रंग बदलणारे किमयागार  
अक्षररंग

रंग बदलणारे किमयागार

'सरड्यासारखा रंग बदलतोस!' असं आपण कुत्सितपणे म्हणतो खरं, पण निसर्गातली ही रंगबदलाची किमया केवळ फसवणुकीसाठी नसते. निसर्गातील या बहुरूपी किमयागारांच्या अद्भूत जगाचा घेतलेला हा एक मागोवा!

नवशक्ती Web Desk

अजब निसर्ग

मकरंद जोशी

'सरड्यासारखा रंग बदलतोस!' असं आपण कुत्सितपणे म्हणतो खरं, पण निसर्गातली ही रंगबदलाची किमया केवळ फसवणुकीसाठी नसते. निसर्गातील या बहुरूपी किमयागारांच्या अद्भूत जगाचा घेतलेला हा एक मागोवा!

आपल्या माणसांच्या जगात दिलेला शब्द फिरवणाऱ्या, वारंवार भूमिका किंवा पक्ष बदलणाऱ्या व्यक्तीला ‘काय सरड्यासारखे रंग बदलतोस !’ असं हमखास म्हटलं जातं. या उदाहरणातला सरडा म्हणजे आपला नेहमीचा, बागेत किंवा शेतात दिसणारा सरडा नाही. हा बाग सरडा (कलोटिस वर्सिकलर) रंग बदलतो पण सतत नाही. प्रामुख्याने विणीच्या हंगामात मादीला आकर्षित करायला नर सरड्यांच्या डोक्यावर शेंदूर थापल्यासारखा शेंदरी रंग दिसायला लागतो. त्याचप्रमाणे याच काळात या सरड्याच्या नेहमीच्या तपकिरी मातकट रंगावर पिवळ्या आणि काळ्या रंगाची छटाही गडद झालेली पाहायला मिळते. मात्र खऱ्या अर्थाने रंग बदलणारा सरडा म्हणजे ‘शॅमेलिऑन’, याला महाराष्ट्रात ग्रामीण भागात ‘घोयरा सरडा’ असं नाव आहे.झपाट्याने रंग बदलणारा शॅमेलिऑन त्याचं चपटं शरीर, शिरस्त्राणासारखं डोकं, शंकूच्या आकारचे डोळे यामुळे आधीच एखाद्या परग्रहावरील जीवासारखा भासतो. त्यात आपला हिरवा रंग बघता बघता पिवळा, पिवळ्यावर काळे-तपकिरी चट्टे, हिरव्यावर काळे पट्टे असा बदलतो तेव्हा जणू बहुरुपी जादुगारच वाटतो. शॅमेलिऑन ही रंग बदलण्याची किमया कशामुळे करू शकतो? तर रंग बदलणाऱ्या इतर प्राण्यांप्रमाणेच शॅमेलिऑनच्या त्वचेतही ‘क्रोमॅटोफोर्स’ या विशेष पेशी असतात. या पेशींमध्ये रंगाचे पिगमेंट्स असतात. या पिगमेंट्समध्ये सरड्याच्या अंगावर पडणारा सूर्यप्रकाश शोषला जातो, त्यात जी प्रकाशकिरणे शोषली जात नाहीत ती परावर्तीत होतात आणि आपल्याला सरड्याच्या अंगावर वेगवेगळे रंग बघायला मिळतात. सरड्याच्या शरीरातल्या क्रोमॅटोफोर्स पेशींना त्यात असलेल्या वेगवेगळ्या रंगांवरुन नावे देण्यात आली आहेत. या पेशींना एकवटून किंवा त्यांना पसरून शॅमेलिऑन झटपट रंग बदलतात. शिवाय त्यांच्या त्वचेमध्ये ‘इरिडोफोर’नावाच्या विशेष पेशींचाही एक थर असतो, या रंगपेशीदेखील प्रकाशकिरण परावर्तित करुन रंग बदलायला मदत करतात.

