नवलनगरी
सोनाली कोलरकर-सोनार
उन्हाळ्याची सुट्टी आणि थंडगार आइसक्रीम हे समीकरणच वेगळं आहे, पण तुम्हाला माहीत आहे का, सर्वांच्या आवडीचा कुरकुरीत ‘आइसक्रीम कोन’ एका मजेशीर अपघातातून जन्माला आला आहे?
हॅलो बच्चा कंपनी! परीक्षा म्हटलं की अंगावर काटा येतो, पण ती संपली की जो आनंद होतो त्याला तोड नाही. त्यात उन्हाळी परीक्षा मस्त असते न!? पण ‘परीक्षा कधी मस्त असते का?’ असा प्रश्न तुम्हाला पडला असेल, तर त्याचं उत्तर आहे- हो, नक्कीच असते! कारण एकदा का ही परीक्षा आटोपली, की लांबलचक सुट्टी आपली वाट पाहत असते. चक्क एक वर्ष संपलेलं असतं आणि आपण सुट्टीत धमाल करायला सज्ज झालेलो असतो. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे, या सुट्टीत थंडगार आइसक्रीम खायला आई-बाबांची अधिकृत परवानगी मिळालेली असते!
हातात तो कुरकुरीत आइसक्रीमचा कोन धरून, चाटत-चाटत घरी जाण्यात काय मज्जा असते, नाही का? या कोनामुळे आइसक्रीमची लज्जत चक्क दुप्पट होते. पण तुमच्या डोक्यात कधी हा विचार आलाय का, की आइसक्रीम कोनमध्ये द्यायची कल्पना पहिल्यांदा कोणाला सुचली असेल?
इतिहासकार सांगतात की, अँटोनिओ वाल्वोनाने ब्रिटनमध्ये पहिल्यांदा या कोनसाठी पेटंटचा अर्ज भरला होता. त्यानंतर एका इटालियन माणसानेही तसाच दावा केला. पण खराखुरा ‘पहिला कोन’ मात्र एका अपघातातून जन्माला आला! साल होतं १९०४ आणि ठिकाण होतं सेंट लुईस इथला जागतिक मेळा.
अगदी सुरुवातीच्या काळात आइसक्रीम कागदाच्या प्लेट्समध्ये किंवा कागदी कपात दिलं जायचं. मधल्या काळात काचेचे कपही वापरले गेले, पण ते फारच किचकट काम होऊन बसलं. विक्रेते काचेचे कप नीट स्वच्छ ठेवत नसत, तर कधी कधी एखादा ‘महान’ ग्राहक तो कप आठवण म्हणून चक्क घरीच घेऊन जायचा!
तर झालं असं की, त्या मोठ्या जत्रेत प्रचंड ऊन होतं. साहजिकच इतर खाद्यपदार्थांपेक्षा आइसक्रीमची मागणी खूप वाढली. जत्रेत फिरून थकलेले लोक थंडगार आइसक्रीमसाठी फूड कॉर्नरकडे धाव घेत होते. त्या मेळ्यात आइसक्रीमचे पन्नासहून अधिक स्टॉल्स होते. आर्नोल्ड किंवा अल्बर्ट नाव असलेल्या एका आइसक्रीम विक्रेत्याच्या शेजारी अर्नेस्ट नावाचा माणूस ‘वॉफेल’ विकत होता. कुरकुरीत केक आणि चविष्ट पेस्ट्री तो विकायचा, पण आइसक्रीमच्या गर्दीपुढे त्याचा धंदा अगदीच मंद होता. मग फावल्या वेळात अर्नेस्टने त्याच्या शेजारच्या आर्नोल्ड किंवा अल्बर्ट नाव असलेल्या आइसक्रीम विक्रेत्याला मदत करायला सुरुवात केली.
गर्दी इतकी वाढली की, आइसक्रीम विक्रेत्याकडच्या पेपर प्लेट्स संपून गेल्या! आता आइसक्रीम द्यायचं कशात? अशा वेळी त्या दोघांनी एक शक्कल लढवली. अर्नेस्टने आपले पातळ वॉफल्स गोल गुंडाळले आणि त्याचा एक कोन तयार केला. त्यावर आइसक्रीमचा गोळा ठेवून तो आइसक्रीम विक्रेता गिऱ्हाईकांना आइसक्रीम देऊ लागला. खाणाऱ्यांना तर मज्जाच आली! आइसक्रीम जसं वितळू लागलं, तसं त्या कुरकुरीत वॉफेलसोबत ते खाणं अधिकच चविष्ट लागू लागलं. बघता बघता ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि लोकांनी हे ‘वॉफेल आइसक्रीम’ खायला गर्दी केली. हे पाहून इतर विक्रेत्यांनीही वॉफेल आणि आइसक्रीमच्या जोड्या जमवत विक्री सुरू केली.
गंमत म्हणजे, जत्रा संपल्यावर या कोनाचं पेटंट घेण्यासाठी लोकांची रांग लागली. जो-तो म्हणू लागला, ‘ही कल्पना माझीच!’ पुढे ‘वॉफेल रोलिंग मशिन्स’ तयार झाली आणि हा यम्मी आइसक्रीम कोन जन्माला आला.
तर मुलांनो, आता आइसक्रीमवरून अजिबात भांडणच नको! कारण या कोनामुळेच तर दादा, ताई आणि मित्र-मैत्रिणींमधले वाटपाचे वाद मिटले आहेत. नाहीतर वाटीत आइसक्रीम देताना आपलं लक्ष नेहमी शेजारच्या वाटीकडेच असायचं- न जाणो त्याला एखादा चमचा जास्त मिळालं तर? आता मात्र समप्रमाणात आइसक्रीमचा गोळा मिरवणारा हा कोन हातात आला की समजावं, आपला उन्हाळा झकास जाणार!
पर्यावरण शिक्षक, प्रकाशक-संपादक sonalikolarkarsonar@gmail.com