लोकवाङ्मयातील खाद्यसंस्कृती
डॉ. मुकुंद कुळे
दिवाळी आणि फराळ, दिवाळी आणि फटाके हे दिवाळीचं जे आजचं स्वरूप आहे, ते नागर संस्कृतीतून तयार झालं आहे. ग्रामीण संस्कृतीत मात्र दीपावली हा कृषिसंस्कृतीचा सण आहे. ज्या गुराढोरांच्या आधाराने ही कृषिसंस्कृती फळते, त्यांच्याप्रति कृतज्ञता व्यक्त करणारा, घरात आलेल्या नवधान्याची पूजा करणारा आणि ‘इडा पीडा टळो, बळीचे राज्य येवो’, असं म्हणत कृषिसंस्कृतीचा महानायक बळीराजाची पूजा करणारा सण हेच दिवाळीचं परंपरागत रूप आहे.
सण-उत्सवाचे दिवस आले की, कोणाही स्त्रीच्या मनात माहेरच्या आठवणींचे कढ दाटून येतात. दसरा-दिवाळीला तर जास्तच. अजाण वयात भावा-बहिणींसह केलेली धमाल आठवून जीव अगदी कसनुसा होऊन जातो. अर्थात वाईट काहीच झालेलं नसतं... जो-तो ज्याच्या-त्याच्या संसारात रमलेला असतो. सुखी-समाधानीही असतो... अन् तरीही हातातून काहीतरी निसटून गेल्यासारखं लोकपरंपरेतील मायबाईला-सासुरवाशिणीला वाटत राहतं. ते निसटून गेलेलं काहीतरी म्हणजे अनेकदा, माहेरची वाट आणि माहेरची माणसंच असतात. कारण आपापल्या संसारात पडल्यावर बाईमाणसाला माहेरापेक्षा, आपलं सासरचं घरदारच पंखाखाली घ्यावं लागतं... इच्छा असो वा नसो, तिथे रमावं लागतं. पण, सण-उत्सवाच्या निमित्ताने का होईना, बाई माहेराचा धागा पुन्हा पुन्हा जोडत राहते. आपलं माहेरपण टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करते... कारण -
“माझं हक्काचं ग ठाणं, आमचा चिरेबंदी वाडा
कधी दुखले खुपले, काढा कडी न् कोयंडा..”
म्हणजे कधी तरी का होईना, पण हक्काने येण्यासाठी बाईला आपलं माहेर असावंसं वाटतं. म्हणून तर सासरी नांदत असतानाही ती माहेराचीही काळजी करत असते. माहेरासाठी देवाकडे-निसर्गाकडे मागणं मागत असते -
“आला दीपवाळीचा सण, केली दिव्यांची आरास
माझ्या बंधवाच्या घरी, राहो सुखाचा निवास...”
n कृषिउत्सव हेच मूळ स्वरूप : खरंतर आज शहरात दिमाखात साजरी केली जाणारी दिवाळी म्हणजे मूळ कृषिसंस्कृतीतला उत्सव. किंबहुना तो एक प्रकृती उत्सवच असतो. शेतीचा पावसाळी हंगाम संपलेला असतो अणि दारापुढचं खळं शेतात पिकलेल्या धनधान्याने भरून वाहत असतं. नव्याने घरात आलेलं हे धान्य आणि ते ज्यांच्यामुळे आलं, ती गुरं..त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी म्हणून हा सण साजरा केला जातो. त्यामुळेच नागर संस्कृतीत दिवाळीला फराळ आणि फटाक्यांची आतषबाजी सुरू असते, तेव्हा अनागर संस्कृतीत मात्र हे धान्य पिकवणारा निसर्ग, गुरं आणि ज्याच्या काळात भूमिपुत्र अतिशय सुखासीन आयुष्य जगत होता, त्या बळीराजाची पूजा बांधली जाते. गुराखी-शेतकरी किंवा आदिवासी कोणीही असो, गावगाड्यात आणि वाड्या-पाड्यांत दिवाळीचे हे पाच दिवस निव्वळ प्रकृती उत्सव म्हणून साजरा होत असतो. महत्त्वाचं म्हणजे नागर संस्कृतीत दिवाळी सणाला आता पुराणकथांचं कोंदण चढवण्यात आलंय. पण पुराणकथांचे हे संदर्भ अनागर संस्कृतीतील दिवाळीत सापडत नाहीत. तिथे दिवाळी म्हणजे एक कृषिउत्सवच आहे!
