अक्षररंग

शिक्षण एक सामाजिक बदलाचे प्रभावी साधन

शिक्षण हे केवळ ज्ञान देणारे साधन नसून समाजाला विवेकी, संवेदनशील आणि न्यायप्रिय दिशेने घडविणारे प्रभावी माध्यम आहे; पाठ्यपुस्तकांच्या या माध्यमातून घडणारे विचारच सामाजिक बदलांची पायाभरणी करतात.

Swapnil S

समाजभान

प्रभा पुरोहित

शिक्षण हे केवळ ज्ञान देणारे साधन नसून समाजाला विवेकी, संवेदनशील आणि न्यायप्रिय दिशेने घडविणारे प्रभावी माध्यम आहे; पाठ्यपुस्तकांच्या या माध्यमातून घडणारे विचारच सामाजिक बदलांची पायाभरणी करतात.

शिक्षण हे सामाजिक बदलांचे प्रभावी साधन आहे. संवेदनाशील मने घडविण्याचे काम पाठ्यपुस्तके करीत असतात. जोवर राजकीय व सामाजिक अभिनिवेश असणारी सत्ता आणि व्यक्ती इतिहासाच्या पाठ्यपुस्तकाची उद्दीष्टे ठरवितात तेव्हा पाठ्यपुस्तकातून वास्तवाशी फारकत घेणारे डाव खेळले जातात.

आजकाल त्या त्या विषयातील नॅशनल अडव्हायझरी कमिट्या बरखास्त करून सोयीच्या व्यक्तींकडून निकृष्ट सल्ला घेणे चालू आहे. आपल्याकडे योगेंद्र यादव, सुहास पळशीकर, विमला थापर अशा मान्यवरांनी मेहनत घेऊन केंद्रीय बोर्डासाठी दर्जेदार इतिहासाची पाठ्यपुस्तके निर्माण केली होती.. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाने त्यासंबंधी एक दिशा दाखवली होती ती अशी की, विद्यार्थ्याला एक जबाबदार, संवेदनाशील, विवेकी नागरिक बनविणे. शिक्षण परीक्षाकेंद्री नव्हे तर विद्यार्थीकेंद्री बनविणे. पाठ्यपुस्तके हाच ज्ञान मिळविण्याचा एकमेव मार्ग आहे असे न मानता विद्यार्थ्याला अन्य मार्गाने शिकण्याच्या प्रक्रियेत सक्रीय करणे आणि सर्वांत महत्वाचे म्हणजे शिक्षणाचा विद्यार्थ्याने आपल्या बाहेरील जीवनाशी संबंध जोडणे.. ह्या दृष्टिकोनातून नव्या पाठ्यपुस्तकांकडे बघणे या धोरणाला अभिप्रेत होते. सामाजिक न्यायाची चाड राखणारे संवेदनाक्षम मन घडविण्याचे आव्हान ह्या पुस्तकांनी यशस्वीपणे पेलले होते.. त्यातील काही भाग आणि त्यावरील काही प्रश्न वाचून त्याची कल्पना करता येईल.

एका प्राथमिक पुस्तकात विचारलेला प्रश्न असा आहे. तुमची वर्गशिक्षिका एका विद्यार्थ्याला वर्गावर लक्ष ठेवायला सांगून काही कामानिमित्त बाहेर जाते. बाई परत आल्यावर तो विद्यार्थी 'बाई हा वर्गात गडबड करीत होता' अशी तुमच्या विषयी खोटी तक्रार करतो. अशा वेळी तुम्ही काय कराल ?

दुसरे उदाहरण आहे वंशभेदावरचे. पुस्तकात जागोजागी संदर्भ गोष्टी येतात त्यातील ही एक. एका शाळेचे व्यवस्थापन सर्व गौरवर्णीयांचे असते. त्या शाळेतील एक कृष्णवर्ण विद्यार्थी दरवर्षी पहिला येतो. संतापून त्या मुलाचे नाव व्यवस्थापन शाळेतून काढून टाकते. इतर सर्व विद्यार्थी शाळेवर बहिष्कार टाकतात आणि त्या मुलाला परत शाळेत घ्यायला लावतात. (RTE खाली आपले विद्यार्थी निम्नस्तरातील विद्यार्थ्यांना आपल्या शाळेत घेण्यासाठी आग्रह धरीत आहेत असे एक दिवास्वप्न हे वाचताना मी पाहिले.)

