दुसरी बाजू
प्रकाश सावंत
मुंबई, ठाणे, पुण्यासारख्या महानगरांमध्ये पावसाळा आता केवळ सुखसरींचा आनंद घेऊन येत नाही, तर रस्त्यावरून चालणाऱ्या सामान्य नागरिकांच्या मनात एक अनाम भीतीही निर्माण करतो. कधी, केव्हा, कोणत्या रस्त्यावरील वा गल्लीतील झाड अंगावर कोसळेल याचा काहीच नेम उरलेला नाही. खड्डे आणि मॅनहोलच्या जीवघेण्या चक्रव्यूहात आधीच अडकलेल्या शहरी माणसाच्या डोक्यावर आता झाडांच्या पडझडीची टांगती तलवार आहे. वर्षानुवर्षे निमूटपणे सावली आणि विनातक्रार प्राणवायू देणारे हे वृक्ष आज अचानक जीवघेणे का ठरत आहेत?
यंदाच्या पावसाळ्यात मुंबई, ठाणे, पुण्यासारख्या महानगरांमध्ये झाडे उन्मळून काहींचा दुर्दैवी अंत ओढवला आहे. फळे-फुले देणारी, उन्हात सावली देणारी, प्राणवायूची पखरण करणारी, वन्यजीवांना हक्काचा अधिवास पुरविणारी परोपकारी झाडे का पडताहेत? या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी वनस्पतीशास्त्रज्ञ शार्दुल बाजीकर यांच्याशी संवाद साधला असता, त्यांनी पडणाऱ्या झाडांची व्यथावेदनाच मांडली आहे.
या संपूर्ण समस्येचे मूळ आपल्या महानगरांमधील रस्त्यांच्या अनिर्बंध आणि आंधळ्या 'काँक्रीटीकरणात' दडलेले असल्याचे सांगून त्यांनी यासंदर्भातील मूळ मुद्यालाच हात घातला. कोणत्याही झाडाच्या मुळांची वाढ होण्यासाठी, जमिनीतील पोषक तत्त्वे व पाणी शोषण्यासाठी सर्वप्रथम विस्तीर्ण आणि खुल्या जागेची गरज असते. प्रत्यक्षात शहरांमधील झाडाच्या खोडाला खेटून कठडे उभारले जातात. खोडाच्या भोवताली पेव्हर ब्लॉक बसवले जातात किंवा डांबर आणि काँक्रीट ओतले जाते. या काँक्रीटच्या फेऱ्यात अडकलेल्या झाडाच्या मुळांचा जीव कासावीस होतो. ती गुदमरतात. त्यांना श्वसनासाठी आवश्यक असलेली हवा आणि मातीतील ओलावा मिळत नाही. परिणामी, ही मुळे निसर्गाच्या नियमानुसार जमिनीत खोलवर जात नाहीत. उलट, ती जमिनीच्या पृष्ठभागावर वरचेवर पसरतात. त्यामुळे झाडाचे जमिनीशी असलेले घट्ट नातेच तुटते. काँक्रीटच्या वजनाने दबलेली कमकुवत मुळे झाडाच्या अवाढव्य पसाऱ्याचा भार पेलू शकत नाहीत. अखेर, वाऱ्याच्या एका झोताने संपूर्ण झाड मुळासकट उताणे पडते. झाडांची ही घुसमट केवळ झाडांच्या मुळावरच उठत नाही, तर प्रसंगी ती माणसाच्या जिवावरही बेतते.