रंग बदलणारा प्राणी म्हटल्यावर आपल्याला नेहमी पहिलं नाव आठवतं ते शॅमेलिऑन सरड्याचं, पण रंग बदलण्याची किमया फक्त या एकाच प्राण्याला अवगत नाहीये तर इतर अनेक प्राणी यात माहिर आहेत. सागरातला आठ पायांचा (का हातांचा?) ऑक्टोपस शाई सोडून आपला बचाव करण्यासाठी जसा प्रसिध्द आहे त्याचप्रमाणे काही प्रजाती भोवतालच्या परिसराशी मिळतजुळता रंग धारण करण्यासाठीही ओळखल्या जातात. अशा एका प्रजातीच्या शास्त्रिय नावातच ‘मिमिकस’ हा शब्द आहे, जो ऑक्टोपसच्या ‘मिमिक’म्हणजे नक्कल करण्याच्या कौशल्याला दाद देणारा आहे. शॅमेलिऑनप्रमाणेच हे ऑक्टोपससुध्दा ‘क्रोमोटोफोर्स ’ आणि ‘इरिडोफोर’ या पेशींच्या मदतीने आपल्या शरीराचा रंग बदलतात. मात्र अद्भूत भाग हा की, ऑक्टोपसला त्याच्या डोळ्यांनी सगळे रंग दिसतच नाहीत ! त्याच्या डोळ्यांनी दिसणारं अवतीभवतीचं जग हे करड्या रंगाच्या छटांमध्येच असतं. मग ऑक्टोपसला कसं कळतं की, कोणते रंग धारण करायला हवेत? तर यासाठी त्याला मदत होते त्याच्या आठ पायांची, या पायांच्या मदतीने त्याला रंगांचं भान येतं, कारण या पायांवरच्या सूक्ष्म तंतूंमध्ये ‘ऑपसिन्स’ नावाचं रसायन असतं. या तंतूपर्यंत पोहोचलेल्या प्रकाशकिरणांच्या वेव्हलेंग्थवरुन ऑक्टोपसला भोवतालच्या रंगांचं ज्ञान होतं. पायांवरील तंतूंनी गोळा केलेली माहिती एकत्र करुन मज्जा केंद्राला पुरवली जाते, त्यानुसार मग कोणता रंग कशा प्रमाणात दाखवायचा ते ठरतं आणि ऑक्टोपस रंग बदलतो.