रामचंद्र गुहा यांच्या पुस्तकातील क्रिकेट खेळाडू बाळू पालनकर यांची गोष्ट 'इतिहास अणि खेळ' या धड्यात येते. बाळू दलित समाजातील असल्याने तो कर्णधार होऊ शकत नाही. अखेरीस १९२३मध्ये त्याचा भाऊ विठ्ठल कर्णधार होतो आणि चौरंगी सामन्यामध्ये युरोपियनांच्या विरुद्ध तो सुप्रसिद्ध विजय प्राप्त करतो. हिंदू टीमच्या विजयाचे मुख्य कारण हिंदू जिमखान्याने धीटपणे आणि सूज्ञपणे केलेली विठ्ठल ह्या कर्णधाराची निवड हेच होय. हिंदू जिमखान्याचा हा दैदिप्यमान विजय हेच दर्शवितो की, अस्पृश्यता विरोधी चळवळ आपल्याला स्वराज्याकडे नेईल. म. गांधीनी वर्तविलेले हे भविष्य आहे. अशी एका क्रिकेट चाहत्याची टिपणीही त्यात दिली आहे.

पुस्तकात जागोजागी अत्यंत बोलकी चित्रे दिली आहेत. एका चित्रात एक खानदानी माणूस फाटक्या वेषातील नोकरांकडून सेवा घेताना दाखविला आहे, पुढे प्रश्न दिला आहे की, आपल्या घरचे नोकरचाकर हे सुदृढ, हसतमुख, समाधानी असलेले तुम्हाला आवडेल की असे फाटके, दुर्मुखलेले? उद्या काही गडबड झाली आणि त्यात ह्या शोषित लोकांनी तुमच्यावर सूड उगवला तर तुम्हाला काय वाटेल? (भले भले ह्या प्रश्नांनी नक्षलवादी तर घडणार नाहीत ना म्हणून भयग्रस्त आहेत.) या पुस्तकातील गॅसचेम्बर बाहेर पडलेला पायतणांचा खच अथवा पडलेल्या कपड्यांचा ढीग ही हिटलरच्या Holocaust संबंधी चित्रे तर आपली झोप उडवितात. हिटलरचे स्त्रियांसंबंधीचे विचार मांडल्यावर प्रश्न येतो. 'ह्या बाबत तुमचे म्हणणे मांडा. एक ज्यू स्त्री म्हणून आणि एक अन्य जर्मन स्त्री म्हणून.' नाझीझमवरील ह्या प्रकरणात म. गांधीनी हिटलरला लिहिलेली दोन पत्रे तसेच खालील नेहमी उदधृत केली जाणारी कविता पण दिली आहे.

'First they came for the communists.

Well, I was not a communist So I said Nothing'

हिटलरला मानणारे पण लोक आहेत, परंतु एकूण घडले ते मानवतेला कलंक लावणारेच होते असा संतुलित आढावा शेवट दिला आहे. ही सर्व पाठ्यपुस्तके मुळातूनच वाचायला हवी. इंग्रजांच्या जंगल विषयक धोरणावर टिपणी करताना माधव गाडगीळ अहवालाचा संदर्भ ही येतो.

