

डोंबिवली पूर्व येथील नागरिक आणि रोजच्या प्रवाशांसाठी महत्त्वाची माहिती समोर आली आहे. डोंबिवली ट्रॅफिक सब डिव्हिजनअंतर्गत येणाऱ्या पाथर्ली रोडवर वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. हे तात्पुरते बदल वाहतूक कोंडी होऊ नये तसेच परिसरातील वाहतूक सुरळीत राहावी, यासाठी करण्यात आल्याची माहिती ठाणे वाहतूक पोलिसांनी दिली आहे.
पाथर्ली रोडवरील सरोवर बार रेस्टॉरंट ते साईबाबा मंदिर या अरुंद रस्त्यावर ३ फेब्रुवारी २०२६ पासून दुरुस्तीचे काम सुरू होणार आहे. रस्त्याची रुंदी कमी असल्यामुळे काम सुरू असताना वाहतूक सुरू ठेवणे अशक्य असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे काम पूर्ण होईपर्यंत हा मार्ग पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, हा निर्णय सार्वजनिक सुरक्षेसाठी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी घेण्यात आला आहे.
वाहतूक बदल
पाथर्ली रोडवरून साईबाबा मंदिर व एमआयडीसी (MIDC) रोडकडे जाणाऱ्यांसाठी सरोवर बार रेस्टॉरंट परिसरात सर्व वाहने थांबवण्यात येणार आहेत. त्यानंतर वाहनचालकांनी डावीकडे वळून बालाजी मंदिर रोड मार्गे जिमखाना रोड वापरून पुढील प्रवास करावा. गर्दीच्या वेळेमध्ये गोंधळ टाळण्यासाठी याठिकाणी ट्रॅफिक पोलिसांची विशेष नियुक्ती करण्यात येणार आहे.
साईबाबा मंदिर व एमआयडीसी (MIDC) रोडवरून पाथर्ली रोडकडे येणाऱ्यांसाठी मंदिराजवळ प्रवेशबंदी लागू असल्याने वाहनचालकांनी आईस फॅक्टरी मार्गे मानपाडा रोडकडे डावे वळण घ्यावे किंवा जिमखाना रोड-बालाजी मंदिर रोड हा पर्यायी मार्ग वापरावा. प्रवास करताना नागरिकांनी फलकांचे निर्देश पाळावेत आणि तैनात कर्मचाऱ्यांना सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
अत्यावश्यक वाहनांना सवलत
ठाणे शहर पोलिसांनी जारी केलेल्या अधिकृत आदेशानुसार, ही वाहतूक मर्यादा ३ फेब्रुवारी २०२६ पासून काम पूर्ण होईपर्यंत लागू राहील. तसेच, पोलिसवाहने, अग्निशमन दल, रुग्णवाहिका, ऑक्सिजन गॅस वाहने आणि इतर अत्यावश्यक सेवा या निर्बंधांपासून मुक्त असतील.
"डोंबिवलीतील नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करून प्रशासनाला सहकार्य करावे", असे आवाहन ठाणे वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.