम रेजिमेंट सर्वोत्कृष्ट संचलन पथक ठरले. तर, केंद्रीय सशस्त्र पोलीस दल (CAPF) व सहाय्यक दलांमध्ये केंद्रीय राखीव पोलिस दल (CRPF) ला सर्वाधिक मते मिळाली आहेत.
चित्ररथांच्या ‘पॉप्युलर चॉईस’ विभागात गुजरात - ‘स्वदेशी मंत्र : आत्मनिर्भरता - स्वातंत्र्य : वंदे मातरम्’ (प्रथम), उत्तर प्रदेश - बुंदेलखंडची संस्कृती (द्वितीय) तर राजस्थान - ‘वाळवंटाचा सुवर्णस्पर्श : बिकानेर गोल्ड आर्ट (तृतीय) असे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.
शिक्षण विभागाचाही सन्मान
केंद्रीय मंत्रालयांमध्ये शालेय शिक्षण व साक्षरता विभागाला ‘राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० : विकसित भारताच्या दिशेने भारतीय शालेय शिक्षणाची झेप’ या चित्ररथासाठी पॉप्युलर चॉईस पुरस्कार देण्यात आला.