आणखी एका विषय महत्वपूर्ण ठरतो. तो विषय आहे घटना साक्षरतेचा. जगातील अन्य राष्ट्राची परिस्थिती बघता 'विवेकाचा बोल' असे सांगतो की, राष्ट्र टिकून राहण्यासाठी लोकशाही प्रणाली ही एकमेव तारणहार आहे. लोकशाहीधर्माचा ग्रंथ त्याचे संविधान होय. त्यामुळे आपली सार्वजनिक वर्तनाची धारणा संविधानातील तत्वांशी विसंगत तर नाही ना हे तपासायला शिकविणे आवश्यक ठरते. धर्म-जात- लिंग समानता, सामाजिक न्याय आणि बंधुत्व ह्या मूलतत्वांबरोबर वैज्ञानिक दृष्टिकोन आचरणात आणणे, मानवतावाद आणि सुधारणेचे तत्व अंगीकारणे याचा अंतर्भाव नागरिकाचे एक कर्तव्य म्हणून घटनेत येतो. संविधानाप्रती निष्ठा राखणे, कायद्याचे आधिपत्य मान्य करणे, संसद आणि न्यायालय यावर विश्वास आणि सामाजिक अन्यायाबद्दल चीड या गोष्टीही शिक्षणात अंतर्भूत केल्या पाहिजेत. असे शिक्षण मिळाले तर माणसांची मेंढरे बनवून आपमतलब साधण्याऱ्या राजकारण्यांच्या स्वार्थी चालीला खीळ बसेल.धर्मनिरपेक्षतेचा अभ्यास पण घटनासाक्षरतेत मोडतो. ब्रुनो, कोपर्निकस आणि गॅलिलिओ या शास्त्रज्ञांचा चर्चने छळ केला. परंतु धर्मसत्तेचे आधिपत्य संपुष्टात आल्यावर पृथ्वी ही विश्वाच्या केंद्रस्थानी आहे आणि चंद्र, सूर्य ही देवाने आकाशात लटकवलेली झुंबरे आहेत ही बायबल प्रणीत अंधश्रद्धा नष्ट झाली. शास्त्रज्ञ लोकांस विश्वरचनेचे कोडे उलगडण्याची वाट मोकळी झाली. औद्योगिक क्रांतीला पोषक वातावरण निर्माण झाले. वैज्ञानिक दृष्टिकोनाचे अंधश्रद्धा निर्मूलनातील अनन्य साधारण महत्व दिसून आले.

समाजात कुठलेही परिवर्तन, मग ते अंधश्रद्धा निर्मूलन असो वा भ्रष्टाचार निर्मूलन असो, घडवून आणण्यासाठी वापरली जाणारी यंत्रणा पण परत त्याच बदल आवश्यक असलेल्या समाजाचा एक भाग असते. उदाहरण द्यायचे झाले तर भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी नेमलेला लोकपाल, त्याने वापरलेली पोलीसयंत्रणा, न्याययंत्रणा वा राजकारणी हे सर्व त्या भ्रष्ट समाजाचेच भाग असतात. हे दुष्टचक्र भेदणे कठीण असते. त्यात एकच आशेचा किरण म्हणजे 'शिक्षण' होय. समाजपरिवर्तनासाठी शिक्षणातून एक नीतीमान, सामाजिक न्यायाची चाड बाळगणारा, संवेदनाशील नागरिक घडविणे हीच 'लाख दुखोकी एक दवा है..' हे जीवन शिक्षण योग्य रीतीने विद्यार्थ्यांपर्यंत पोचविणारे प्रशिक्षित शिक्षक निर्माण करणे हे शिक्षण खात्यापुढील फार मोठे आव्हान आहे. त्यासाठी फार मोठ्या आर्थिक बळाची आणि मनुष्यबळाची गरज आहे.

प्राथमिक आरोग्य आणि शिक्षणाची जबाबदारी आपल्या खांद्यावरून झटकून टाकणारे सरकार हा बदल घडवून आणेल असे मानणे एक दिवास्वप्न ठरेल.

ज्येष्ठ लेखिका

मेन्टेनन्स योग्यच! प्रलंबित देखभाल शुल्क वसूल करण्याच्या सोसायटी निर्णयाला मान्यता

'इंडिगो'ला २२.२ कोटींचा दंड; DGCA ची कारवाई; कंपनीच्या व्यवस्थापनाला दिला कडक इशारा

एकाच बाईकवर 'विराट' आणि 'धोनी'! व्हायरल Video पाहून नेटकरी गोंधळले; कमेंट्समध्ये मजेशीर प्रतिक्रिया

दोन महिन्यांनंतर राजकुमार राव आणि पत्रलेखाने दाखवली लाडक्या लेकीची पहिली झलक, नावही केले जाहीर

Thane : स्वतंत्र लढलो असतो तर अधिक मते मिळाली असती; आमदार संजय केळकर यांचे मत