नवशक्ति अक्षररंग
अक्षररंग

वाचू आनंदे - जागतिक पुस्तकांच्या संगे

इसापनीती, भीम, हनुमान यांच्या बरोबरीनेच अरब-रशियन लोककथा, वंडरलँडमधील ॲलिस, जपानमधील तोत्तोचान, जादुई विश्वातला हॅरी पॉटर यांच्या माध्यमातून संपूर्ण विश्वच वाचनाच्या माध्यमातून मुलांच्या भावविश्वाचा भाग बनत असतं. वाचनामुळे बालवयातच देशोदेशींच्या कथा मुलांच्या कानात-मनात गुंजू लागतात.

नवशक्ती Web Desk

- शब्दरंग

- प्राची बापट

इसापनीती, भीम, हनुमान यांच्या बरोबरीनेच अरब-रशियन लोककथा, वंडरलँडमधील ॲलिस, जपानमधील तोत्तोचान, जादुई विश्वातला हॅरी पॉटर यांच्या माध्यमातून संपूर्ण विश्वच वाचनाच्या माध्यमातून मुलांच्या भावविश्वाचा भाग बनत असतं. वाचनामुळे बालवयातच देशोदेशींच्या कथा मुलांच्या कानात-मनात गुंजू लागतात.

इसापनीतीतल्या इसापाने सांगितलेल्या बोधकथा, अल्लाउद्दीनचा जादुई दिवा आणि उडणारा गालिचा, अरबस्थानातल्या सुरस आणि रम्य अरबी कथा, ‘ॲलिसेज् ॲडव्हेंचर्स इन वंडरलँड’मधली छोटीशी, गोड ॲलिस, जपानमधली चुणचुणीत, चाणाक्ष तोत्तोचान आणि रशियन लोककथांमध्ये येणाऱ्या म्हाताऱ्या आजीबाई, बोलणारे लांडगे आणि अस्वलं यांनी कितीतरी दशकं करोडो भारतीय मुलांचं बालपण समृद्ध केलं आहे. वाचताना या कथा, त्यातलं वातावरण, नायक, त्यांची भाषा काही म्हणजे काहीच भारतीय नाही आहे, याचा थांगपत्ता देखील इथल्या मुलांना कधी लागला नाही.

अगदी जन्माला आल्यापासूनच गोष्टी ऐकत आपण मोठे होतो. रामायण, महाभारत, पंचतंत्र, राजाराणी, महापुरुषांच्या कहाण्या ऐकतच आपण सगळे वाढलेलो असतो. काही जणांचं वाढणं मात्र महासागरांच्या आणि खंडांच्या सीमा ओलांडून जातं, अगदी बालवयातच त्यांच्या जगण्याचा अक्षांश-रेखांश बदलत जातो.

साहित्य हे एखाद्या देशाच्या संस्कृतीचा आरसा असतो. नितळ आणि निखळ. आहे ती आणि केवळ तीच प्रतिमा दाखवणारा. मग बाल साहित्य काय असावं? कसं असावं? तर बहुदा त्या देशात राहणाऱ्या जाणत्या, लिहित्या, समंजस माणसांना त्यांच्या पुढल्या पिढीला त्या देशातल्या लोकसंस्कृतीचं, स्थानिक भाषांचं, ऐतिहासिक वारशांचं, सामाजिक वास्तवाचं जे संचित द्यायचं असतं ते सगळंच त्यात असावं. लिहित्या माणसांच्या मनातली जग नामक व्यवस्थेची एक आदर्श कल्पना आणि घडून गेलेल्या काळाचं बेमालूम मिश्रण बाल साहित्यात वारंवार डोकावत असतं. म्हणून तर यात शूर, दानी, न्यायप्रिय राजांच्या कथा असतात आणि माणसांची स्वप्नं आपल्या जादूच्या कांडीने झटक्यात सोडवणाऱ्या पऱ्या देखील असतात. वास्तव आणि कल्पनेचा असा अद्भुत खेळ क्वचितच कोणत्या अन्य साहित्य प्रकारात घडत असेल.