म्हणून तर आज शहरांमध्ये दिसणाऱ्या फराळाचे उल्लेख लोकवाङ्यमातील दिवाळी गीतांत सापडत नाहीत. तिथे सासुरवाशीण माहेरपणाला गेली किंवा भाऊराया भाऊबीजेला बहिणीकडे आला तर नेहमीचेच गोडाधोडाचे पदार्थ बहिणीने भावासाठी रांधलेले दिसतात. म्हणजे चकल्या, चिवडा, शंकरपाळ्या किंवा लाडवांचे उल्लेख लोकगीतांत सापडत नाहीत. त्याऐवजी सोजीची खीर, जिरेसाळीचा भात, जोंधळ्याच्या म्हणजेच ज्वारीच्या आंबोळ्या (खरंतर नाजूक घावण), केळ्याचं शिकरण अशाच घरगुती पदार्थांचे उल्लेख सापडतात. उदाहरणार्थ -
“माझ्या नटव्या बंधुजीला
भाऊबीजेला बोलाविला
सोनसळी गहू
सोजी काढिती नकुल्याला”
किंवा
“हावस मला मोटी बंधुसंगं जेवायाची
भावजयी गुजरीनं ताटं केल्याती शेवायाची..”
किंवा
“सूजीच्या शेवायाला देते दुधाचा सडका
सरदार माजा बंधू पुत्र मातेचा लाडका..”
गाई-म्हशी ओवाळी: ... महाराष्ट्रातील किंवा देशभरातील कोणत्याही अनागर संस्कृतीत डोकावून पाहिलं, तरी तिथे दिवाळीला सारे जण आपल्या गुरांनाच ओवाळताना दिसतील. विशेषतः महाराष्ट्रामधील मराठवाड्यातील गुराखी समाज बघितला, तर हा समाज दिवाळीचा सण गुरांचा उत्सव म्हणूनच साजरा करताना दिसतो. त्यासाठी हा समाज धनत्रयोदशीपासून लव्हाळ्याची दिवटी विणायला सुरुवात करतो. लव्हाळी म्हणजे चांगलं पुरुषभर उंचीचं वाढलेलं गवत. या गवताच्या हिरव्या काड्यांपासून प्रत्येक घरातील गुराखी एक सुबक गवती दीपमाळ विणतो. रोज दीपमाळेचा एक थर याप्रमाणे पाच दिवसांत तो पाच थर विणतो. रोज नव्याने विणलेल्या दीपमाळेच्या खणात दिवा ठेवून त्या दिव्याने गुराखीराजा रोज आपल्या गुरांना ओवाळतो. लव्हाळ्याच्या दीपमाळेत ठेवण्यात येणारा हा दिवा म्हणजे शेणाच्या गोवरीचा तुकडा असतो.
लोकगीतांमधून फराळ अदृश्य : या कृषिउत्सवामुळेच दिवाळीसंबंधीच्या लोकगीतांत किंवा ओव्यांमध्ये अगदी भाजीपाल्याचा उल्लेख सापडतो, पण आजच्या फराळाचा नाही. म्हणूनच एका लोकगीतातील बहीण म्हणते -
“पाची परकाराचं ताट, भाजी मेथीची इसरली
बंधू माज्या सांगू किती, जेवा आता चुकी झाली
पाची परकाराचं ताट, काय करू मी जुंदळ्याचं
बंधू माज्याला आवडतं ताट नाजूक आंबोळ्याचं..”