दुसरा मुद्दा असा की, मान्सूनपूर्वी केली जाणारी वृक्ष छाटणी अत्यंत अशास्त्रीय पद्धतीने होते. निसर्गात प्रत्येक झाडाची एक विशिष्ट रचना असते. झाड स्वतःला स्थिर ठेवण्यासाठी त्याचे वजन सर्व बाजूंनी योग्य रीतीने समतोल साधते, ज्याला विज्ञानाच्या भाषेत 'सेंटर ऑफ ग्रॅविटी' (गुरुत्वीय मध्य) म्हटले जाते. हा गुरुत्वीय मध्य जेवढा जमिनीच्या जवळ असेल, तेवढे झाड वादळ-वाऱ्यात अधिक स्थिर राहते. मात्र, शहरात छाटणी करताना रस्त्यावरून जाणाऱ्या उंच वाहनांना अडथळा होतो किंवा इमारतींच्या खिडक्यांमध्ये फांद्या येतात म्हणून एकाच बाजूच्या सर्व फांद्या आणि पाने अंदाधुंदपणे कापून टाकली जातात. अशा प्रकारे झाडाच्या केवळ एकाच बाजूचे वजन कमी केल्यामुळे झाडाचे संतुलन पूर्णपणे ढासळते आणि स्थिर असलेले झाड आपण स्वतःहून अस्थिर करून ठेवतो. पूर्वीच्या काळी ग्रामीण भागात झाडांची निगा राखणारे पारंपरिक माळी असायचे, ज्यांना झाडांचे वजन संतुलित करण्याचे उपजत ज्ञान असायचे. कंत्राटदारांना केवळ त्यांचे काम लवकर उरकायचे असते. त्यामुळे झाडांच्या आरोग्याशी आणि मानवी जिवाशी त्यांना कसलेही देणेघेणेच नसते.
तिसरा मुद्दा असा की, ब्रिटीश राजवटीत गुलमोहर, पेल्टोफोरम, रेन ट्री आणि सुबाभूळ यांसारख्या वेगाने वाढणाऱ्या विदेशी झाडांची मोठ्या प्रमाणावर लागवड करण्यात आली. ही झाडे मूळची भारतीय नसल्यामुळे त्यांचे लाकूड अत्यंत मऊ, ठिसूळ आणि कमी आयुष्यमानाचे असते. ती आपल्या सागरी हवामानातील वादळी वाऱ्यांना तोंड देण्यास सक्षम नसतात. या झाडांची अशास्त्रीय छाटणी केली जाते. तेव्हा त्यांचा आतील भाग उघडा पडतो आणि पावसाळ्यात या मऊ लाकडात मोठ्या प्रमाणावर पाणी शोषले जाते. त्यामुळे झाडाच्या विशिष्ट भागाचे वजन कमालीचे वाढते. स्वतःच्याच फांद्यांचे ओझे साक्षात झाडांनाही पेलवत नाही. याशिवाय, अंतर्गत बुरशीजन्य रोगांमुळेही झाडे आतून पोखरली जातात. म्हणूनच ती किरकोळ वाऱ्यातही उन्मळून पडतात. याउलट, कडुनिंब, पिंपळ, वड, उंबर यासारखी स्थानिक स्वदेशी झाडे संथ गतीने वाढतात, पण त्यांचे लाकूड मजबूत असते आणि त्यांची मुळे मातृभूमीशी घट्ट नाते सांगणारी असतात, हे काही वेगळे सांगायला नको.
या जीवघेण्या समस्येतून बाहेर पडण्यासाठी नेमके काय करायला हवे? सर्वप्रथम, प्रत्येक झाडाच्या बुंध्याभोवतीची जागा पूर्णपणे काँक्रीटमुक्त करायला हवी, जेणेकरून झाडाच्या मुळांना पाणी आणि हवा मिळेल. झाडांची छाटणी करण्यासाठी अप्रशिक्षित मजुरांच्या कंत्राटदारांऐवजी प्रशिक्षित वृक्षतज्ज्ञ आणि वनस्पतीशास्त्रज्ञांचीच मदत घ्यायला हवी. शहरात नवीन रस्ते किंवा केबल्सचे खोदकाम करताना 'रूट स्कॅनिंग' तंत्रज्ञानाचा वापर करून मुख्य मुळांना धक्का लागणार नाही याचीसुद्धा काळजी घेतली पाहिजे. भविष्यातील लागवडीमध्ये विदेशी आणि ठिसूळ झाडांवर पूर्णपणे बंदी घालून केवळ स्थानिक देशी वृक्षांनाच प्राधान्य दिले पाहिजे. तसेच, प्रत्येक शहरातील झाडांचे डिजिटल जिओ-टॅगिंग करून त्यांचे नियमित आरोग्य परीक्षण करणे पालिकेला कायद्याने बंधनकारक करायला हवे. याशिवाय, शहराच्या पायाभूत सुविधांचे नियोजन करताना झाडांना एक 'जिवंत घटक' न मानता केवळ एक भौतिक अडथळा मानण्याची जी मानसिकता प्रशासकीय आणि सामाजिक पातळीवर रुजली आहे, तीच या सर्व अनर्थाचे मूळ आहे, हेही लक्षात घ्यायला हवे.