कधी बालसाहित्यात अलगद उमटत राहतात एखाद्या देशातल्या लहान मुलांचे प्रश्न आणि त्यांना मोठ्या माणसांनी दिलेला प्रतिसाद. जशी जपानमधल्या औपचारिक शालेय चौकटीत घुसमटून जाणारी तोत्तोचान. एका मोठ्या, सरकारी शाळेतून तिला काढलं जातं. कारण तोत्तोचानचं लक्ष रोजच्या अभ्यासात आणि क्रमिक पुस्तकांत मुळीच लागत नसतं. मग तिला एका जगावेगळ्या, अपारंपरिक शाळेत घातलं जातं, एका जुन्या गाडीच्या एका डब्यात ही शाळा भरत असते. तिथलं मोकळं, प्रसन्न वातावरण, लहानग्या तोत्तोला समजून घेणारी शिक्षिका, तिला तिच्या नादाने आणि गतीने शिकायला मिळणं आणि हळूहळू माणूस म्हणून तिचं घडत जाणं. हा सगळाच एक अतिशय समृद्ध करणारा अनुभव आहे. तेत्सुको कुरोयानागी यांनी स्वतःच्या बालपणावर लिहिलेली ही कादंबरी आपल्याला १९३० च्या दशकातल्या जपानमधल्या सामान्य माणसांच्या रोजच्या जगण्याचं फार जवळून आणि उत्कटतेने दर्शन घडवून जाते. सर्वसामान्य मुलांपेक्षा थोडी वेगळी असणारी, कोणत्याही पठडीत न बसणारी तोत्तोचान केवळ एका आगळ्यावेगळ्या शाळेमुळे आणि पठडीबाहेरचा विचार करणाऱ्या, सहृदयी शिक्षकांमुळे माणूस म्हणून एक कणखर, आत्मविश्वासाने मुसमुसलेली, स्वतंत्रपणे विचार करणारी लेखिका बनते. हे सगळंच थक्क करून सोडणारं आणि मुळातूनच वाचण्यासारखं आहे.

असंच दुसरं एक बाल वाचकांना आणि त्यांच्या पालकांना देखील एकाच वेळी आवर्जून भेट दिलं जाणारं पुस्तक म्हणजे जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर या प्रख्यात अमेरिकेन कृषितज्ज्ञाचं चरित्र. ते अगदी साध्या-सोप्या भाषेत आणि अतिशय रसाळ पद्धतीने वीणाताई गवाणकरांनी लिहिलं आहे. त्यांनी ‘एक होता कार्व्हर’ या पुस्तकात छोट्या कार्व्हरचं अनाथ बालपण, जगण्यासाठी त्याने केलेली धडपड आणि त्यातून त्याने स्वतःला घडवत जाणं हा सगळाच प्रवास अतिशय छान गुंफला आहे. अतिशय प्रेरणादायी असं हे चरित्र आहे. त्यामुळे हे पुस्तक अगदी आवर्जून मुलांना वाचायला सांगितलं जातं आणि लहान मुलं देखील त्यात गुंतून, गुंगून जातात.

पुस्तकं वाचण्यात रममाण झालेली मुलं हे चित्रंच इतकं आश्वासक आहे की अशा मुलांकडे बघताना आपले पाय जिथल्या तिथेच खिळून जातात. घरात, शाळेतल्या मधल्या सुट्टीत, छोट्या वाचनालयात, कधी बागेतल्या मोठ्या झाडाखाली बसून, एखाद्या छोट्याशा गावातील नदीवरच्या दगडांच्या कपारीत बसत, उन्हापावसात काही मुलं अखंड वाचत असतात. अशी पुस्तकांत बुडालेली मुलं आजकाल कमी कमी होत आहेत, अशी खंत गेली काही वर्षं आपण सातत्याने ऐकत आहोत. संगणकाचा वाढता आणि अपरिहार्य ठरलेला वापर, अगदी सुलभरीतीने उपलब्ध असलेला स्मार्ट फोन आणि त्यावर सहजासहजी उपलब्ध असलेला सोशल मीडियाचा धुमाकूळ आणि त्याने मुलांच्या वाचनावर घातलेला घाला ही आजची ज्वलंत वस्तुस्थिती आहेच, पण तरीही वाचणारी मुलं देखील भरपूर आहेतच आणि ती भरपूर वाचत देखील आहेत.

मग आता ही सगळी मुलं नक्की काय वाचत असतील? अनेकदा आजच्या मुलांच्या वाचनाचा कल हा वेगवेगळ्या पठडीतल्या देशोदेशीच्या कथा, सायन्स फिक्शन, मांगा (जपानी ग्राफिकबुक्स) वाचण्याकडे वाढतो आहे. त्याच बरोबरीने मुलांशी संवाद साधणाऱ्या इंटर ॲक्टिव्ह पुस्तकांचा खप देखील वाढता आहेच.