या गाण्यामध्ये भाऊबीजेला घरी आलेल्या भाऊरायासाठी बहीण मेथीची भाजी करायला विसरलेली आहे आणि म्हणून ती त्याची विनवणी करत आहे. तसंच भाऊरायाला आवडतात म्हणून ती जोंधळ्याच्या आंबोळ्या (अर्थात जाळीदार घावण) करताना दिसते. यातील मेथीची भाजी काय किंवा आंबोळ्या काय, हे दोन्ही पदार्थ सर्वसामान्यांच्या ताटातले आहेत. या संदर्भाने बघायला गेलं तर दिवाळीच्या फराळाचा इतिहास फार मागे जाणार नाही कदाचित... फार फार तर शंभर-दीडशे वर्षांचा इतिहास असेल... म्हणजे नागरीकरण झालेला समाज अस्तित्वात आल्यानंतर कधीतरी आताची दिवाळी शहरांत साजरी व्हायला लागली असेल आणि मग पारंपरिक पदार्थांत सुधारणा करून आताचा फराळ अस्तित्वात आला असेल.
सांजोऱ्या, भजी, गोडघुल्या
अर्थात क्वचित कधी -
“आज दिवायीदिवायी खावा सांजोऱ्या नि लाडू
भज्या गोडघुल्या खावा, भाजी भाकर नका वाढू..”
असेही उल्लेख जुन्या अहिराणी गाण्यात सापडतात. पण इथेही सांजोऱ्या, भजी, गोडघुल्या हे स्थानिक पदार्थच दिवाळीत जेवणासाठी केलेले दिसतात. यातील सांजोऱ्या म्हणजे खानदेशात गोड सारण भरून केल्या जाणाऱ्या पुऱ्या; तर तिखट भजी आणि गोडघुल्या म्हणजे गव्हाच्या पिठात गूळ टाकून सरसरीत मिश्रणापासून केलेली गोड भजी.
समृद्धीचं प्रतीक - लाह्या : मात्र दिवाळीत भावासाठी कुणी कितीही नानाविध पदार्थ करू दे, भाऊबीजेच्या दिवशी त्याला ओवाळताना जोवर ताटातल्या ज्वारीच्या-साळीच्या-वरीच्या लाह्या त्याच्या मुखात पडत नाहीत, तोपर्यंत घरोघरच्या मायबाईला चैन पडत नाही. कारण या लाह्या म्हणजे समृद्धी, भरभराट आणि वंशवृद्धीचे प्रतीक! नागपंचमीला नागाला भाऊ मानून ओवाळताना त्यालाही दूध-लाह्यांचाच नैवेद्य दाखवला जातो, तसंच भाऊबीजेलाही भावाला ओवाळताना ताटात लाह्या ठेवल्या जातात आणि भरवल्या जातात. आता बदललेल्या काळानुसार ओवाळणीच्या ताटात कुणी लाह्या ठेवत नाही हे खरं... पण पूर्वी तशी पद्धत होती म्हणूनच जुन्या ओव्या-गाण्यांत तसे उल्लेखही सापडतात -
“दिवाळीच्या दिशी माझ्या ताटामंदी लाह्या
आस्या ववाळील्या भावासंगं भावजया..”
एकूण कृषिसंस्कृतीतील विविध घटकांनाच दिवाळी उत्सवातील पारंपरिक खाद्यसंस्कृतीत मानाचं स्थान राहिलेलं दिसतं. हा एकप्रकारे स्थानिक खाद्यसंस्कृतीचा-कृषिसंस्कृतीचा गौरवच आहे.
लोकरहाटीतली दिवाळी अशी कृषिसंस्कृती जागवणारी असते. शेतशिवाराची भरभराट होवो म्हणणारी, घरात गुरा-ढोरांची समृद्धी येवो म्हणणारी आणि बळीराजाच्या राज्याचं दान मागणारी. लोकरहाटीने आपली कृषिपरंपरा दिवाळीच्या सणात आणि खाद्यसंस्कृतीतही अजून टिकवून ठेवली आहे. नागर संस्कृतीच्या अतिक्रमणामुळे आता गावगाड्यातही शहरातल्याप्रमाणेच दिवाळी साजरी होऊ लागली आहे. शेवटी प्रत्येक संस्कृती आपला कमी-अधिक प्रभाव दुसऱ्या संस्कृतीवर टाकत असते; पण महाराष्ट्राच्या किंवा एकूणच भारतातील एखाद्या खेड्यात किंवा आदिवासी पाड्यावर गेलात, तर तिथे तुम्हाला दिवाळीला कृषिसंस्कृतीचाच जागर मांडलेला दिसेल!
mukundkule@gmail.com