आजचा शहरी नागरिकही कमालीचे स्वार्थी आणि संकुचित होत चालले आहेत. आपल्या सोयीसाठी झाडांच्या फांद्या छाटणे, कार पार्किंगवर झाडाची पाने किंवा फळे पडतात म्हणून अख्खे झाड विष घालून किंवा छुप्या पद्धतीने मारून टाकणे, अशा विकृती शहरांमध्ये वाढीस लागल्या आहेत. त्या रोखण्याची गरज आहे. मुळात, ज्या सिमेंटच्या जंगलात आपण आज अभिमानाने वावरत आहोत, ते जंगल आपल्याला कधीच ऑक्सिजन देऊ शकणार नाही, तर ते केवळ उष्णतामानच वाढविणार आहे याचे भान राखायला हवे. झाडांच्या बुंध्याभोवती संगमरवरी सुशोभित कठडे बांधणे म्हणजे त्यांना आधार देणे नव्हे, तर त्यांच्या गळ्याभोवती मृत्यूचा फास अडकवणे आहे. झाडांच्या मुळांचे जमिनीशी असलेले घट्ट नाते, हाच त्यांच्या जगण्याचा मूलाधार आहे, याचाही कुणालाही विसर पडायला नको.
मुख्य म्हणजे, या प्रश्नावर आपली न्यायव्यवस्था आणि सर्वोच्च न्यायालयाची भूमिका निसर्गाची पाठराखण करणारी आहे. सर्वोच्च न्यायालयाने तसेच देशातील विविध उच्च न्यायालयांनी वेळोवेळी दिलेल्या आदेशानुसार शहरातील कोणत्याही झाडाच्या बुंध्याभोवती विशिष्ट जागा मोकळी सोडणे बंधनकारक आहे. केंद्रीय पर्यावरण आणि वन मंत्रालयाने सन २००० मध्ये जारी केलेल्या नियमांनुसार प्रत्येक झाडाच्या सभोवताली किमान ६ बाय ६ फुटांची जागा खुली सोडणे अनिवार्य आहे. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणानेही यासंदर्भात कडक निर्देश दिलेले आहेत. मात्र, आपले स्थानिक प्रशासन या सर्व न्यायालयीन आदेशांना आणि नियमांना सर्रास धाब्यावर बसवून आपली विकासकामे पुढे रेटत आहे, इथेच तर मेख आहे.
आज मुंबई किंवा देशातील इतर महानगरे जी काही जगण्यायोग्य उरली आहेत, ती या मुक्या वृक्षांच्या निरंतर सेवाभावामुळेच आहेत. तथापि, प्रशासकीय अनास्थेची हीच गती आणि कंत्राटदारांची अशीच मनमानी सुरू राहिली, तर सिमेंटच्या जंगलातील ही 'हिरवी शोकांतिका' अशीच निष्पाप नागरिकांचे बळी घेत राहील. त्यामुळे वेळ आता केवळ समित्या नेमण्याची नाही, तर आत्मपरीक्षण करून प्रत्यक्षात कृती करण्याची आहे. झाडे वाचवणे आणि मानवी सुरक्षा राखणे यात कोणताही अंतर्विरोध असण्याचे कारण नाही; गरज आहे ती निसर्गाविषयीच्या एका संवेदनशील प्रशासकीय इच्छाशक्तीची आणि सजग मानसिकतेची. झाडे, निसर्ग वाचला, तरच हवामान बदलाच्या संकटाने मेटाकुटीला आलेला माणूस आणि महानगरे भविष्यात वाचू शकतील!
prakashrsawant@gmail.com