जागतिक बालसाहित्य म्हटलं, की नकळत काही पुस्तकं त्यांच्या मुखपृष्ठांसह आपल्या डोळ्यांसमोर उभी राहतात. त्यातलीच काही ठळक उदाहरणं बघू. इंग्रजीत ज्याला ‘फॅक्शन’ (fact + fiction) म्हणता येईल अशा पुस्तकांची एक स्वतंत्र शाखाच आहे. वाचताना मुलं त्यातल्या गोष्टीमध्ये रंगतात आणि त्या सोबत दिलेल्या तळटिपांमधून, चित्रांमधून, तक्त्यांमधून वाचता-वाचताच त्यांना त्या त्या विषयावरची विस्तृत माहिती मिळत जाते.

मेरी पोप ऑस्बॉर्नची ‘मॅजिक ट्री हाऊस’ नावाची एक पुस्तकमालिका आहे. जॅक नि अ‍ॅनी नावाचे भाऊबहीण ‘मॉर्गन’ची एका काळ्या मंत्रापासून सुटका करायला निघतात. त्यांच्यासोबत जादूचं मचाण (ट्री हाऊस) असतं. त्या प्रवासात ही दोन धडपडी मुलं चार प्राचीन कूटकथांची उत्तरं शोधून काढतात, ‘मास्टर लायब्रेरियन्स’ होतात, चार प्राचीन मिथककथांचं पुनरुज्जीवन करतात आणि त्यांना काळाच्या पोटात लुप्त होण्यापासून वाचवतात, अशी ही गोष्ट आहे. या पुस्तकासोबत ‘मॅजिक ट्री हाऊस फॅक्ट ट्रॅकर्स’ अशी एक जोडपुस्तिकाही मिळते. त्यातही मूळ गोष्टीतल्या कितीतरी घटकांची पार्श्वभूमी आणि इतर सखोल माहिती पुरवलेली आहे.

या सगळ्या देश-विदेशातील पुस्तकांच्या यादीत एका पुस्तकाचा उल्लेख केला गेला नाही तर ही यादी कधीच पूर्ण होणार नाही. सुज्ञ आणि चाणाक्ष वाचकांनी त्या पुस्तक मालिकेचं नाव आतापर्यंत ओळखलं असेलच. ती मालिका आहे ब्रिटिश लेखिका जे. के. राऊलिंग यांनी लिहिलेल्या ‘हॅरी पॉटरची’. या ‘हरी कुंभाराने’ जगभरच्या मुलांना असं काही वेड लावलं की जगभरच्या मुलांनी या १२ पुस्तकांची अतिशय भक्तिभावानं पारायणं केली.

तर लहान मुलं आणि पुस्तकं यांचं एक अतूट आणि जैविक नातं आहे. मग ती मुलं कोणत्या का देशातील असेनात. पुस्तकं मुलांना एका वेगळ्या जगात घेऊन जातात. अशा एका जगात जिथे शांती आणि सौहार्द असतं, जिथे धार्मिक, वांशिक युद्ध नसतात, जिथे शारीरिक, मानसिक आजार नसतात, जिथे लहान मुलं अगदी आनंदाने, निर्भयतेने सुखनैव हसू, खेळू, बागडू शकतात. अशा त्या जगात होरपळलेली, बालपण अकालीच संपून गेलेली मुलं परत एकदा रूजू शकतात. म्हणून तर युद्धग्रस्त भागातील मुलांना परत उमलू देण्यासाठी त्यांच्या हातात पुस्तकं ठेवली जातात. कारण उत्तम साहित्यात माणसांना सावरण्याची अपार शक्ती असते आणि जगभरच्या मुलांना त्यांच्यासाठी लिहिलेली करोडो पुस्तकं ऊर्जा आणि शक्ती पुरवत राहतात. म्हणूनच तर पुस्तकं वाचणारी मुलं फार फार देखणी दिसतात. दिसतातच!

अनुवादक आणि साहित्याच्या आस्वादक

कोकणवासीयांना यंदाही ‘बाप्पा’ पावणार; कोकणात जाणाऱ्यांना टोल माफी

श्रावणात पावसाची १५ दिवस सुट्टी; १५ ऑगस्टनंतरच पावसाची बॅटिंग, भारतीय हवामान विभागाची माहिती

मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय; कृषी उत्पन्न बाजार समित्यांवर थेट नियंत्रणाचा मार्ग मोकळा

ऑपरेशन सिंदूरबाबत आक्षेपार्ह मजकूर नडला; FIR रद्द करण्यास हायकोर्टाचा नकार

IND vs ENG : "तू आम्हाला शिकवू नकोस"; खेळपट्टी पाहण्यास अटकाव करणाऱ्या ओव्हलच्या पिच क्युरेटरवर संतापला गौतम गंभीर | Video