रंग बदलण्याची जादू येणारा एक चिमुकला जीव म्हणजे ‘क्रॅब स्पायडर’. आता कोळ्याला खेकडा का म्हणतात ? हा कोळी आपले पुढचे दोन पाय खेकड्याच्या नांग्यांप्रमाणे फाकवून ठेवतो, शिवाय खेकड्याप्रमाणे हा कोळी आडवा आणि मागे-मागे असा चालू शकतो. क्रॅब स्पायडर्स इतर कोळ्यांप्रमाणे जाळे विणत नाहीत. ते फुलांमध्ये लपून बसतात आणि फुलांवर येणाऱ्या माशांची शिकार करतात. त्यामुळे त्यांना फ्लॉवर स्पायडर असेही म्हटलं जातं. या क्रॅब स्पायडरच्या उत्तर अमेरिकेत आढळणारी ‘मिसुमेन वाटिया’ आणि ऑस्ट्रेलियात आढळणारी ‘थोमिसस स्पेक्टॅबिलिस’या दोन प्रजातींमधल्या कोळ्यांना रंग बदलण्याची किमया अवगत असते. ते ज्या रंगच्या फुलांवर दबा धरुन बसलेले असतात, त्या फुलाच्या रंगानुसार ते पांढरा,पिवळा,किंचित लालसर किंवा हिरवा रंग धारण करतात. मात्र हा रंग बदल ते शॅमेलिऑनसारखा तात्काळ करु शकत नाहीत, त्यासाठी काही दिवसांचा वेळ लागतो. पाण्यात आणि जमिनीवर दोन्हीकडे आरामात राहू शकणाऱ्या उभयचरांमधील बेडकांमध्येही रंग बदलण्याचा गुणधर्म पाहायला मिळतो. आपल्या भारतातील बुल फ्रॉगसारखे काही बेडूक फक्त विणीच्या हंगामात वेगळा रंग धारण करतात पण उत्तर अमेरिका आणि कॅनडामधील ‘ग्रे ट्री फ्रॉग’ हा प्रामुख्याने झाडावर राहाणारा बेडूक मात्र शॅमेलिऑनसारखे रंग बदलू शकतो. याच्या शास्त्रिय नावातील ‘वर्सिकलर’हा शब्दच त्याच्या बहुरंगी वैशिष्ट्यामुळे आला आहे. भोवतालच्या परिसरात मिसळून जाण्यासाठी हे बेडूक आपला करडा रंग हिरवा किंवा तपकिरी करू शकतात. गडद काळ्यारंगापासून ते पूर्ण पांढऱ्या रंगापर्यंत रंग बदल हे बेडूक करू शकतात. आपल्या शरीरातील तपकिरी-काळ्या रंगपेशी, पिवळ्या रंगपेशी यांचे आकुंचन-प्रसरण करुन ट्री फ्रॉग आपला रंग बदलतात. किटक,सरपटणारे प्राणी आणि उभयचर ज्या पध्दतीने आवश्यक असेल तेव्हा जसा रंग बदलू शकतात त्या प्रमाणे सस्तन प्राणि जरी रंग बदलत नसले तरी काही प्राणी वर्षातील ठराविक काळ भोवतालच्या बदललेल्या सृष्टीशी मिळून घेण्यासाठी रंग बदलताना पाहायला मिळतात. याचं उत्तम उदाहरण म्हणजे ‘आर्क्टिक फॉक्स. ध्रूविय हवामानाच्या बर्फाळ परिसरात आढळणारा हा खोकड (फॉक्स म्हणजे कोल्हा नाही ! जॅकल म्हणजे कोल्हा !!) ऋतुंनुसार आपल्या शरीरावरील केसांचा रंग बदलताना पाहायला मिळतो. हिवाळ्यात जेव्हा अवतीभवती बर्फाचे साम्राज्य असते तेव्हा त्याच्या अंगावरील उबदार केसांचे आवरण त्या बर्फाशी मिळते जुळते होण्यासाठी पांढरे शुभ्र होऊन जाते. पुढे उन्हाळा सुरू झाला आणि बर्फ वितळून खुरटी झाडे उगवू लागली की हा रंग तपकिरी होतो. अशा प्रकारे वर्षातून दोनवेळा आपल्या शरीरावरील केसांचा रंग बदलून आर्क्टिक्ट फॉक्स भोवतालच्या निसर्गात मिसळून जातो. उत्तर अमेरिकेत सापडणारा रॉक टार्मिगन हा पक्षीसुध्दा हिवाळा आल्यावर आपला तपकिरी रंग टाकून पांढराशुभ्र रंग धारण करतो. उत्तर गोलार्धातील धृविय प्रदेशात सुमारे २० प्रकारचे पक्षी आणि प्राणी हिवाळ्यात भोवतालच्या बर्फाचा रंग धारण करताना पाहायला मिळतात.

निसर्गातले हे रंग बदलणारे किमयागार स्वतःच्या बचावासाठी, संरक्षणासाठी, सहजगत्या शिकार मिळवण्यासाठी रंग बदल करतात.मात्र रंग बदल हा नेहमीच फक्त बचावासाठी नसतो. अनेकदा तो वेगळं दिसण्यासाठी,उठून दिसण्यासाठी ही असतो. रंगांच्या माध्यमातून प्राणी संवाद साधतात. रंगाच्या भाषेतून प्राणी आपला राग,प्रेम,वर्चस्व व्यक्त करतात. शॅमेलिऑनमध्ये मादीला प्रभावित करुन, मिलनासाठी तयार करण्यासाठी रंग बदलण्याचं कौशल्य वापरलं जातं. ऑक्टोपस जेव्हा गडद रंग धारण करतात तेव्हा ते आपला आक्रमक पवित्रा सांगत असतात. निसर्गाने प्रत्येक जीवाला एक खास असं वैशिष्ट्य दिलेलं आहे, रंग बदलण्याची किमया हे त्याचंच उदाहरण म्हणता येईल.

निसर्ग अभ्यासक व लेखक

makarandvj@gmail.com

Mumbai : आजपासून मिठी नदीतील गाळ उपसणार; अखेर कंत्राटदाराची नियुक्ती

राज्याला उष्णतेच्या लाटेचा तडाखा; जळगाव, नाशिक, पालघरमध्ये आढळले उष्माघाताचे रुग्ण

Mumbai : मध्य रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक; ट्रान्स-हार्बर मार्गावरही ब्लॉक

विवाहित पुरुष आणि प्रौढ महिला यांचे लिव्ह-इन-रिलेशन हा गुन्हा नाही; अलाहाबाद उच्च न्यायालयाचा निकाल

वेळेत भूसंपादन न झाल्यास जमीन मालकाचीच; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा